Posts

Showing posts from April, 2019

रे जहाजा !

रे जहाजा ! आम्ही मानवांनी तुझी निर्मिती केली  पण तुझे गुण स्वीकारले नाही अजून  तू केवळ पाण्यावर तरंगणारी वस्तू  नाही त्यापेक्षाही खूप काही आहेस तुझ्यात सामर्थ्य आहे वाटेतल्या असंख्य वादळांना  तोंड देत अथांगतेला भेदण्याचं  कसब आहे पैलतीर गाठण्याचं  तेही पायाखालच्या अन  डोक्यावरच्या अस्थिरतेला सहजतेने स्वीकारून  आणि  इथे आम्ही  जरा हादरा बसला  स्थिरतेला की  सोडून देतो ध्यास  किनारा ओलांडण्याचाच

तेव्हा दोघीनांही

तेव्हा दोघीनांही  ताकीद होती  उंबरठा न ओलांडण्याची  फक्त तू चामड्याची म्हणून  उंबरठ्या आत न येण्याची  आणि मी कातड्याची  म्हणून बाहेर न जाण्याची  आता काळ बदललाय  तू ही  बदललीस  मी ही बदलले . तू उबरठ्या आत येउ लागलीस  अन मी उबरठ्या बाहेर जाऊ लागले   वाटलं खूप काही बदलेल   अखेर चामडं चामडंच राहिलं  आणि कातडं कातडंच  जेव्हा आदळले ते शब्द  पायातली वहाण  पायातच बरी !