Kavita




तेव्हा दोघीनांही 
ताकीद होती 
उंबरठा न ओलांडण्याची 
फक्त तू चामड्याची म्हणून 
उंबरठ्या आत न येण्याची 
आणि मी कातड्याची 
म्हणून बाहेर न जाण्याची 
आता काळ बदललाय 
तू ही  बदललीस 
मी ही बदलले .
तू उबरठ्या आत येउ लागलीस 
अन मी उबरठ्या बाहेर जाऊ लागले  
वाटलं खूप काही बदलेल  
अखेर चामडं चामडंच राहिलं 
आणि कातडं कातडंच 
जेव्हा आदळले ते शब्द 
पायातली वहाण 
पायातच बरी !

रे जहाजा !
आम्ही मानवांनी 
तुझी निर्मिती केली 
पण तुझे गुण 
स्वीकारले नाही अजून 
तू केवळ 
पाण्यावर तरंगणारी वस्तू 
नाही त्यापेक्षाही खूप काही आहेस
तुझ्यात सामर्थ्य आहे 
वाटेतल्या असंख्य वादळांना 
तोंड देत अथांगतेला भेदण्याचं 
कसब आहे पैलतीर गाठण्याचं 
तेही पायाखालच्या 
अन  डोक्यावरच्या 
अस्थिरतेला सहजतेने
स्वीकारून 
आणि 
इथे आम्ही 
जरा हादरा बसला 
स्थिरतेला की 
सोडून देतो ध्यास 
किनारा ओलांडण्याचाच 

शब्दांनो कोऱ्या कोऱ्या रेशमी वस्त्राचा
रेशीम पोत नव्याने अनुभवावा
तसं अनुभवायचं आहे तुम्हाला

कधी याल तसे ???
अन नाहीच जमलं तसं तर...
निदान नव्या कोऱ्या वहीच्या

पानासारखे तरी या ना
गोंदणासाठी आसुसलेले होऊन
कधी याल तसे ???
संगणकावर झरझर उमटणाऱ्या
तुमच्या लिपीतल्या साचेबद्ध सावल्या
आताशा किंचितही
गारवा देत नाहीत मनाला
कधीतरी या ना ....
कडकडीत उन्हाच्या तिरीपीतून
काहिली काहिली करणाऱ्या
झळा बनून
कधी याल तसे ???

अन हे पहा
यातलं काहीच नाही जमलं ना
तर वाहत्या नदीत झोकून द्या स्वतःला
निदान कुठल्यातरी दगडाला
पाझर तरी फुटेल ???
कॅनव्हासवरच्या 
लाल,पिवळ्या, हिरव्या, 
अशा तजेलदार रंगात 
जेव्हा 
शांत निवांत जांभळा, निळा रंगाचे 
फटकारे येऊ लागले 
तेव्हा जाणवलं ... 
आता बदल हवाय 
कुंचल्याला !
आजपर्यंतच्या उजळ 
रंगरेषांच्या फटकाऱ्यांनीही 
ठरवलंय आता व्यापू द्यावं 
निळ्या जांभळ्या रंगाला 
पूर्ण कॅनव्हासभर  
आणि ..... 
आपण पहुडावं निवांत 
संध्याकाळच्या कुशीत
निदान काही काळ 
कारण ... 
जेव्हा रिता होत जाईल 
रंगलेला कुंचला 
कॅनव्हास व्यापताना 
तेव्हा 
पुन्हा डुबकी मारून 
तो कुंचला रंगवेलच 
तजेलदार रंग 
नव्या - कोऱ्या कॅनव्हासवर  
चिरेबंदी..... 

ती आली आणि घेऊन गेली मला
एका विस्तृत माळरानावर 

जिथे 
रानफुलांचा वसा होता 
स्वतःसाठीच फुलण्याचा 

तिथे पाखरेही 
घालत होती स्वखुशीने शीळ 

वाराही गुणगुणत होता 
आपल्याच नादात 

आकाशानेही जपली होती 
स्वतःची नीरभ्रता 

मी खूष झाले, सुखावले 
अन
पटकन कॅमेरा 
काढून ते दृश्य टिपणार  

एवढ्यात जाणवलं
प्रत्येक गोष्टीला स्मृतीच्या 
चिरेबंदीतटा कशासाठी ????

रस्त्यावर बसलेली पाठमोरी बाई


रस्त्यावर बसलेली पाठमोरी बाई
जाता जाता सहजच दिसली
काही कारण नाही खरंतर
पण मनामध्ये  उगाचच ठसली
सिग्नल संपला तरी देखील
नजर काही वळेना
तिचा चेहरा बघण्याची ओढ
काही केल्या सुटेना
तिची वाकलेली पाठ
तेवढी मनामध्ये रुतली
खाली मान घालून ती
काहीतरी हुडकताना दिसली
अचानक तिची झुकली मान
ताठ होऊ लागली
अन तिच्या हातात मला
हिरवी कोवळी पालवी दिसली
काय करतेय त्या पालवीचं
कुतूहल माझं शमेना
अन तिच्या दोन हातांना
तो कोवळा भार साहवेना 
 
पुन्हा पुन्हा वर खाली, इकडे तिकडे
कोवळ्या पालवीला जणू जोजवत होती
का कोण जाणे पण तिची ताठ मान
निश्चयाचं पाठबळ सांगत होती
हातात कोवळी पानं तरीही
रस्त्याकडे का असावी पाठ ??
तिच्या कोवळ्या स्वप्नांना
कधीच मिळाली नसेल का वाट ??
सगळं जग धावतंय त्या रस्त्यावरून
काय कारण म्हणून हीच पाठमोरी बसली
का कुठल्या वेगळ्या वाटेची ती
सपान बघत बसली ......


काही कारण नाही खरंतर
पण मनामध्ये उगाचच ठसली
रस्त्यावर बसलेली पाठमोरी बाई
जाता जाता सहजच दिसली
सखे कविते,  
शब्दांचं पैंजण ल्यायलेल्या 
पायवाटेवर 
किती काळ चालायचं ??
आता मन 
स्वप्न पाहतंय 
क्षितिज ओलांडण्याचं 
अंतरीच्या लाटा 
उचंबळून येतायत 
पैलतीराच्या ओढीने 
पावलांनीही केव्हाच गाठलाय
निःशब्दतेचा किनारा
आता फक्त 
गलबताचं कसब
शिकायला  हवं  
अस्थिरतेतच स्थैर्य 
शोधून 
तरून  जाण्याचं ...... 

खिचडी 
लहानपणी ऐकली होती 
गोष्ट एका खिचडीची 
अकबराच्या दरबारातील 
हुशार बिरबल प्रधानाची 

तेव्हा पासून ही "खिचडी "
मनात पक्की रुतून बसली 
न्याय अन्याय याची चाड 
तिने मनामध्ये रोवली  

गरिबी, संघर्ष, मोह 
यांची  ही जाण देते
प्रामाणिकतेचा जय होतो 
याची ही समज देते 

सत्तेपुढे शहाणपणाने 
कशी मारली बाजी 
बिरबलच्या चतुराईची 
खिचडी आजही तितकीच ताजी  

 बहर....
तु येण्यापुर्वी
मी होते एक
कुंडीत लावलेलं
छोटंस रोप,
ज्याचा परीघ
त्याच्या जन्मासोबतच
आखला गेला होता .......


मातीही तशीच
साचेबद्ध,
कुंडीचा आकार
धारण करणारी,
सुर्याची किरणं
मुश्किलीने आत
झिरपवणारी......
माझं घुसमटलेपण
फुलण्याची उर्मी
खोलवर रूजणं
बहराच्या प्रतिक्षेत ...
पण तु आलीस
अन फुललेल्या रोपाला
कळालं
"बहर" बाहेर असला
तरी "बहरणं" आतुनच
असतं........
तृप्ती कुलकर्णी

कुपी 
तसा तुझा माझा सहवास थोडाच 
तरीही तुझं मिस्कील हसणं 
तुझं निश्चयानं बोलणं 
तुझं हळुवार बघणं 
समजावून सांगणं 
तुझं रुसणं रागावणं 
सर कसं  एखाद्या सुगंधी स्मृतीच्या 
कुपीत जपून ठेवल्यासारखं 
मनाला ओढ लावणारं 
हुरहूर लावणारं 
परवा अगदी अनवधानानं  ती कुपी 
उघडली गेली आणि त्यातून 
असंख्य सुगंधी आठवणी दरवळल्या 
तू थट्टा करणार 
माझ्या हहळवेपणची प्रेमाची ! 
पण मी प्रेमवेडी राधा होऊन ती 
कुपी जपली म्हणून तर आज केवळ 
माझ्यासाठीच नव्हे तर तुलाही 
पूर्वीच अस्तित्व सापडण्यासाठी 
उपयोगी पडली 
तेव्हाचे तुझे बोल 
अजून माझ्या मनात रेंगाळतात 
प्रत्येक आठवणी जपशील
तर त्याच निर्माल्य होईल 
तेव्हा मी म्हटलं 
झाड जसं  प्रत्येक फुलाचं 
उमलण , फुलणं , गळणं  बघतं 
बाहेर येताच पुन्हा नव्याने बहरतं 
तसच  तुझ्या माझ्या आठवणीचं नातं 
सहवासाचा सुगंध दरवाळताच
मनाला उभारी देणारं , फुलवणार, 
यावर फक्त तू मनापासून हसलास 
तुझं ते हास्य  
अजून माझ्या कानात घुमत  
आणि निघून गेलास 
माझी नजर चुकवून 
नेहमीच हार न मानण्याची 
तुझी वृत्ती, तुझा अहंकार 
हा मी देखील जपला केवळ तुझ्यासाठी 
पण तू एकदाही हार मनाली नाहीस माझ्यासाठी 
आज जातानाचे तुझे गढूळलेले डोळे 
झुकलेली नजर, टेबलावर वाजणारी अस्वस्थ बोटं 
खूपसं काही सांगून गेली 
तू मानलं नाहीस पण 
तुझी हार मात्र जाणवून गेली

मृत्यू !!!
कोण आहेस रे तु
एक कडवट वास्तव 
वर्तमानाला पूर्णविराम देणारा 
जर तो सजीवांचा असेल तर 
दृष्टी, स्पर्श आणि ध्वनी याला मुकणार 
नात्याचा असेल तर 
आयुष्याच्या असंख्य पोकळीत अजून 
एका पोकळीची वाढ करणारा 
विश्वासाचा असेल तर 
जगण्याच्या उद्देश प्रश्नांकित करणारा 
या पैकी कोणत्या कोणत्या रूपात 
तू प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावतोसच 
एखाद्या आगंतूका सारखा !
कधी क्षणभरासाठी 
कधी  दीर्घ काळसाठी
तर कधी आयुष्यभरासाठी 
उलथवतोस तू अनेकांचं आयुष्य 
एका  क्षणात !
तुला ना कसली लाज, दया, क्षमा, तमा 
होत्याच नव्हत करतोस तू 
किती तरी शास्त्र, पुराणे .
तुझ्या सामर्थ्याने होतात बेचिराख !
आणि हार मिरवतात प्राक्तन 
नावाच्या कल्पित गोष्टी रचून !!
किती वर्षे उलटली , युग लोटली 
तरी तुझ विनाशाच तांडव चालूच आहे अजून 
अगदी काळालाही व्यापून उरलस की रे तू ?
तुला स्वतःला कधीच मृत्यू नाही कारे ?
इतकी कुठली तुझी पुण्याई की 
तुला अमृताचा कुंभ लाभावा ?
तूच म्हणतोस ना की 
माझ्या येणाऱ्या आघात नंतर 
ही पोकळी भरण्यासाठी 
पुन्हा होतो एक नवा  जन्म
माझ्या कार्य सातत्यासाठी
मग तुला कधीच वाटत नाही कारे
लाभावं तुलाही एक रूप 
नवं अस्तित्व, तो अपूर्व जन्म सोहळा 
एकदा तरी अनुभवण्यासाठी  !!!!

रुसलेली कविता 
एकदा किनई  कविता 
माझ्यावर खूप खूप रुसली 
मनाच्या दुरच्या  कोपऱ्यात 
हळूच जाऊन लपली 
किती आर्जवे आणि लाडीगोडी 
लावून झाली तिला पण 
कस बोलतं करावं काही 
कळेनाच मला 
शेवटी मीही थकले 
तिची मनधरणी करून 
कट्टी घेतली मीच तिच्याशी 
मनी अबोला धरून 
असेच गेले दिवस आणि
गेल्या काही रात्री 
कवितेची माझी जुळेल गट्टी 
याची होईना खात्री 
संगणकावर फिरती बोटे 
सरावल्या हाताने 
परी जुळून आले नाही 
आमचे सूर एकमताने 
वैतागाने शेवटी मी 
संगणक दूर केला 
रागे रागे लेखणी खाली 
कागदास जरा ओढला 
आणि खुलली कळी तिची
अचानक  ती हळूच 
झरझरू लागली 
प्रियकराच्या आगमना सारखी 
नाचू गाऊ लागली 
आता मला कळून चुकले 
कि ती का माझ्यावर रुसली ?
कागद सवेची तिची प्रीती 
संगणकाच्या जाळ्यात अडकली 
नाकारले ती ने हे कृत्रिम बंधन 
कागदाने सहन  केले 
तिच्या दुःखाचे गोंदण 
ती मिठीत येते त्याच्या तेव्हा 
त्यावर उठते अबोल प्रीतीची नक्षी 
त्यानेच मग उडू लागती 
आठवांचे पक्षी 
आठवांचे पक्षी 

इंद्रधनू
दाटून आलेल्या आभाळा सारख्या 
भावना कागदावर ओथंबतात 
तेव्हाच मनामधल्या हिरवळीवर
पावसाच्या सरी येऊ लागतात  

कणाकणानं भरलेलं आभाळ 
जेव्हा स्वछ रीत होत 
मनामधल्या  स्पंदनाच 
दवबिंदूत रूपांतर होत 

अलगदपणे  साचून राहतात
भावना त्या पानांवर 
भ्रमराच्या आगमनाने 
मन डोलते तालावर 

अशाच वेळी दुरून एक 
हलकेच अशी 
संगीताची धून येते 
मना मधल्या आभाळावर 
इंद्रधनूची कमान पसरते     

पाउस
पावसाचे थेंब आले माझ्या अंगावरी 
भिजुनी मन चिंब झाले मन सांजवेळी 

थेंबा थेंबात जाणवे, हवा हवासा गारवा
पानाफुलांवर पसरे, दवबिंदूचा हि सडा 

दरवळे आसमंती गंध हा मातीचा  
वाऱ्या संगे सुरु होई प्रवास स्मृतींचा 

वृक्षलता, पशु, पक्षी  सारे प्रफुल्लीत होई 
नाले , सागर, सरिता  यांचे मिलन होई 

शेतकरी गाणे गाई, आज सुख समृद्धीचे 
गरीबाच्या झोपडीत फुले हसू आनंदाचे 

पहिला पाऊस पाऊस, हवा हवासा प्रेमिकांना 
धुंद गंध आठवणींनी फुले पिसारा मनाचा 

असा असा पाऊस  पाऊस,  असे सोबती छोट्यांचा 
पडे अभ्यासाला बुट्टी खेळ सुरु हा होड्यांचा 

असे नेहमीचा पाउस तरी नवसा हवासा 
आज आजीच्याही मनी झुले हिंदोळा स्मृतीचा 

ज्याला जे जे हवे ते ते देतो 
पाऊस हवासा नवासा 
घडे सुंदर  सहवास 
आकाश धरित्री मिलनाचा 

ऋतू
ऋतू मागून ऋतू येतात 
दिवसां मागून दिवस येतात 
मना मधल्या स्वप्नांना 
नवी नवी उभारी देतात 

असे अनेक ऋतू येतात 
प्रत्येकाच्या आयुष्यात 
नवीन सुरवात नवीन पहाट 
उजाडते आपल्या आयुष्यात 

या प्रत्येक नवेपणाचे  
भूतकाळाशी असते नाते 
कधी सुखाच्या किनारीचे 
कधी दुखः ची  झालर असते 

आयुष्याच्या अखेरीस  मात्र 
सारे ऋतू सारखेच वाटतात 
काही अधिक पिकलेले तर 
काही आधीच गळाले असतात 

हिशोब नसतो मनात कधी 
ऋतूंच्या या येण्याजाण्याचा
मनात फ़क़्त घुमत असतो 
नाद ऋतूंच्या प्रतिसादाचा  

प्रेम वेडा कवी 
आज चुकवून गेला 
शब्दांची मैफिल 
निशब्द करून गेला

बंद  पापण्यांच्या आड 
अश्रूंची गर्दी झाली 
कवितेची मैफिल 
सुनी सुनीच राहिली

होणार आहे शेवट कधीतरी
हे सत्य असले तरी 
तो दिन आजच असावा
हे रुचले नाही मनी 

सरेल हा क्षण आणि सरतील 
असंख्य प्रहर जरी 
बरसेल जरी "घननिळ"  
पण अनुभवण्यास नसेल ते 
हा "प्रेमवेडा हरी "

व्यर्थ आता ऋतूंचे सोहळे 
प्रेमाचे बोल हि झाले मुके 
जीवन गाणे गाता गाता 
सूर झाले पोरके !
 सूर झाले पोरके !

कविता म्हणजे ???
कविता म्हणजे शब्दांचा खेळ
का भावनांचा मेळ

आपुलाच आपल्याशी संवाद
का मनातल्या विचारांचा वितंडवाद

अनवट सुरांची मैफिल
का हरवलेल्या क्षणांची  गझल

वैशाख वणव्यातील दुपार का
श्रावण सरीतील पहिली सर

निराकार भावनाच साकार रूप
का साकारलेल्या भावनांची लयबद्ध रचना

मनाला पडलेल्या कोड्याचे उत्तर
का मनातल्या मनात निर्माण होणारी कोडी

आयुष्यात जगलेले काही क्षण
का काही क्षणां मध्ये जगलेले आयुष्य

वेळ जात नाही म्हणून लिहिलेल्या चार ओळी
कि गेलेल्या वेळेला शब्दात पकडण्याऱ्या  ओळी

प्रत्येकाचे उत्तर वेगळे
प्रत्येकाचे प्रश्न ही वेगळे

पण प्रत्येकातल्या अव्यक्ताचे
कविता हे उत्तर आगळे वेगळे !


सवाई गंधर्व !
सवाई गंधर्व ! सवाई गंधर्व !
शास्त्रीय संगीताचे अदभूत पर्व 
वर्षानुवर्षे चालले पुण्य  नगरीत 
हेचि वाटते नवलाई 
ताल, लय, शब्द, सुरांत 
न्हाऊन निघतो आम्ही 
हीच मोठी पुण्याई

राग शब्दाच्या भोवती नेहमीच 
नकारात्माकतेची वलये 
पण सुरांच्या  मैफिलीत 
राग खुलवितो संगीत स्पंदने

शब्द हि कधी बोजड अर्थहीन होतात 
व्यवहाराच्या दुनियेत 
पण हेच शब्द बरसतात 
अमृताची धून होऊन
संगीताच्या दुनियेत

म्हणूनच कितीही व्यस्त
असले आपले जीवन 
तरीही जगण्यात असावी 
अपूर्वाई 
गुलाबी थंडीत पुणेरी मस्तीत 
एकदा  तरी अनुभवावी सवाई!
एकदा  तरी अनुभवावी सवाई !

कविता कुणावर करावी 

कविता कुणावर करावी
कविता कुणावरही करावी
निळ्या भोर आकाशावर करावी
हिरव्या गार गवतावर करावी
सूर्याच्या तेजावर करावी
चंद्राच्या सौंदर्यावर करावी
कविता करता करता
कविता म्हणजे चांदण्याची बरसात व्हावी

कविता कुणावर करावी
कविता कुणावरही करावी
माळरानातल्या  वाऱ्यावर करावी
डोलणाऱ्या फुलावर करावी
सळसळणाऱ्या  पानावर करावी
झुळझुळणाऱ्या झऱ्यावर करावी
कविता करता करता
कविता म्हणजे सुगंधी क्षणांची पखरण व्हावी

कविता कुणावर करावी
कविता कुणावरही करावी
कधी जगलेल्या क्षणांवर करावी
कधी झुरलेल्या क्षणांवर करावी
कधी प्रखर वास्तवावर करावी
कधी सोनेरी स्वप्नांवर करावी
कविता करता करता
कविता म्हणजे सुवर्णस्मृतींची साथ व्हावी

कविता कुणावर करावी
कविता कुणावरही करावी
कधी मनमोहक रंगांवर करावी
कधी  मंद धुंद  गंधावर करावी
कधी सुरेल तालावर करावी
कधी जादूई  शब्दांवर करावी
कविता करता करता
एकदा  तरी कवीने
कविता जगून पहावी

कोरा कॅनव्हास 
कोऱ्या कोऱ्या  कॅनव्हास वर
तिची रेखीव आकृती काढताना 
कळेना  काय रेखाटावे 
तिच्या भोवतालचा 
परिसर दाखवताना 
माझी  तगमग  बघून 
मग तिचंच मन द्रवलं 
हात उंचावून तिने 
आभाळाकडे बोट दाखवलं 
मला म्हणाली थांब जरा !
घाई करू नकोस 
सुचत नाही म्हणून मला 
चौकटीत बांधू नकोस 
अग किमान चित्रात तरी 
मला मोकळ होऊ दे 
अथांग पसरलेल्या आकाशात 
जरा विहार करून येऊ दे 
थांबले मग मीही जरा
म्हंटल हे काय विपरीत घडल ?
कॅनव्हास वरच रूप 
तीच कस बोलू  लागल ?
कागदावरच्या चौकटीतल 
बंधन नकोस झालय 
परंपरेने लादलेल जीण 
मी झुगारून दिलय 
अमुक रंगाची ,
अमुक बांध्याची
 सरळ वळणाची ,
सोशिक बनण्याची  
नकोच मला उपमा 
तूच देवी , तूच लक्ष्मी ,
तूच संस्कृती या 
सोयीच्या वल्गना 
म्हणूनच म्हणते थांब जरां 
घाई करू नकोस
सुचत नाही म्हणून मला
चौकटीत बांधू नकोस
चित्रातल्या  ठराविक
वळणालाच एक वळण
देण्याची आलीये वेळ
परंपरेच्या चौकटी शिवाय
मांडायचं संसाराचा नवा खेळ
या नव्या खेळा मध्ये
शिक्षण ,  करियर
आत्मसन्मान ह्यांचा  हवाय मेळ
माझा परिसर मलाच रेखाटू दे
मर्यादे पलीकडच जग आहे
तिथे मला जाऊ दे
कॅनव्हास वरचा परिसर
आता मोकळा राहू दे !
आता मोकळा राहू दे !

निसर्गाच्या सहवासात 
निसर्गाच्या सहवासात 
मन कसं हळवं होत 
झुळझुळणारं पाणी असो 
हिरवागार रान  त्याचं 
एक गाण होत 
तिथले दगड गोटे सुद्धा 
नितळ नवे वाटू लागतात 
उगवतीच्या किरणाने 
चेहरे देखील फुलू लागतात

कधी मन झाड होऊ पाहत 
कधी मन झाड होऊ पाहत 
जमिनीवर उभ राहूनही 
आभाळाशी नात जोडू पाहत 
फांद्यांना फांद्या फुटाव्यात 
तस आतूनही फुटतात 
आशेचे इच्छेचे धुमारे 
पानापानांच्या देठातून 
फूल उमलावीत तशी 
स्वप्न फूलू लागतात 
होतात जगण्याचे नवे बहाणे 
कुठल्या रान पक्षांची स्वप्न 
पहात झाड उभ असत
आभाळभर पसरलेल्या फांद्यातून 
आपलेपणाने बोलावत  असत 
पक्षी  आला कि मायेने 
त्याला आपल्या कुशीत घेत 
मुळा पासून चैतन्याने 
फळाफुलांनी  बहरून येत

मी म्हंटल होत ना 
तुझं येणं तसं वाया जाणार नाही 
हरवलेल्या सुरांमध्ये 
निसटलेल्या क्षणांमध्ये 
मनामधल्या कप्प्यामध्ये
एक चैतन्य देऊन जाईल 

आकांक्षा हि भरारी मारतील 
स्मृतींना हि पंख फुटतील 
तनामनात प्रेमाची ज्योत  तेवत राहील 

मी म्हंटल होत ना
तुझ येण तसं वाया जाणार नाही 

आपलेपणाचा एक श्वास 
पाठीवरील कौतुकाची थाप 
मनात रुतून राहील 

तुझ्या विश्वासाची सावली 
कधी कोसळणाऱ्या वर्षावात 
तुझ्या मायेची उबदार शाल 
दिलासा देऊन जाईल 

मी म्हंटल होत ना
तुझ येण तसं वाया जाणार नाही

विसरत चाललेली नाती गोती 
हिरवळीत लपलेल्या त्या पाऊलवाटा 
दारावरची ती अक्षय प्रतिक्षा !
यांना बिलगून जाईल 

तुझ येण तसं वाया जाणार नाही

माझा अहं 
अं  हंआपला होऊन जाईल 
तुझ्या माझ्या प्रेमाची साक्ष बनून राहील 


एक होतं जंगल जिथे सारं काही मंगल 
नदी नाले वाहत होते , वृक्षवल्ली गात होते
एकमेकांची साथ होती, जगण्यामध्ये मौज होती 
पण एकदा कधी न्हवे ते अजब झाले 
पोपट आणि माकडात  वितुष्ट आले 
सारे वनचर आजुबाजू  गोळा झाले 
एकमेकांना दोष देते झाले 
मुद्द्यावरून गुद्द्यावर प्रकरण आले'
काय करावे कळेना मागे कोणी हटेना 
मग सिंह राजाने वैतागून गर्जना केली 
त्यापुढे बोलण्याची कोणी शामत नाही केली 
अरे रे माणसां सारखे तुम्ही वागू लागलात 
एकमेकांना का रे उगाच  पाण्यात पाहू  लागलात 
लक्षात ठेवा आपल्याला एकमेकांची साथ आहे 
म्हणूनच आपल्या या जगण्यात मौज आहे 
इतक्यात माकड ओरडले 
आंब्याचे झाड पोपटाने  बळकावले 
पोपटा हि मग चढाओढीने ओरडला 
झाडावरच मालकी  हक्क  त्याने देखील सांगितला 
सिंह महाराजांना मात्र काही केल्या हे पटेना 
हा वाद काही केल्या मिटता मिटेना 
इतक्यात हत्तीमामानी ने काढली एक युक्ती 
जंगलाच विभाजन केल तरच होईल ह्यातून  मुक्ती 
हळूहळू नाईलाजाने सारे तयार झाले 
जंगलाचे विभाजन तीन भागात केले 
शेपटी वाल्या प्राण्याचा काढला एक वाटा 
शिंग वाल्या प्राण्याचा काढला दुसरा  वाटा 
पंख वाल्यांना मिळाला तिसरा वाटा 
असे करत करत खूप वाटे झाले 
अखंड जंगलाचे तुकडे तुकडे झाले 
जंगलात आता काही राहिली नाही शान 
विभाजनाच्या नादात राहिले नाही भान 
सारे काही मनाजोगे तरी दिसती सारे दुखी 
निसर्गाचा हि तोल ढळला झाली अति वृष्टी 
सगळे जीव आता तरंगू लागले 
पावसामुळे जंगलही वाहून जाऊ लागले 
एकमेकांच्या मदतीने केली कशीबशी सुटका 
कळून चुकले त्यांना विभाजनाचा बसलाय चांगलाच फटका 
विचार केला त्यांनी सोडू सारे भेद, शोधू नवे जंगल 
पूर्वी सारखे असेल जीथे सारे काही मंगल 

स्वर तुझा कानी पडता 
स्वर तुझा कानी पडता 
माझी मी राहते 
अंतरीचे गुज माझ्या 
रोम रोमातुनी उसळते 

वाटे व्हावे कधी  मुरली 
अन  स्पर्श अनुभवावा 
तव ओठांचा 
बहरावे गीत  तृप्तीचे 
उत्सव  व्हावा  जगण्याचा 

वाटे कधी मोरपीस बनुनी 
झुलावे तव शिरी 
रंग गहिऱ्या जीवनाच्या 
उसळू द्याव्या उर्मी अंतरी    

स्वर तुझा कानी पडता 
माझी मी राहते 
अंतरीचे गुज माझ्या 
रोम रोमातुनी उसळते 

आई
खर सांगू का आई
तू समोर असतेस
तेव्हा तुझी माया जाणवत नाही
पण  आभाळ भरून आलं ना
कि  तुझ्याशिवाय रहावत नाही

सारे कष्ट सारे दुख: तू
हसत हसत झेलतेस
प्रसंगी उपाशी राहून तू
आमच पोट भरतेस
तेव्हाच समजत
जेव्हा भूक लागली असते
खायला देखील काही बाही असतं
पण खा बाळ ! दमली असशील
अस म्हणून भरवणार कोणी नसत

खर सांगू का आई
तू समोर असतेस
तेव्हा तुझी माया जाणवत नाही
पण रणरणत्या उन्हात
सावली पाहिली तर
तुझी आठवण आल्याशिवाय
मन शांत होत नाही

सतत धावपळ , दगदग
आमच्या उद्यासाठी  तुझा
आजचा वर्तमानही तू
पणाला लावतेस ….
आम्हाला शांत करून
थोपटणारी तू मात्र
रात्र दिन तळमळत असतेस

म्हणूनच  सांगते आई
तू समोर असतेस
तेव्हा तुझी माया जाणवत नाही
पण प्रेम , माया , आपुलकी ,
थोरवी हे शब्द आले की
तुझ्या आठवणीने डोळे
भरून आल्याशिवाय
राहत नाही ……….


रे कृष्णा !!
तुझी किती तरी रूपं ही मी पाहीली
कधी कधी मंदिरात तर कधी ग्रंथातच राहिली
पण खंर सांगू का रे तुला ? अगदी माझ्या मनीच
ह्या सगळ्यात फ़क़्त भास रे तुझा नाही तुझी सावली

रे कृष्णा !!
कुठे रे भेटशील ? किती किती छळशील ?
तुझ्या दर्शनासाठी का रे वेड लावशील ?

रे कृष्णा !!
कधी कधी वाटतोस हाच तू ! अगदी हाच तू सापडलास
आणि पाहता पाहता अगदी दिसेनासा कि रे झालास ?
मग जाणवत रे सख्या ! मग जाणवत रे  कृष्णा !
तुझ खूप खूप जवळ असण
कधी खूप खूप जवळ असून मनामध्ये नसण ……

रे कृष्णा !
कधी हिरव्यागार झाडीतून सूर्याची कोवळी किरणं
धरित्रीला स्पर्श करतात, तेव्हा जे जाणवत ते म्हणजेच  तू

रे कृष्णा !
कधी निळ्याभोर आकाशात रुपेरी ढगां मध्ये
लख्ख चांदण हसत असत , तेव्हा जे जाणवत
ते म्हणजेच  तू

रे कृष्णा !
कधी कोसळणाऱ्या सरींमधून पडणारे टपोरे थेंब
दवबिंदू बनून सजतात, तेव्हा जे जाणवत ते म्हणजेच  तू

रे कृष्णा !
कधी ओढाळ वासरू गाईच्या जवळ जात
आणि हळूच दूध पिऊ लागत , तेव्हा जे जाणवत ते म्हणजेच  तू

रे कृष्णा !
कधी दुपार उन छळत असताना
वाऱ्याच्या हलक्याशा  झोतासरशी मन गंधित होत ,
 तेव्हा जे जाणवत ते म्हणजेच  तू

असा कसा रे कृष्णा तू ??
कधी नसून असल्यासारखा तर
कधी असून नसल्यासारखा ?
कधी श्वासासारखा क्षणात पकडता येणारा
तर कधी नि:श्वासा सारखा क्षणात निसटून जाणारा !!!!


तू
कविता सुचत जाते 
तुला फुलवण्यासाठी
तू फुलल्यावर पुन्हा
पुन्हा बहरण्यासाठी

तुझे रूप तुझे भाव
माझिया शब्दांसाठी
तुझा इशारा तुझे हुंकार
माझिया  कवितेसाठी

तुझे असंख्य उपकार
काव्य अन मज  वरही
शब्दातून वाहते तुला
भावनांची हि सरी

ते शब्द कसले, कसले ते काव्य
मीही  नसे त्यात पारंगत कधी
मी लिहित जाते तुझ्यासाठी
शब्दातीत असशील तू जरी

शब्दातीत 
करावे असे प्रेम ज्याला
प्रेम म्हणता येऊ नये
अडीच अक्षरांच्या चिमटीत
ज्याला बंधन घालता येऊ नये

करावी अशी उपासना
तिला उपासना म्हणता येऊ नये
जन्मभराची साधना , असिधाराव्रत
या चार अक्षरात सामावू नये

करावे असे श्रम ज्याला
श्रम म्हणता येऊ नये
मनुष्याच्या घामाची किंमत
या दोन अक्षरांनी करू नये

करावी अशी भक्ती
की  जीला भक्ती म्हणता येऊ नये
संपूर्ण जीवनावरची श्रद्धा
या अडीच अक्षरात तोलू नये     

करावी अशी प्रीती कि
जीला प्रीती म्हणता येऊ नये
आयुष्याची मुख्य शिदोरी
या अडीच अक्षरात अर्पू नये

असा असावा विरह  कि
ज्याला विरह म्हणता येऊ नये
आयुष्यातील गणिताचे उत्तर
या तीन अक्षरात जखडू नये   

निर्झर
मनात माझ्या वाहतो आहे
भावनांचा  हा निर्झर
हातातल्या लेखणीलाही
मग फुटला हा पाझर

झऱ्यातून वाहते जसे
स्वच्छ नितळ पाणी
मनातून वाहले माझ्या
असेच शब्द काही

त्या पाण्याने जसे
तप्त धरणीला हि शमवावे
तसेच ह्या शब्दांनी
माझ्या मनासही शमवावे

ह्या शमनाने  धरती देते
सुख समृद्धीचे लेणे
चैतन्य हि निर्माण होई
वनात जिकडे तिकडे

तसेच ह्या शमनाने व्हावे
माझ्या मनीचे चांदणे
तप्त दुःखी मनावर
पसरावे शांतीचे हे लेणे

भ्रष्टाचार बनले दैवत  परम
ना  कधी वाटली शरम
कलियुगाचा महिमाच असा
कि भ्रष्टाचार बनले दैवत  परम

एक हि जागा अशी राखीव नाही
जिथे भ्रष्टाचाराची पाऊले उमटली नाहीत
लाच घेता प्रामाणिक पाने ज्यांनी कामे केली
आम्हाला वाटले त्यांची डोके ठिकाणावर नाहीत

कोणी एकाने पैसा खाल्ला कि
त्याच्या नावाने होतो शिमगा
चांगले आदर्शच दिसत नाहीत
म्हणून भ्रष्टाचाराचाच पिटतोय डंका

कधी अन्न पाण्यावरून होतो घोटाळा
कधी जमीन व्यवहारात सापडतो घोटाळा
कधी औषधांच्या भेसळीत अडकतो  घोटाळा
तर कधी परकीय घुसखोरीत घोटाळतो घोटाळा

सारे घोटाळे  पचवून देखील
सत्ता संपत्तीची हाव काही सुटली नाही
भारतीय संस्कृतीची अजरामर नितीमत्ता
स्वतंत्र देशात कधीच नांदली नाही

वाटले संपले सारे आता
इथे फ़क़्त फुटणार निराशेचाच हुंदका
स्वतंत्र भारतात लोकशाहीच्या राज्यात
लोककल्याणासाठी कोण पिटणार  डंका ?

कालरात्रीच्या काळात पुन्हा उष :काल झाला
हजारोंच्या गर्दीतून एक अण्णा हजारे आला
भोळ्या भाबड्या जनतेला काना त्यांनी दिला
अनैतिकते  विरुद्ध लढण्याचा धडा त्यांनी दिला

लोकशाहीच्या राज्यात त्यानेच पुकारलाय
लोकपालाचा  गजर !
मतदार राजा जागा हो , हात दे
आता तरी पाऊले उचल !

आम्ही फक्त निषेध व्यक्त करतो 
पण कधी
सारे काही घडून गेल्यावर

आमचे देखील बाहू स्फुरतात
पण कधी
सारे काही हातातून निसटून गेल्यावर

डोळ्यात आमच्याही पेटतो क्रोध
पण कधी
पाहण्यासारखे काहीच उरल्यावर 

शब्द ही तळपतात  सूर्याप्रमाणे आमचे
पण कधी
जेव्हा हुंकार द्यायला देखील कोणीच
नसत जागेवर

दर वेळीस नवी तारीख, नवा वार आणि नवे वर्ष
आतंक वाद आणि सामान्य माणूस यांच्यातला
जन्म मरण्याचा  हा जुनाच संघर्ष !!

कधी वेळेवर स्फुरणार बाहू आपले
स्फोट करणाऱ्यांना रोखण्यासाठी

कधी तेजस्वी नजर वळतील
माणसातल्या अतिरेक्याला शोधण्यासाठी

कधी तळपणारे शब्द बनतील आमची
स्फूर्ती गीते लढण्यासाठी

कशासाठी मिळवले स्वातंत्र्य आपण
फ़क़्त पोकळ निषेध व्यक्त करण्यासाठी !!!
जागृत राहा ! निर्भय बना ! माणुसकीवर श्रद्धा ठेवा
एव्हढ तरी जमेल ना ह्या सुजलाम सुफलाम देशासाठी !!!!!

जगण फूललं पाहिजे
जगण फूललं पाहिजे
फूल जस फुलतना  तसं
आतून उमललं पाहिजे
नुसतंच काय फुलायचं
वाऱ्यावर डोलायचं
डोलण्यासाठी का होईना
आतूनच सुरावटी
ज्ञान  असलं  पाहिजे

जगण फूललं पाहिजे
फूल जस फुलतं ना तसं
आतून उमललं पाहिजे
पावसाने भिजवलं कि
सोनेरी उन्हात सुखवायचं
निसर्गाच्या सौंदर्य सोहळ्यात
दवबिंदूनी सजायचं
सजण्यासाठी का होईना
आतमधल्या सौंदर्याच
भान असलं पाहिजे

जगण फूललं पाहिजे
फूल जस फुलतं ना तसं
आतून उमललं पाहिजे
गंधाळलेला परिसर अन
फूलाच दव बिंदूनी सजण
भ्रमराच्या आगमनासाठी
त्याच आतुरलेले जगण
भ्रमराच्या स्वागतासाठी का होईना
मन मधल्या आसुसलेपणाची
ओढ  जाणवली पाहिजे

जगण फूललं पाहिजे
फूल जस फुलतं ना तसं
आतून उमललं पाहिजे
भ्रमर नसेल येणार जरी
वारा  नसेल वाहणार तरी
फूलण आपला धर्म मानून
स्वतःसाठी तरी फुलल पाहिजे
आपल्यासाठीच तर जग हे सार
म्हणून आतून उमललं पाहिजे

ह्यात नवीन ते काय ?
सगळे पुतळे रडत आहेत कारण
लोक त्यांच्या नावाने लढत  आहेत
ह्यात नवीन ते काय ?

कधी पुतळ्यावर शेण फेकल
म्हणून उसळतो दंगा
कधी पुतळा इथे नको तिथे
म्हणून उसळतो दंगा
ह्यात नवीन ते काय ?

असे कित्येक दंगे पचवलेत ह्या देशाने  अन
पुतळे मात्र  उभे आहेत खाली मान घालून शरमेने
ह्यात नवीन ते काय ?

जिवंत पाणी तर किमंत नसतेच पण
गेल्यावर मात्र पुतळे उभारतात
आपणच उभारलेल्या पुतळ्यान वरून
आपल्याच माणसांची  डोकी फोडतात

म्हणूनच सांगते या देशातले
सगळे पुतळे रडत आहेत कारण
लोक त्यांच्या नावाने लढत आहेत
ह्यात नवीन ते काय ?

आज देशाला गरज नाही ती
निधड्या छातीच्या माणसांची
गरज आहे ती पुतळ्यांची , मंदिरांची अन मशिदींची
अन कधी जमलं तर लाचार दीनवाण्या माणसांची
ह्यात नवीन ते काय ?

काय गुन्हा केला होता त्या पुतळ्यांनी ?
कि पुतळे उभारणारेच झालेत पुतळ्यांचे वैरी

मंदिर बांधाणारेच पडतात मंदिरे
अन मशीद बांधणारेच  पाडतात मशिदी
काय काय पाहणे आले हो या भारत मातेच्या नशिबी ?
ह्यात नवीन ते काय ?

ह्यात नवीन काहीच नाही पण जुने देखील हरवले आहे
सहिष्णुतेचा , मानवतेचा धर्म सोडून जनावरां प्रमाणे जगणे झाले आहे


मला नक्की माहित नाही 
मला नक्की माहित नाही 
तू माझी आहेस कोण ?
नातं तुझं आणि माझं आसं कि
जाई जुई च्या वेली सारखं असणारं
आकार उकाराचा  फ़रक़ असूनही
सैदेव समानच  भासणारं

नातं तुझं आणि माझं आसं कि
सडारांगोळी सारखं असणारं
एकमेकांच्या मैत्री शिवाय
कधी हि खूलणार

नातं तुझं आणि माझं आसं कि
प्रकाश-पणती  सारखं  असणारं
एकाच्या उणीवेन भकासपणा आणणार

नातं तुझं आणि माझं आसं कि
लेखणी शब्दा सारखं  असणारं
एकाची ओळख व्हायला
दुसऱ्याच अस्तित्व असावं लागणारं

नातं तुझं आणि माझं आसं कि
होडी अन लाटे सारखं  असणारं
एखाद्याच्या साह्याशिवाय
प्रवास चालू होणारं

नातं तुझं आणि माझं आसं कि
पानाफूलावरच्या  दवबिंदू सारखं  असणारं
तुला ओलावा  लागू नये म्हणून
मी ओघळण्याच्या प्रयत्नात
तर मला दुखापत होऊ नये म्हणून
तू अलगद पणे  गळणार

कधी कधी माझ्या मनात 
कधी कधी माझ्या मनात 
विचार खूप येतात
दाटीवाटीने येउन गर्दी
निर्माण करतात

उडवून देतात कल्लोळ
मनातल्या सुखदुखांचा
फुटतात असंख्य पायवाटा
त्या भावनांना

नटून थटून  येतात
शब्द ओळींना घेउन
गेयता हि मग येते
हळूच धुंद होऊन

नाचू लागतात सारे
हातात हात गुंफून
अस्तित्व उमटवतात पानांवर
ते आपल ठासून

असे हे शब्द मग
बनवतात त्यांची कथा
हळूच उमटते त्यात
आपल्या मनाची व्यथा

कळतच  नाही मग
काय काय उमटलय
मनातले वादळ शमलंय
पण हूर हूर उरलेय

कविता म्हणावं कि
कथा म्हणावं हिला
का मन मोकळ करणारी
व्यथा म्हणावं हिला ?

येशील येशील बसराणी

येशील येशील बसराणी नेहमी वेळेवर येशील
कामावर येताना कामाहून जाताना सुखद धक्का तू देशील

सुट्ट्या पैशांचा घोळ हा नेहमीचा कंडक्टर वैतागलेला
शिरायला वाव नाही , थांबायला वेळ नाही, प्रवास सिग्नलने भरलेला
हॉर्न हा  वाजवीत धूर हा सोडीत हवेत प्रदूषण करशील
येशील येशील  . . . . . . . . . . .

सीट हि फाटलेली , काचा हि फुटलेल्या , पेट्रोलचा वास दरवळणारा
पानाची पिचकारी , तंबाखूची पुडी असतात तुझ्या सोबतीला
वाहनांच्या गर्दीतून , खड्ड्यातील रस्त्यातून  कशी बशी तू जाशील
येशील येशील  . . . . . . . . . . .

कधी वेळे आधी कधी वेळे नंतर स्टोप वरती येउन थांबशील
वैतागलेली गर्दी आत घुसल्यावरती अचानक बंद तो पडशील

नावाचा नंबर चा घोळ तुझा नेहमीचा आम्हास कोडे घालणारा
अचानक वाट बदलून आम्हास चकवण्यात तुझा  अवखळपणा लपलेला
शिव्यांच्या नादात , गर्दीच्या तालात खडखडाट करीत तो गाशील

येशील येशील बसराणी  नेहमी वेळेवर येशील  
कामावर येताना कामाहून जाताना सुखद धक्का तू देशील

शब्दांच्या पलीकडले शब्दांच्या अलीकडले ..... 
जे गीत तुला कळले सख्यारे तेच मला स्फुरले
अस्पष्ट तुझा हुंकार मौनातून फुललेला
बेधुंद अशा वेळी स्पर्शातून खुललेला
शब्दांच्या पलीकडले. . . . . . .

हि जाणीव प्रेमाची ओढ अनिवार अशी
लाजून  पाकळी बोले त्या खट्याळ भ्रमराशी
वाऱ्याचे थरथरणे , पानांचे सळसळणे
झुळझुळणाऱ्या  या निर्झरा सम
तुझे  लडिवाळ  कुजबुजणे
शब्दांच्या पलीकडले. . . . . . .

हे गीत प्रीतीचे, हे गीत तृप्तीचे
हळुवार कातर मना हे गीत समर्पणाचे
मनोमय तालावारचे हे गीत निशब्दतेचे
तेच तुला कळले तेच मला स्फुरले
तुझे नि माझे अंतरंग सख्या
सांग कसे जुळले
सांग कसे जुळले
शब्दांच्या पलीकडले. . . . . . .

पाऊलखुणा

आता कुठ पोहता येतंय मला
सभोवार पसरलेल्या असंख्य शब्दांतून
कवितेच्या पाऊलखुणा दिसतायत मला

माझ्या सभोवार खूपच गर्दी
शब्दांची, अन भावनांची
शब्दांचा अन भावनांचा संगम जोडणं
आता कुठ जमायला लागलय मला

एकेक शब्द त्याचे अनेक अर्थ
प्रत्येक अर्थाचा हेतू समजतोय मला
कविता केवळ शब्दांचीच नसते
हे हळूहळू उमजतंय मला

प्रत्येक भावनांचे एकेक पदर
आता कुठ स्पष्ट दिसतायत मला
शब्दरूपी महासागरात पडल्यापासून
आता कुठ पोहता येतंय मला

भावनेला नेमक साकार करणं
हळूहळू आता जमतंय मला
त्या भावनांना अचूक आशय देणं
आता कुठ जमू लागलय मला

सुखाच्या वाटेवर असणारे हुंकार
शब्दरूपी करणं जमतय मला
दुखाच्या हुंदक्याना  सुगंधी करणं
आता कुठ उमजू लागलय मला

या साऱ्यातून नेमकं काय मांडाव
याचच भान हळूहळू येतंय मला
दूरवर दिसणाऱ्या एकाकी माळरानावर
कवितेच्या पाऊलखुणा खुणावतात  मला

आयुष्याला म्हंटल मी

आयुष्याला म्हंटल मी
एकदा तरी फुल होऊन जगता याव
अंतरंगातला सुगंध जपत 
पाकळी पाकळी फुलून  याव 

अलवारपणे डोलता याव 
आभाळातून होणाऱ्या वर्षावात
चिंब चिंब भिजून जाव

कुणी पाहणार नसल तरी
दवबिंदूनी सजून याव
एवढ्या अफाट विश्वाच रूप
पाकळी वरती साठवून घ्याव

आयुष्याला म्हंटल मी
एकदा तरी फुल होऊन जगता याव
कुणी नसल आपलं  तरी
आपल्या साठी फुलता याव


प्रेमाचा कॉपीराईट 

प्रेमाला नाही भाषा , जात ,
प्रांत वा  धर्म  यांचे  बंधन
त्याची स्वतःची नजरेची
भाषा असते
प्रेम अडकत नाही
सौंदर्यात, श्रीमंतीत
हुशारीत वा कर्तबगारीत
तिथे स्वतः फुलता फुलता
समोरच्याला ही फुलवण्याची
रीतच न्यारी असते
प्रेमात  नसते वयाची , अनुभवाची
आणि शिक्षणाची गरज
कितीही उन्हाळे , पावसाळे
पाहिले तरी
प्रत्येक  प्रेमाचा ऋतू
वेगळाच असतो.
मावळतीची निळीसर
संध्या असो वा  दुपारचा
सोन पिवळा  प्रकाश
अगदी उगवतीचा
लालभडक रंग
यातही प्रेमाची  गुलबट
छटा वेगळीच दिसते.
ओल्या पावसाचा
सुगंध असो वा
रातराणीचा मादक
गंध असो
प्रेमाचा गंध हा
प्रत्येकाचा खास
वेगळाच असतो
कारण
प्रेम नावाच्या भावनेवर
प्रत्येकाचा स्वतः चा
कॉपी राईट असतो.

दोष द्यायचाच झाला तर

जाती धर्माच्या मुळावर दहशतवादाचं रोप आहे
भ्रष्टाचार ग्रस्त देशात गरिबीचा टाहो आहे
शंभर अपराधी बाहेर  निरपराधीच आत आहे
कार्य नंतर खुर्ची आधी मतपेटीलाच महत्व आहे
दोष द्यायचाच झाला तर कधी तुमचा आहे कधी आमचा आहे
कधी खुर्चीवर बसणाऱ्यांचा तर कधी बसवणाऱ्यांचा आहे

कधी खालून पाहिले कधी वरून पाहिले
सगळीकडेच अंधारमय भविष्य पांघरले
प्रगतशील २१ व्या शतकातील माणुसकीचा अस्त आहे
दोष द्यायचाच झाला तर कधी तुमचा आहे कधी आमचा आहे 
कधी खुर्चीवर बसणाऱ्यांचा तर कधी बसवणाऱ्यांचा आहे

सगळीकडे मलिनता येथे वाहतुकीची गैरसोय होते
खाणाऱ्यांचीच तोंडे वाढतात महागाईला जाग येते
बेकारीची समस्या आणिक गुन्हेगारी हायहाय
घेऊन उच्च शिक्षण हाती जाऊ परदेशी बायबाय
दोष द्यायचाच झाला तर कधी तुमचा आहे कधी आमचा आहे
कधी सुशिक्षित गुन्हेगारीचा तर कधी परदेशी पळवाटेचा आहे

स्वातंत्र्याचा पुरस्कार करत दहशतवाद जगत आहे
मानवी उत्कर्षाचा मानवच संहारक आहे
अजूनही इथे दगडात देव शोधात आहेत
चालत बोलता देव मात्र दृष्टी आड करत आहेत
दोष द्यायचाच झाला तर कधी तुमचा आहे कधी आमचा आहे 
कधी पाषाण हृदयी असणाऱ्यांचा तर कधी पाषाणात देव शोधणाऱ्यांचा आहे

सभोवताली अनामिक दडपण माणूस पडछायेसही डरत आहे
तरीही वेडा माणूस आज स्वातंत्र्य दिन पाळत आहे
झालो आम्ही स्वतंत्र तरीही सिमेवर रोज एक शहीद आहे
निरपराध जनतेची हत्या अत्याचाराचा पूर आहे
दोष द्यायचाच झाला तर कधी तुमचा आहे कधी आमचा आहे 
कधी स्वात्रंत्र्यास स्वैराचार मानणाऱ्यांचा तर कधी स्वातंत्र्यात मश्गुल राहणाऱ्यांचा आहे


रेशीमगाठी 

रिमझिम रिमझिम  
बाहेर बरसत्या 
गर्द घनांच्या ओळी 
आठवणीने ऊर भरता 
चाहूल लागली अवेळी 

मनातील वेदनांनी 
हळूच उतरली पद्स्पर्श 
झाला  मनः पटला वरती   
उलगडत उलगडत गेल्या 
त्या कवितेच्या रेशीमगाठी 

एक झुला आठवणींच्या हिंदोळयावर झुलणारा 

एक झुला तान्हुल्याचा अंगाई गीत गाणारा 
झाडामागच्या चांदोबाशी लाडिक हट्ट करणारा 
बालपणाच्या ममतेवरती  रमतगमत डुलणारा 
कधी हसत कधी रुसत आपल्याच नादात रमणारा 

एक झुला बागेमधला उंचच  उंच जाणारा 
जमिनीवरती पाय रोवून आभाळापर्यंत पोहोचणारा 
उमलत्या किशोरी स्वप्नांनी अथांगतेला स्पर्शणारा 
भरारी मारणाऱ्या पाखरांचे  पंख होऊन झुलणारा 

एक झुला झाडावरचा सावली धरून राहणारा 
पानाफुला, पाखरासंग मनातलं गुपित ऐकणारा 
तारुण्याच्या आगमनाने एकांतात रमणारा 
अधीर मधुर स्वप्नांवर लडिवाळपणे डोलणारा 

एक झुला ओसरीवरचा संथ संथ झुलणारा 
येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं हसून स्वागत करणारा 
माध्यान्हीची विश्रांती सांजवेळच्या गुजगोष्टी गतस्मृतींना कुरवाळणारा 
अनुभवाच्या पोक्तपणाने वार्धक्याकडे झुकणारा 
शब्द - ८६

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज