जाणीव
प्रेम म्हणजे काय ? हे नीट समजतंही नव्हतं तिला. तेव्हापासून तिनं मनात ‘कृष्ण’ जपला होता. खरंतर आपण मनात ‘कृष्ण’ जपलाय ही जाणीवही नव्हती तिला. पण तरीही प्रेम आणि समर्पण इतकं होतं की नीळंशार आकाश, दुपारचं स्वच्छ उन, झाडांच्या सावल्या, संध्याकाळचा गारवा, चांदण्यांची चाहूल, चंद्राचं अस्तित्व, नदीचा प्रवाह सारं काही कृष्णमय आहे असं वाटायचं तिला. आणि त्या सगळ्यांच्या अनुभूतीत डुंबायची ती. तिचं वयात येणं असं मोरपंखी होतं. तरल, स्वप्नील... सात्विक. कसलासा अपार आनंद, तो लुटत असताना आपल्याच भाग्याचा हेवा वाटून मधेच जाणवणारी हुरहूर... आणि तृप्तता... विलक्षण तृप्ततेत तिचं तारुण्य बहरलं होतं. दिवस कसे वाऱ्याच्या वेगानं उडून जात होते. आणि अचानक एक दिवस तिला वाटलं, हे जे सगळं हवंहवंसं वाटतंय ते व्यक्त करायला कुणीतरी हवं. आपलं असं. हे असं का वाटतंय हे ही तिला समजत नव्हतं. हे वाटणं योग्य का अयोग्य ? हे ही समजत नव्हतं... ती गोंधळली...बावरली. आजपर्यंत असं कधीही झालं नव्हतं. मनात प्रश्नच आले नव्हते. जे मिळत होतं, भावलं होतं ते ती टिपत गेली. कसलाही विचार न करता. किंबहुना आपण ते टिपत आहोत हे ह...