जाणीव
प्रेम म्हणजे काय ?
हे नीट समजतंही नव्हतं तिला. तेव्हापासून तिनं मनात ‘कृष्ण’ जपला होता. खरंतर आपण
मनात ‘कृष्ण’ जपलाय ही जाणीवही नव्हती तिला. पण तरीही प्रेम आणि समर्पण इतकं होतं
की नीळंशार आकाश, दुपारचं स्वच्छ उन, झाडांच्या सावल्या, संध्याकाळचा गारवा,
चांदण्यांची चाहूल, चंद्राचं अस्तित्व, नदीचा प्रवाह सारं काही कृष्णमय आहे असं
वाटायचं तिला. आणि त्या सगळ्यांच्या अनुभूतीत डुंबायची ती. तिचं वयात येणं असं
मोरपंखी होतं. तरल, स्वप्नील... सात्विक. कसलासा अपार आनंद, तो लुटत असताना
आपल्याच भाग्याचा हेवा वाटून मधेच जाणवणारी हुरहूर... आणि तृप्तता...
विलक्षण तृप्ततेत
तिचं तारुण्य बहरलं होतं. दिवस कसे वाऱ्याच्या वेगानं उडून जात होते. आणि अचानक एक
दिवस तिला वाटलं, हे जे सगळं हवंहवंसं
वाटतंय ते व्यक्त करायला कुणीतरी हवं. आपलं असं. हे असं का वाटतंय हे ही तिला समजत
नव्हतं. हे वाटणं योग्य का अयोग्य ? हे ही समजत नव्हतं... ती गोंधळली...बावरली. आजपर्यंत
असं कधीही झालं नव्हतं. मनात प्रश्नच आले नव्हते. जे मिळत होतं, भावलं होतं ते ती
टिपत गेली. कसलाही विचार न करता. किंबहुना आपण ते टिपत आहोत हे ही तेव्हा समजलं
नव्हतं. पण त्या दिवशी मात्र असं काहीसं तिला जाणवायला लागलं.
अगदी दुपारची वेळ.
सगळीकडे प्रकाशाची उधळण झाली होती... पानं, फुलं, वेली, प्राणी, सगळे उबदार उनाच्या
कुशीत विसावले होते... मधूनच मंद अशी झुळूक यायची ती चाफ्याचा, मोगऱ्याचा गंध घेऊनच.
अतिशय प्रिय असा हा सुगन्ध. दुपारचं सौंदर्य वाढवणारा. अशी ‘रसरसती दुपार’ तिच्या
अतिशय आवडीची होती. अगदी प्रिय होती. शांत पण सुस्त नाही... प्रकाशाची अनेक रूपं
साकारणारी... हिरवी झाडी, निरनिराळी रंगीत फुलं, पक्षांची किलबिल आणि लडिवाळ
सावल्या. हे बघताना तिची समाधी लागायची. दुपार म्हणजे विश्वाचा एका लयीत चाललेला
दीर्घ श्वास वाटायचा तिला. अशा दुपारी त्या लडिवाळ सावल्यात तिला पहिल्यांदा तो
दिसला; नव्हे भासला. इतकी सुंदर दुपार चितारणारा कोण असेल असा विचार मनात आला आणि
तो भासला. तो कोण आहे? हे ही समजलं नाही... पण कुणीतरी आहे हे जाणवलं. भास असला
तरी तो भास खरा होता. त्या भासाचा स्पर्श तिच्या तनामनाला वेढत होता. तुझ्या या
तारुण्याच्या बहरात माझा वाटा आहे हं, तुझ्याइतकाच किंबहुना जास्तच असं काहीसं सांगत
होता. हे जाणवलं आणि तिला ‘साथ’ हवीहवीशी वाटू लागली. एकांत आणि एकटेपणा अपुरा पडू
लागला.
आणि मग ती जाणीव
अस्वस्थ करायला लागली. त्याचा आनंद घेण्याऐवजी त्याचं मूळ शोधायला लागली. खरंतर हाच
क्षण खूप महत्त्वाचा होता. अगदी तिच्या आयुष्याला वळण देणाराच... मनातल्या या भावनांचं
योग्य निराकरण करायला जर तेव्हा जमलं असतं... हे प्रेम असंच अबाधित रहातं ना...
उलट याचं प्रेमानं तिच्या आयुष्यात विलक्षण रंग भरले असते, तिचं आयुष्य व्यापक
केलं असतं, पण तसं झालं नाही. सुखाचं मूळ शोधण्याचा मानवी मनाचा स्पर्श तिच्या
मोरपंखी जगण्याला झाला आणि सगळंच बदललं. शोधाच्या या प्रवासात तिला सुखाची अभिलाषा
वाटू लागली. मग हळूहळू समाधान आणि तृप्ततेची जागा शकाकुशंकांनी घेतली. कोण तो? मला
दिसत का नाही? मला भेटत का नाही? विचारांच्या या गर्तेत ती सापडली. निरपेक्ष आनंदाला
मुकली. खरंतर भेटूनही ती काय विचारणार होती? आणि त्यानं तिचं समाधान झालं असतं?
नदीत पाय सोडून बसल्यावर आपल्या पायाला स्पर्शणाऱ्या लाटा आपल्याच मालकीच्या असतात
असा प्रवाही हट्ट धरून ठेवण्यासारखं होतं ते.
पण सुखदायक ते
मिळालंच पाहिजे आणि ते ही कायमचं... हा मानवीहट्ट तिला स्वास्थ्य देईना. प्रत्येक
स्वप्नाला वास्तवात बांधणं हे काजवे पकडण्यासारखं असतं. ज्याच्या ओढीनं पकडतो तो
प्रकाश मुठ उघडल्याशिवाय मोकळा होत नाही आणि मुठ उघडावी तर काजवा हातात राहात
नाही. इतकीही जाणीव राहिली नाही तिला... प्रवाही हट्टाचं आकर्षण... दुसरं काय ?
काळ सरकत गेला...
अनेक दुपारी ढळून गेल्या. पण अट्टाहासाचा प्रवास काही थांबायला तयार नव्हता. एक
दिवशी मात्र लख्ख जाणीव झाली की हा प्रवास सुरुच करायला नको होता. जर न मागता मिळत
होतं... मिळेल तेव्हा मन तृप्त होतं होतं तर हे सारं कशासाठी ? आता फार फार उशीर
झाला होता. परतायचं ठरवलं तरी आता पर्यंतच्या अनुभवांचं करायचं काय ? मन रिक्त
करायचं कसं ? आणि रिकाम्या मनात भरायचं काय ? मोठी तेढ निर्माण झाली. आपल्याच
पाऊलवाटा आपल्यालाच पुसता येईनात. तशी तिनं निर्णय घेतला... पुन्हा उलटा प्रवास
करण्याचा. मोठा धाडसीच होता तो... कोण जाणे तो प्रवास पूर्ण होईल की नाही... का
त्या प्रवासाच्या वाटेवरच एक वेगळ्याच विश्वाचा दीर्घ प्रवास सुरु होईल. तरीही
तिनं ठरवलं हा प्रवास सुरु करायचाच... कारण जिथं उगम असतो तिथंच अंतही.
Comments
Post a Comment