भाषा साहित्य आणि समाज

                                                                                                   credit- sahitysuchi magzine/rasik sahitya
भाषा साहित्य आणि समाज 

मिलिंद बोकील यांनी समीक्षेच्या स्वरूपात लिहिलेले हे पुस्तक म्हणजे नवोदित लेखकांची आणि वाचाकांची कार्यशाळा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इतक्या प्रभावी पणे  ह्यात  भाषा, साहित्य आणि समाज या संदर्भात माहिती उदाहरणासहीत स्पष्ट करून सांगितली आहे.
भाषेचा वापर हा विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी झाला. परंतु जसजशी माणसाची प्रगती होत गेली; तसतशी त्याची भाषे कडे बघण्याची दृष्टी बदलली. केवळ व्यवहार आणि संवाद या पुरतेच मर्यादित स्वरूप न राहता तिचे रूपांतर साहित्यात झाले. तसेच तिचा विस्तार हि झाला. भाषा हि मानव निर्मित असल्यामुळे हा विस्तार होताना अर्थातच सामाजिक घडामोडींचा, मानवी संस्कृतीचा तिच्यावर परिणाम झाला. आणि या साऱ्याचा परामर्श या पुस्तकात घेतला आहे.
चांगले साहित्य म्हणजे काय ? लेखनाचा दर्जा कसा  सुधारावा ?  वाचनाचा व्यासंग कसा वाढवावा ? त्यातून आपल्याला काय मिळते ? समृद्ध साहित्य म्हणजे काय ? ते कसे बनते ?  लेखकांनी कसे लेखन करावे ? लेखाकाला लेखनाची उर्मी कशी येते ? लेखकपणाचे भान असणे म्हणजे काय ? उत्तम लेखन हे साहित्याला, समाजाला चांगला दर्जा देते. त्यासाठी काय करावे ? तसेच काय टाळावे  ? समीक्षा म्हणजे काय ? त्याचा उपयोग लेखनाचा दर्जा सुधारण्यास कसा होतो ? मराठी साहित्यातील समीक्षेच्या उणीवा काय आहेत ? लेखन कलेची इतर अंगे चित्रपट, कथा, कविता , नाट्य अशा भाषिक इतर अंगांचा उहापोह यात केला आहे .
चांगल्या साहित्याचे मापदंड काय आहेत, ह्याच्या उत्तरात येणारी मतभिन्नता विचारात घेऊन त्यावरचा सरळ सोपा उपाय सांगितला आहे. तो म्हणजे, " ज्या वाचनाने आपल्या मनात अलौकीक, सुंदर आणि समजूती चे भाव येतात. आपल्या आकलनात वाढ होते ते चांगले साहित्य." याने जो आनंद भाव निर्माण होतो त्याला त्यांनी 'उदास आनंद' अशी उपमा दिली आहे.  साहित्याच्या समृद्धीचे चार मापदंड त्यांनी सांगितले आहेत.  जीवन दर्शन, जीवन दृष्टी,  साहित्य मुल्य , आणि सौंदर्य निर्मिती हे आहेत. साहित्याचा दर्जा चांगला नाही म्हणजे काय ? तर त्या मध्ये ' भावाचा अभाव असणे ' होय असे हि ते म्हणतात. साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी माणसाचे सुसंस्कारी मन देखील महत्वाचे आहे. तेच चांगल्या साहित्याचा आस्वाद घेऊ शकते. तसेच साहित्याचा, संस्कृतीचा दर्जा वाढवण्यास आणि टिकवण्यास मदत करते. 
विज्ञान आणि साहित्य यांचा परस्परांवर होणारा परिणाम देखील यात सांगितला आहे. मराठी विज्ञान कथा या अजूनही विज्ञान सिद्धांता वर आधारित न वाटता कल्पना रम्य वाटतात. वैज्ञानिक सिद्धांत , प्रयोग त्याची वस्तुनिष्ठता, त्याचा माणसावर होणारा परिणाम या बाबींचा विचार कथेत केला जात नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे . विज्ञान कथा कशी असावी याचा नमुनाही सांगितला आहे.
भाषा, साहित्य आणि समाज हे तीनही घटक एकमेकांशी संलग्न आहेत. या पैकी कोणत्याही एका घटकातील बदल हा उर्वरित दोन्ही घटकांवर परिणाम करणार ठरतो. आणि तो चांगला आणि वाईट अशा दोनही स्वरूपाचा असू शकतो. हे देखील त्यांनी निरनिराळ्या उदाहरणावरून दर्शवले आहे. जसे जागतिकीकरण मुळे होणारा बदल खेड्यांचा ऱ्हास आणि वाढते शहरीकरण, इंग्रजी भाषेचा वाढता वापर, बोली भाषांचे घटते प्रमाण, ह्याचा गंभीरपणे विचार केलेला दिसून येतो. भौतिकदृष्ट्या जगात वाढणारा एकसुरीपणा, निरनिराळ्या संस्कृतीचे सपाटीकरण, त्याने सामाजिक आणि साहित्यिक विविधतेवर होणारा परीणाम सांगितला आहे.
वाचकाचा साहित्यावर होणारा परिणाम, त्याचे महत्व येथे विशद केले आहे. मराठी भाषेतून शिक्षण घेण्याबाबतची   नकारात्मक भूमिका , माध्यमिक शाळेतील विध्यार्थ्यांचे गळतीचे वाढते प्रमाण, मराठी साहित्यात रोम्यांटिकपणाचा अभाव , प्रेम या विषय बाबत ची उदासीनता अशा गोष्टींबाबत गांभीर्याने विचार आणि कृती करण्याची गरज व्यक्त केली आहे. साहित्य संमेलनातील बाजारूपणा, प्रसिद्धीचा हव्यास यांचे होणारें दुष्परिणाम साहित्याच्या दर्जावर परिणाम करतात  हि खंत त्यांनी व्यक्त केली आहे . वाचक गट नवी उर्जा केंद्र , वाचकांची लोकशाही कशी येईल ? यामध्ये सामाजिक स्थिती आणि साहित्य संस्कृती यामध्ये वाचकांनी संघटीतपणे केलेली वैचारिक देवाण घेवाण आवश्यक आहे असे ते  नमूद करतात.
वाड्मयीन निर्मितीसाठी लेखकाकडून अपेक्षित असणाऱ्या प्रमुख चार भूमिकांबाबत मार्गदर्शन केले आहे. मराठीतील अध्यात्मिक वाड्मय हि एक भाषेच्या विकासाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे असे सांगितले आहे आणि रंजन व  बोधन या दोन साहित्याच्या संस्कृतीच्या काठांबाबत माहिती दिली आहे .
भारतीय स्वातंत्र्य प्राप्ती नंतरही अनेक समस्या आहेत त्याबाबत लेखन आहे. लोकशाही आणि लोकशक्ती याची जाणीव  करून देण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच देशाच्या प्रगती मध्ये भाषा , संस्कृती, वैज्ञानिकता आणि शिक्षण यांचा होणारा दूरगामी परिणाम इथे स्पष्टपणे दर्शविला आहे.

वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
 http://rasiksahitya.com/#/home

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट