अट
कोरे कागद, रंग, पेन्सिली, शार्पनर, पट्टी, खोडरबर असा सगळा जामानिमा घेऊन बसलं तरी काही केल्या रमाला चित्र कोणतं काढावं ते सुचेना. सुट्टीत रोज एकतरी चित्र काढेनच असं तिनं तिच्या बाबांना प्रॉमिस केलं होतं. सुरुवातीचे काही दिवस उत्साहात पार पडलेही होते. मासिकातली, पुस्तकातली आवडती रेखाटनं, चित्रं शोधून ती एका वहीत चिकटवूनही ठेवली होती. आणि आता यातलं एकेक चित्र बघून काढायचं असं सुरुवातीला तिनं ठरवलं खरं पण आता तिलाच ती एकसारखी चित्रं पाहून तसंच काढण्याचा कंटाळा आला होता. पण रोज एक चित्र काढायचं म्हणून तर बाबांनी त्यांचा कॅन्व्हास, ड्रॉइंग बोर्ड, त्यांच्या पेन्सिली असं सारं काही रमाला वापरायला दिलं होतं.
ज्या दिवशी चित्र काढलं जाणार नाही त्या दिवसापासून बाबांचं हे सगळं सामान रमाला वापरता येणार नव्हतं. शिवाय बाबांची अजून एक अट होती. खरंतर चित्र काढण्यापेक्षा ती ‘अट’ सांभाळणंच रमाला अवघड जात होतं. आपण निवडलेलं चित्र का निवडलं? त्यात काय वेगळेपण आहे असं तिला सांगायचं होतं. प्रत्येक चित्रातलं वेगळेपण हुडकणं हे खूपच कठीण काम आहे असं रमाला जाणवू लागलं. शिवाय चित्राची माहिती काय द्यायची? का द्यायची? हे ही तिला समजत नव्हतं. एकदोनदा तिनं आईची, मैत्रिणींची मदत घेऊन बघितलं पण तरीही ते फारसं जमलं नव्हतचं.
आज तर कहर झाला होता. जवळपास निम्मा दिवस गेला तरी साधं रफस्केचही झालं नव्हतं. झालं ! आजचा चित्र काढण्याचा आपला शेवटचा दिवस, असं वाटून रमा खट्टू झाली. एका कोऱ्या पेपरवर तिच्याही नकळत नुसत्याच उभ्या आडव्या रेषा काढू लागली. तेवढ्यातच आई आली आणि तिनं ते पाहिलं, “ काय रमाबाई ! आज लक्ष लागत नाहीये वाटतं चित्र काढण्यात. काय होतंय काय ?” बोलत बोलत आई तिच्या शेजारी बसली. “काय करू गं आई ! मीच सगळा घोळ घातलाय. या सुट्टीत फक्त चित्रकलाच शिकायची म्हणून बाबांना सांगितलं. त्यांनी त्याप्रमाणे कसं कसं करायचं तेही सांगितलं त्याप्रमाणे मल जमेल तितकं मी केलंही. पण आता मला कंटाळा आलाय. दोन महिने तेच तेच काम ठराविक वेळेत करायचा. बाहेर बघ नं सगळे मजा करतायत. मला मात्र बाबांच्या अटी पूर्ण करत बसावं लागतंय.’’ एकदम हिरमुसल्या आणि रडक्या आवाजात रमानं आपलं गाऱ्हाणं सांगितलं.
“हे बघ रमा ! पहिल्यांदा तो हिरमुसला स्वर काढून टाक पाहू. अशा रडक्या मनोवृत्तीतून केलेलं काम एकतर नीट पूर्ण होत नाही आणि चांगलंही होतं नाही. आणि बाबांची अट ही तुला सक्ती वाटत असेल तर सांगून टाक नं बाबांना मला नाही जमतय तुमच्या सांगण्यानुसार चित्रं काढणं. काहीतरी उपाय सुचवतील ते नाहीतर करू नको म्हणतील. अट घातली याचं अर्थ असा नाही की तुला नाही जमलं तरी काही करून तू ते केलंच पाहिजे.”
“अगं पण मग परत मला ते त्यांचं सामान वापरू देणार नाहीत नं. तसं त्यांनी स्पष्ट सांगितलंय.” “मग काय बिघडलं त्यात रमा ! मुळातच अट म्हणजे काय ? ती तुला बाबांनी कशासाठी घातली ते कळालं का तुला ? रमा ! अट पाळण्याआधी ती का घातली गेलीये हे नीट समजून घे. म्हणजे मग तुला त्याचं ओझं वाटणार नाही. शिवाय तुझ्या अडचणीतून तुलाच मार्ग सापडेल. आता पंधरा दिवसांपूर्वीचा प्रसंग घे. सुट्टीत काय करायला आवडेल असं बाबा तुला विचारत होते ना ? तुला त्यांनी इतर पर्याय दिले होते नं ? मग तूच हा पर्याय निवडलास की नाही, मग का बरं निवडलास ?”
“कारण मला चित्रकला आवडते. मला त्यातच करियर करायचं. आजोबा ज्या चित्रकारांच्या निरनिराळ्या गोष्टी, इतिहास सांगतात नं तो मला खूप आवडतो. ए आई, थांब थांब! मला एक वेगळंच चित्र सुचतंय. ”
“ हो का छानच की. पण थांब रमा ! कुठल्याही गोष्टीला तत्काळ होकार किंवा नकार द्यायची सवय काढून टाक.”
“खरंतर हे मी तुला सांगणार नव्हते कारण आमच्या दोघांच तसं ठरलं होतं. पण आता तुझी बाबांना समजण्यात गफलत होतीये. त्यामुळे गैरसमजाचं हे तण वेळीच उपटलेलं बरं ! बाबांनी ही अट तुला एवढ्यासाठी घातली की एखादी गोष्ट तुला खरंच मनापासून आवडते का ? हे त्यांना पारखायचं होतं. रमा ! माणसाला आपल्याला एखाद्य गोष्टीची आवड नक्की किती खोल आहे, आतून आहे हे समजण्यासाठी, उमजण्यासाठी अट आवश्यक असते. तुला चित्रकलेची खरोखरंच आवड असेल तर या सगळ्या अटींवर तू मार्ग शोधशील. बाबा मागं म्हणाले होते बघ, जाणत्या व्यक्तींचा सल्ला घे. आठवतंय का ? मग या बाबतीत आपले बाबा जाणते आहेत, तर तू त्यांनाच माझी अशी अशी अडचण आहे, तर तुम्हीच यातून मार्ग सुचवा असा सल्ला का नाही मागितलास? यात कमीपणा कसला ? ”
“आपल्या आवडत्या कामात कधीच अडथळा येणार नाही किंवा ते सतत आपल्या मनाप्रमाणेच घडेल असं नाही होत. काम असो, खेळ असो अभ्यास, करमणूक काही असो अडथळे हे येणारच. त्यांचीही सवय पाहिजे म्हणून या अटी. या अटी म्हणजे डॉक्टर काकांच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘मेडिसिन’ आहे. मला सांग औषध घेताना काही पथ्य आपण पाळतो की नाही, तशाच या अटी असतात. त्या पाळल्या नं की आपलं काम निरोगी राहतं. निरोगी म्हणजे जास्तीजास्त चांगलं, सकस. सत्व असणारं, म्हणजे अजिबात चूकच नाही असं नाही हं. पण चूक दुरुस्त करता येईल असं काम केलं जातं. अधिक दोषरहित होण्यासाठी. औषधं घेतो म्हणून आपण सारखं आजारी पडतो का ? सारखं पथ्य पाळतो का? नाही नं. मग ठराविक परिणाम दिसण्यासाठी ठराविक पथ्य पाळलं पाहिजे."
"आता आज तू फक्त विचार कर. जमत नसेल तर चित्र नको काढूस. मी बाबांना सांगते आजच्या दिवस सूट द्यायला. कारण अटी असतात तिथं सूटही लागू असतातच की नाही. मात्र बाबांच्या अटींवर विचार करून तुला त्यामागचं कारण समजून घ्यायचंय. तेव्हा आता सामान नीट आवरून ठेवा आणि खेळायला पळा. बाहेर सगळे वाट बघतायत.” आई उठता उठता म्हणाली.
रमा मात्र अजून कागदावरच्या रेषातच गुरफटली होती. चित्रं पूर्ण काढून झाल्यावरच खेळायला गेली.
ऐन कामाच्या गडबडीत फिनिशिंग केलेलं चित्रं सेव्ह करायचं विसरली आणि मशीनच हँग झालं. या अटीतटीच्या प्रसंगी रमाला ही अटीची शिकवण आठवली.
Best Betway Casino 2021 | Exclusive 100% Bonus up to 1600!
ReplyDeleteSign 토토사이트홍보게시판 up with 스피드 바카라 the 토토 검증 먹튀 랭크 best 포커게임 betting site 안전 바카라 and start your gambling journey with Betway. Sign up today!