Ti 2
ती ……………. भाग २
नेहमीप्रमाणे दिवस कामात व्यस्त जात होते आता तिची आणि माझी जरा गट्टी जमली होती. रोज संध्याकाळी आणि सकाळी तिची भेट होऊ लागली होती . बरेच वेळा माझ्या आधीच ती आलेली असायची. मी येताना दिसले कि आपण होऊन पुढे यायची . " नमस्ते दीदी ! काल बस मध्ये लई गर्दी होती ना? तुम्हाला जागाच भेटली नाही. " मी म्हणल , " हो ना ! काय करणार , चालायचच . " थोडा वेळ शांततेत गेला. मग तिचे ते टपोरे डोळे उत्साहाने बोलू लागले. काहीतरी तिच्या कन्नड भाषेत ती बरोबरीच्या तिच्या मैत्रिणीला सांगू लागली . बहुदा ते आमच्या दोघी बद्दल बोलण असाव .
रोज आम्ही दोघी भेटलो कि आम्हाला एकमेकींशी बोलताना पाहून आजूबाजूचे इतर लोक आमच्याकडे आश्चर्याने पाहत असत. तिच्या मैत्रीणीना नवल आणि कौतुक वाटे . त्यांचे चेहरे पाहून समजत असे. त्या जरा अलीकडे तिला बिचुकून असतात , अस आपल मला वाटे . कारण ती होतीच तशी त्या सगळ्यांपेक्षा वेगळी. तिच्या चेहऱ्यावरून तिच्या बुद्धिमत्तेबद्दल अंदाज बांधता येत होत. खास करून तिचे डोळे पाणीदार आणि मासोळी सारखे लांब होते. तिच्या व्यक्तीमत्वात एकूणच चपळपणा, तरतरीतपणा जाणवे . जणू काही सर्व गोष्टी आपल्याला जमू शकतात नि समजू शकतात अस तिच्या वागण्यातून जाणवे तो निश्चितच गर्व नव्हता , आत्मविश्वास होता. कारण तिच्या बोलण्यात आणि वागण्यात देखील नम्रपणा होता . सकाळ असो कि संध्याकाळ असो ती कायम फ्रेश कशी याचे मला नवल वाटे . कारण तिचे काम तसे कष्टाचे होते .
अशीच तिच्या बद्दल विचार करण्यात मी दंग होते तेव्हढ्यात तिचे माझ्या हातातल्या अक्कलकोट स्वामीच्या अंगठी कडे लक्ष गेले आणि ती एकदम ती ओरडली , " दीदी !" काय झाले मी एकदम दचकले. "तुमच्या हातात हि अंगठी कोणाची ? ते स्वामी आहेत ना !" मी म्हणले " हो " पण हिला स्वामी माहित असतील का नाही ते मला माहित नव्हते त्यामुळे मी म्हणले, " सोलापूर जवळ ते एक अक्कलकोट म्हणून गाव आहे नं तिथले हे स्वामी आहेत त्याची हि अंगठी आहे. " " मला माहित आहेत जी ते स्वामी , मी मूळ अक्कलकोटचीच राहणारी आहे . आम्ही तिथे होतो ना तेव्हा रोज मठात जायचो . " तिच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसंडून वहात होता . जणू काही तिला तिच्या गावातलीच कोणी तरी व्यक्ती भेटली आहे. आता मात्र मलाच आनंद झाला होता कारण स्वामींवर आमची घरातल्या सर्वांची अपार श्रद्धा आहे. आणि हि देखील स्वामी भक्त निघाली तर . मला आता तिच्याबद्दल जास्त जिव्हाळा वाटू लागला.
तिला अजून बोलते करण्यासाठी मी म्हणले , " तू काही शाळा शिकली आहेस का ग ?" यावर मान डोलावून ती म्हणली 'हो ' पण ती जरा गंभीर झाल्यासारखी वाटली. पण मला आता शांत बसवेना मी लगेच पुढे तिला विचारलं , " किती शिकलीस ?" यावर तिने आपले पाणीदार डोळे रोखून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली , " एडसड ". मला काही कळेना हि अशी काय बोलतीये आता आजूबाजूचे लोकही एकदम आमच्याकडे पाहू लागले . मला एकदम ओशाळवाणे झाले . मी म्हंटल, "काय ? मला नाही समजल काय शिकालीये?" यावर तीही जरा वेळ गोंधळली असावी जरासा विचार करून म्हणाली , " ते इंग्लिश मध्ये नसत का हो दीदी अठ चा वर्ग ." दोन मिनिटांनी तिच्या बोलण्यातला उद्देश माझ्या लक्षात आला आणि मला खूप हसू आले. माझ्याकडे पाहून तीही हसू लागली, मला म्हणाली, "काय झाल दीदी तुम्ही का हसता ?" मी म्हणल अग तू आठवी शिकली आहेस का ? परत ती माझ्याकडे बघू लागली . मग मी हाताच्या खुणे तिला आठ आकडा करून दाखविला तिला लगेच कळल. ती हो म्हणाली . मग मी तिला विचारलं . " तू एडसड अस का सांगितलस ?" तिच्या नंतरच्या बोलण्यावरून मला कळाल कि तिला 8th std अस सांगायच होत पण ते तिला नीट सांगताच आल नाही. तेव्हढ्यातच आमची बस आली आणि पुन्हा आमचा संभाषणाचा धागा तुटला.
Comments
Post a Comment