History

इतिहास 
शाळेत बऱ्याच जणांना न आवडणारा विषय. पण मला मात्र इतिहास विषय बद्दल कुतूहल वाटायचे आणि त्याबद्दल बरेच प्रश्न हि पडायचे. पहिला प्रश्न हा कि ह्या इतिहासातल्या गोष्टी कोणी लिहिल्या ? कारण त्या सर्व  गोष्टींना  इसवीसन शके  अमुक अमुक साली लिहित. हे इतक कोणी आणि का लिहित असेल ? बर ते सांभाळून का ठेवत असतील आणि कुठे ठेवत असतील ? लिहिणाऱ्या माणसाचं अक्षर छान असेल का ? तो कुठल्या पेनने लिहित असेल ? आमच्या पेपर वर पाणी पडल कि त्याची अक्षर पुसट  होतात त्यांची कशी  इतकी दीर्घकाळ चांगली राहतात ?  शिवाय त्याने ते जाड पानांच्या वहीत लिहील असेल का ? तेव्हा बाईडिंग ची सोय नसताना ते सुरक्षित कस राहील ? आमची पुस्तक तर पुढच्या वर्षा पर्यंत हि टिकत नाहीत ह्यांचीच कशी टिकतात ? आणि लिहील तर  लिहू दे ना !  पण आम्हाला  का ते शिकवावं ? ह्यातून  काय फायदा ?  हे आणि  असे किती तरी प्रश्न मला पडत.

जसे जसे वरच्या इयत्ता मध्ये गेले तस तशी इतिहासाची गोडी लागली. एक सनावळ्या सोडल्या तर बाकी कशाचा त्रास नव्हता. तरी देखील अधून मधून इतिहास संशोधनात माझ्या बौद्धिक क्षमते नुसार आणि मनानुसार मी कालगणना उलट सूलट केली होती आणि मार्कांचा आणि शिक्षकांचा मारही खाल्ला आहे.  म्हणजे इतिहासात माझ पार पानिपत झाल होत.

साधारण ८-९ इयत्तेमध्ये "कलेचा इतिहास " हा विषय सुरु झाला आणि मला इतिहासाची गोडी नकळत पण अगदी मनापासून लागली. त्या मध्ये असलेल्या गोष्टी मध्ये मला रस वाटू लागला. प्राचीनकाळच्या वस्तू , मूर्ती कला, स्थापत्य कला, चित्रकला यांमध्ये माझं मन रमल. आणि वाटल इतिहास हा विषय केवळ चेष्टेचा नाही तर त्यात खूप काही महत्वाच सापडू शकत जे आपल्याला माहित नाही. एखाद्या रहस्यमय कादंबरी सारख इतिहास वाटू लागला. एखाद्या किल्ल्याच दार उघडावं आणि  समोर आश्चर्याने थक्क होऊ अशी भव्य वास्तू असावी. त्यात अनेक निरनिराळ्या प्रकारची दालनं असावीत , आणि खूप छुपे असे रस्ते असावेत, गुप्त दरवाजे असावेत जेणे करून एका जागे वरून दुसऱ्या जागी क्षणात जाता याव. शत्रूच्या आक्रमणा पासून वाचायला भुयार असावे असे बरेच काही मला इतिहासाबद्दल वाटू लागलं. 

किल्ल्याच्या भिंती मधले दगड माझ्याशी बोलू लागले , तिथल्या मूर्ती मधली  धातुकला मला खुणावू लागली,  मग या कलेच्या इतिहासात मला चित्रकार, शिल्पकार , वास्तुशास्त्रकार , मूर्तिकार , धातू विद्या असे सगळे वेगळेच जग भेटू लागले आणि माझे कुतूहल वाढवू लागले . आणि मग यातून अनेक गमती जमाती माझ्या पुढ्ये आल्या. 

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज