Aziz be chi shokantika

अझिझ  बे ची शोकांतिका 


........ तुझ्यासाठी अश्रू ढाळून आता हृदय थकलं आहे
अश्रू गोठले आहेत आणि मनही गोठलं  आहे ...........

असे आयुष्यातील विफलतेचे सूर आपल्या तंबोऱ्यावर आळवणाऱ्या 'अझिझ बे' या मनस्वी कलाकाराची  ही एक शोकान्तिका .

" अझिझ  बे ची शोकान्तिका " हा तुर्की भाषेतील प्रसिद्ध लेखिका आयफर टंक यांच्या ' अझिझ  बे इंसीडन्ट ' या कादंबरी चा अरुणा दुभाषी यांनी मराठीत केलेला उत्कृष्ट अनुवाद होय. तुर्की भाषेतील महत्वपूर्ण व सर्वाधिक विक्री होणारी कादंबरी म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. एका कलाकारावरच्या जीवनावर आधारित असल्याने ही अतिशय उत्कट, थेट मनाला स्पर्श करणारा आणि व्यामिश्र अनुभव वाचकाला देते. तुर्की या संस्कृतीचा तेथील सामाजिक परिस्थितीचा परिचय ही कादंबरी आपल्याला करून देते.

अझिझ  बे या कलाकाराच्या एकाकीपणात ओढवलेल्या मृत्यूपासून या कादंबरीची सुरवात होते. या दुःखी शेवटाची कारणमीमांसा करताना, गतकाळातील आठवणींच्या कथनातून अझिझ चा जीवनपट वाचका पुढे उलगडत जातो. अझिझ चे अत्यंत सामान्य परिस्थितीतले बालपण, त्याच्या वडिलांची हुकूमशाही तर आईची असहाय्य प्रवृत्ती, अझिझ चा उडाणटप्पू स्वभाव या साऱ्यातून एक दुराभिमानी कलावंत तसेच हेकट, मनस्वी, अय्याशीखोर, व्यक्तीमत्व सतत जाणवत. पुढे पुढे तर असफल प्रेमाने होणारी ससेहोलपट, स्त्रियां बद्दलचा गैरसमज, जीवनाबद्दल बेपर्वा वृत्ती ही  सर्वसामान्याना विचार करायला भाग पाडते. यामध्ये केवळ त्याच्या प्रेमाची असफलता नाही तर एकंदरीत त्याच्या सर्व नात्यात असलेली असफलता जाणवते. एक कलाकार तो ही नशिबाच्या साहाय्याने बनलेला म्हणून काही काळासाठी समाजात त्याला मान मिळाला असला तरी एक मुलगा, पती  या नात्यात तो सतत अयशस्वी ठरला आहे.

मरियन या उथळ स्वभावाच्या तरुणीच्या प्रेमात पूर्णपणे बुडाल्यामुळे स्वतःचा अधःपात करून घेणारा, घरादारावर पाणी सोडून निघून जाणारा, सैराटलेला मुलगा वाटतो. परप्रांत, अनाकलनीय भाषा, भिन्न आचार-विचार, विविध माणसं या साऱ्याला तोंड देतादेता कालांतराने आपले प्रेम म्हणजे एक फसवे मृगजळ असल्याचे त्याला लक्षात येते आणि  पूर्णपणे परक्या असलेल्या देशाला रामराम ठोकून स्वदेशी परतण्याची ओढ त्याला लागते. स्वदेशी आल्यानंतर स्वतः च्या हटवादीपणामुळे आईवडिलांना कायमस्वरूपी गमावल्याने, खऱ्या अर्थाने तो एकाकी भरकटलेले जीवन जगू लागतो. या एकाकीपणावर मात करण्यासाठी ' वुसलत ' ह्या गरीब  मुलीशी विवाह करतो. या विवाहामुळे  वुसलत च्या रूपात खरंखुरं  प्रेम त्याच्या आयुष्यात आलेल असत परंतु त्याला त्याचही महत्व वेळेत कळत नाही. तरीही अत्यंत संयमित वुसलत शेवट पर्यंत त्याची तिच्यापरीने साथ देते. तिच्या अगदी मृत्यूच्या क्षणी त्याला तिचे प्रेम, तिचे अस्तित्व याची जाणीव होते पण तो पर्यंत फार उशीर झालेला असतो. वुसलत च्या मृत्यूने मात्र तो खचतो आणि तिथूनच त्याच्या शेवटच्या दुःखमय प्रवासाला सुरवात होते.

या कादंबरीत अनेक नात्यांचा दुःखद अंत झालेला आढळतो. स्वतःच्या हटवादी वृत्तीने अझिझ ने स्वतःवर देखील अन्याय केल्या सारखा वाटतो. जे आयुष्य तो चांगलेपणाने घडवू शकला असता तेच चुकीच्या वर्तनाने बरबाद करतो. त्याच्याकडे पाहताना एकाच वेळी मनात राग आणि अखेरच्या क्षणी दया या दोन्ही भावना निर्माण होतात. ही कादंबरी अत्यंत वास्तव वाटते कारण यातील कुठल्याही पात्राला लेखिकेने रंगरंगोटी करून उठाव आणलेला नाही. ही सर्व पात्र स्वाभाविक वागतात, ती परप्रांतीय आहेत पण त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांची वैचारिकता ही अनेक मानवी भावभावनांचे कंगोरे आपल्याला सहजगत्या उलगडून दाखवते. यातील निरनिराळ्या ठिकाणांचे तसेच, प्रसंगांचे यथोचित वर्णन हे देखील कादंबरीच्या यशाचे गमक म्हणता येईल. कमीत कमी शब्दात जास्तीजास्त आशयपूर्ण विषयाची मांडणी हे लेखिकेचे कौशल्य आहे. कादंबरीचा शेवट जरी माहीत असला तरी तो कसा झाला ह्याची उत्सुकता वाचताना वाढत जाते. संपूर्ण कादंबरी वाचून झाल्यावर जाणवते की अपमानित आणि एकाकी झालेला अझिझ  चा मृत्यू हा अनपेक्षित नाहीच. त्याच्या आत्तापर्यंतच्या वर्तवणुकीचा तो परिणाम आहे तो जर लेखिकेने बदलला असता तर  मात्र ही कादंबरी साधारण झाली असती. पण तसे न केल्याने ती जास्त भावते. अझिझ या उर्दू, तुर्की शब्दाचा अर्थ आहे - प्रिय, सन्माननीय, सामर्थ्यशाली  असा. परंतु या कादंबरीतील अझिझ चे व्यक्तीमत्व व त्याचे जीवन या अर्थाशी पूर्णतः विसंगत आहे.


कादंबरीचे  मुखपृष्ठ अगदी समर्पक आहे. मोठ्या आकाराचा तंबोरा हे  कलेचे  प्रतीक वाटते ज्याने त्याचे जीवन व्यापले आहे. तर त्यावर आकाराच्या मानाने जास्त मोठी असलेली त्याची काळी छाया अझिझ त्याच्या गर्वोन्मत्त स्वभावाचे आणि त्याच्या आयुष्यातील दुःखी कालखंडाचे प्रतिनिधित्व करते. पांढऱ्या रंगाची पण हिरव्या आणि निळ्या रंगाची पार्श्वभूमी असलेली चंद्रकोर ही अस्तंगत जाणाऱ्या कलेचं , जीवनाचे  प्रतीक वाटते. वरील गोलाकारात असेलेल्या इमारती या तुर्की प्रदेशा च प्रतीक वाटतात.

एक  विषण्ण अनुभव देणारी ही कादंबरी असली तरी देखील वास्तवाची खोल जाणीव करून देण्यात यशस्वी ठरते.

















Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज