Eka Prem Vedya Mushafirala Salam !! Salam!! Salam!!

एका प्रेमवेड्या मुशाफिराला 
                                 सलाम ! सलाम ! सलाम !


       जीवनाचे गाणे आनंदाने गात गात मजेत जगावे असे सांगणारे आणि  प्रत्यक्षात स्वत : तसे जगणारे आपले लाडके कवी मंगेश पाडगावकर हे आता आपल्यात नाही हि खंत कायमच मनात राहणार आहे. तरी देखील त्याचं शब्दातून आपल्याशी संवाद साधण  हे चालूच राहणार आहे ते केवळ त्यांनी केलेल्या त्यांच्या अजरामर कवितां मुळेच.  
       एखादा कलाकार हा नेहमीच त्याच्या रसिकांशी  त्याच्या कलाकृतीद्वारे संवाद साधत असतो . त्याच्या मध्ये आणि आपल्या मध्ये नकळत एक ऋणानुबंध तयार होत असतो . आणि त्यासाठी प्रत्येकवेळी त्याच्याशी भेटण्याची च गरज आहे अस नसत. कवी मंगेश पाडगावकर यांच्या बाबतीत तसेच आहे. प्रत्यक्षात त्यांना कधी भेटण्याचा योग आला नाही तरीही त्यांच्या कवितां मधून ते नेहमीच  भेटत गेले.   लहानपणी "सांग सांग भोला नाथ पाउस पडेल काय ?" हे गाण मला फारच आवडायचे. खरोखरच पाउस पडून शाळेला बुट्टी मिळाली तर किती मजा  येईल, असा विचार तेव्हा यायचा.  तुमच्या आवडीच एखाद गाण म्हणा पाहू अस कोणी म्हंटल कि हेच गाणं  म्हंटल जायचं. किशोर वयात असताना "दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे" हे गाणे  नकळत गुणगुणले जायचे. आणि तारुण्यात तर "लाजून हासणे अन हासून ते पहाणे " , "चंद्र आहे साक्षीला ", "अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी " इ. इ. अशा कितीतरी गाण्यांनी आपल्या भावनांना त्यांनी शब्द रूप दिले आहे . 
       "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमच आणि आमच अगदी सेम असत" अस दिलखुलास पणे  म्हणायला शिकवणारे हे कवी अफाट लोकप्रिय नसतील तर नवलच ! त्यामुळेच ते गेले अन प्रेमाचे सूर पोरके झाले अशी मनाला जाणीव झाली . केवळ तेव्हढेच नव्हे तर जीवनावर आपल्या जगण्यावर सुद्धा "शतदा प्रेम करावे " असे ते सांगत तेव्हा खरोखरच त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास "जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद " असे वाटायचे . आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्या शब्दांमध्ये होते.  
         धारा नृत्य , जिप्सी , बोल गाणी आणि असे किती तरी काव्य संग्रह आहेत जे कितीदा हि वाचले तरी परत परत वाचावेसे वाटतात. त्यातील गोडी तशीच राहते. अत्यंत उत्कट , प्रसन्न  आणि तरल भावनांची निर्मिती त्यांच्या कवितेमुळे होते. सहज सोपे शब्द्द, मनाला स्पर्श होणारे विषय त्यांच्या कवितेतून जाणवतात. आयुष्याचा नेमका अर्थ अगदी कोणतेही बोजड शब्द न वापरता, कोणत्याही तत्वेत्त्याची भूमिका न बजावता  सरळपणे त्यांच्या कवितेत मांडत. आमच्या पिढीला कवितेची ओढ लावण्यात त्यांच्या कवितेचा वाट मोठा असेल हे नक्की. त्यामुळे ते आजही कवितेच्या माध्यमातून आपल्याशी बोलत आहेत. त्यांच्या बाबतीत अस म्हणता येईल कि पाडगावकर सर तुम्ही जाणवून दिलत की 
 " कविता  म्हणजे केवळ शब्द च न्हवे , 
    कविता होती तुमचा श्वास  
    कविते शिवाय तुम्हास पाहणे 
    हा तर प्रतिमेचा च आभास "!


Comments