प्रियन ,


असा कसा आहेस रे तू ??
शेजारच्या अंगणातल्या
पारिजाताका सारखा,
जिथे मूळ आहेत तिथे तर
दरवळतोस  पण
शेजारच्या अंगणाशीही
किती लगटतोस ?
मला तुझं हे वागणं
मुळीच पटत नाही प्रियन !
चाकोरीतलं आखीव रेखीव
जगणं मान्य असताना,
तुझं हे आगंतूका सारखं
माझ्या अंगणात मध्येच डोकावणं
आणि आपल्या मनमोहक सुगंधाने
मनात घर करून राहणं
मला नाही सोसत आता
तुला काही कल्पना नाही रे
माझ्या सीमित जगण्याची
संस्कारात बांधलेल्या मनाची
किती घालमेल करतोस तू?
सगळं बंधन झुगारून
तुला हातात घ्यावं
मनसोक्त सुगंध अनुभवावा
तर एक भीती
त्याची सवय झाली तर ?
एक क्षण मोहून मी
तुला स्पर्श केला
आणि लगेच विरक्तीन
देवाच्या चरणी वाहील
वाटलं चला बरं झालं
ज्याचं देणं त्याला दिलं
रिकामे हात घेऊन परत येताना
मन काहीस हुरहुरलं खरं
आपसूकच हात जवळ आला
तो काय ? क्षणभराच्या सहवासानेही
माझी ओंजळ सुगंधाने भरलेली
प्रियन !
आता हा सुगंधी हात लपवावा तरी कुठे ????



Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज