स्मृतीला पालवी फुटली
काल रात्री आईच कपाट आवरताना एक जुना फोटोंचा अल्बम सापडला. बघावा की न बघावा या विचारत असतानाच चुकून त्यात न मावणारा एक फोटो खाली पडला त्याला उचलायला गेलं तर अल्बम उघडला गेला आणि क्षणार्धात गत स्मृतीला पालवी फुटली. आठवणींच्या पालवीचं एक वैशिष्ट्य तिला तुम्ही स्वीकारलं किंवा दुर्लक्षलं तरी तिला फारसा फरक पडत नाही. ती येतानाच तिच्या सामर्थ्यासह येते आणि पाहता पाहत वृक्षाएवढी होऊन आपल्याला तिच्या सावली खाली घेते. तुम्ही कितीही प्रयत्न करा पण तिच्यापेक्षा उंच होऊच शकत नाही. माझंही अगदी तसंच झालं तिने मला आपल्या सावली खाली घेतलं आणि एकेक आठवणी पिकल्या पानांसारख्या गळून पडायला सुरवात झाली. आता पाऊल उचलून पुढं जण शक्यच नव्हतं कारण आजूबाजूला असंख्य आठवणी पानांच्या स्वरूपात पडल्या होत्या. त्यावरून जावं तर त्या कायमच्याच संपणार होत्या. त्यामुळं तिथेच उभा राहून त्या आठवणींना पुन्हा गोळा करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. या सगळ्या पानात एक कोवळ्या आठवणीच नुकतंच पालवलेल पान दिसल कुतूहलानं तिला उचललं तर माझी मीच मला ओळखेना. अवघी १०-१२ वर्षांची मी. कोणाच्या तरी लग्नात जायचं म्हणून हिरवंगार परकरपोलक घालून नटलेली. कुठल्याही सौंदर्य प्रसाधांशिवाय खुललेली. तयार होऊन बाहेर पडले तर शेजारचे अच्युत काका म्हणाले, " अरे व्वा ! काय गोड दिसतेस ग तू अगदी टपोऱ्या कळी सारखी." लगेच मला थांबवून घरात जाऊन कॅमेरा घेऊन आले. चल गच्चीवर फोटो काढू म्हणून मला गच्चीवर घेऊन गेले आणि माझा फोटो काढला. उन्हाच्या त्रासाने मला नीट डोळेही उघडता येईना. तरीही थोडे किलकिले डोळे करत मी फोटो काढायला तयार झाले. आणि दोनतीनदा प्रयत्न करत जराशी सावली शोधत फोटो काढला. नंतर दोघेही उन्हात बऱ्याच वेळ उभं राहिल्याने घामाघूम झालो होतो. पण मनाने उत्साही, आनंदी होतो. आज आठवणींचा रूपात पुन्हा तो क्षण जागल्याचा आनंद मिळाला. जणू काही उन्हाच्या तडाख्यात एका प्रेमळ सावलीचा गारवा मिळाला. धन्यवाद !!! अच्युत काका !!!. एका कोवळ्या आठवणीच बीज माझ्यासाठी पेरून ठेवलंत. जे मला अजून फुलायला मदत करेल.
प्राची प्लीज तुझ्या बाबांना दाखव ग. त्यांनी काढलाय हा फोटो.
प्राची प्लीज तुझ्या बाबांना दाखव ग. त्यांनी काढलाय हा फोटो.
Comments
Post a Comment