डिअर जिंदगी
आजकाल सत्तेच्या स्पर्धेच्या काळात खुर्चीच महत्व काय ? हे कोणाला वेगळं सांगायलाच नको. पण कालच पाहिलेल्या डिअर जिंदगीने मात्र खुर्चीचा एक वेगळाच अर्थ सांगितला. खुर्ची हे केवळ बसण्याचं साधन नाही ती आपल्याला मान सन्मान तसेच काही निवांत निश्चिन्त क्षणही देते. पण जर ती योग्य प्रकारे निवडली नाही तरी तणावाला करणीभूतही ठरू शकते. हे जाणून घ्यायला तरी हा सिनेमा पाहायलाच हवा. केवळ चांगला आशय आणि चांगले कलाकार या पेक्षाही उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि आर्ट डिरेक्शन या दृष्टीने हा सिनेमा खूपच चांगला ठरतो.
सिनेमाची स्टोरी मी मुद्दाम सांगणार नाही पण एक मानसोपचार तज्ञाच घर, एका मनस्वी कलाकाराचं घर हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी इतकं सुसंगत आहे की कमी संवादात पण नेमकी सिच्युएशन समजते. एखाद्या व्यक्तीची मानसिक अवस्था आणि तीच वर्तन, तिचा जगाकडे, स्वतः कडे बघण्याचा दृष्टिकोन याचा खोलवर अभ्यास या सिनेमातून जाणवतो. वेगवेगळ्या प्रतिमांमधून आशय अधिक प्रभावीपणे मांडण्यात आलाय याच उत्तम उदाहरण म्हणजे मानसोपचारतज्ञान घराबाहेरील बागेत सायकलचं चाक दुरुस्त करणं, त्याच्या मते तो रसायकलिंग करतो. हा भाग एका मानसोपचाराच्या दृष्टीने खुपच महत्वपूर्ण आहे कारण मानसोपचारतज्ज्ञही एक प्रकारे आपल्या विचारांचे रिसायकलिंग करत असतो. योग्य - अयोग्य विचारांना हाताळण्याची क्षमता वाढवणं, कौशल्य विकसित करणं हे एक प्रकारे रिसायकलिंगच आहे. आणि ते या सर्वांतून अतिशय सुंदरपणे मांडले आहे.
एका विशिष्ट नात्यापासून सुरु झालेली गोष्ट ही नकळतपणे इतर नात्यांवरही कसा प्रभाव पडते ते इथे दिसून येत. वरवर पाहता ती एका नात्याची गोष्ट किंवा व्यथा नाही, ती सगळ्याच नात्यांची व्यथा आहे असे जाणवते. कुठलंही नातं कधीच एकदम परफेक्ट नसतं. आपण सगळे एकाच नात्यात विविध अपेक्षा पूर्ण होण्याची इच्छा करतो. पण प्रत्यक्षात तसं होणं शक्य नसतं. वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी नाती आवश्यक असतात. हे लक्षात न घेतल्याने नात्यात दुरावा येतो आणि आपण त्याचा दोष स्वतःला आणि इतरांनाही देतो. ही आपणच आपल्याला केलेली शिक्षा असते. नकारात्मक जीवनाची सुरवात असते.
आजकालच्या धकाधकीच्या आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या काळात नाती टिकवणे हे खुपच अवघड झालं आहे. त्याच्याने तणाव वाढत आहेत. परिणामी मानसिक आजारही वाढत आहेत. पण अजूनही मानसिक आजारांकडे ' निरोगी ' दृष्टीने बघतले जात नाही. शारीरिक आजार इतके महत्व त्याला दिले जात नाही पण ते वेळेत देणे किती महत्वाचे आहे हे या सिनेमातून सहजपणे सांगितले आहे.
Comments
Post a Comment