आपले सण आपली संस्कृती, निसर्गचित्रे

                                                                                                   credit :- sahitysuchi magzine/ rasik sahity

आपले सण आपली संस्कृती, निसर्गचित्रे

समुद्रे वसने देवि  पर्वत स्तन मंडीते 
विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शम क्षमस्वमे
प्रातः काळी जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिची क्षमा मागणारा, तिला देवत्व देणारा हा श्लोक आजही कित्येक घरात हात जोडून मनोभावे म्हणला जातो.  सध्या जरी याचे प्रमाण कमी असले तरी ह्या श्लोकाचा अर्थ माहित नाही किंवा हा श्लोक माहित नाही असे अभावानेच आढळेल.  ह्या प्रातः कालच्या प्रार्थना आपल्या भारतीय संस्कृतीच्या अविभाज्य घटक आहेत. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे वर्षा गजेंद्रगडकर यांची नुकतीच वाचण्यात आलेली दोन पुस्तके. आपले सण आपली संस्कृती, आणि निसर्गचित्रे.

ही दोन्ही पुस्तके निसर्ग पर्यावरण आणि त्याच्यावर आधारित आपली संस्कृती, सण, उत्सव, परंपरा याबाबत उपयुक्त आणि रंजक माहिती देतात. प्रत्येक देशाला त्याची स्वतःची अशी परंपरा असते त्यांच्या काही धार्मिक चालीरीती असतात ज्या पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या असतात. कित्येकदा अंधानुकरणाने, या चालीरितींचा सखोल अर्थ माहित नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्षिले किंवा उपेक्षेने पहिले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीच्या बाबतीतही तसेच होऊ लागले आहे. ग्लोबलायझेशनच्या युगात वेगाने घडणारे तांत्रिक बदल आणि संस्कृतींची होणारी सरमिसळ पाहता आपल्या मूळ संस्कृतीचा उद्देश त्याचा भविष्यात होणारा परिणाम या सर्वांचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे. भारत हा देश जसा वेगवेगळ्या जातीधर्माने संपन्न आहे तसाच भौगिलक दृष्ट्याही विविधतेने तो  नटलेला आहे. कुठे उंचउंच पहाडी प्रदेश, बर्फाच्छादित हिमशिखरे तर कुठे वाळवंटी ओसाड प्रदेश,  अशी  भौगिलकता  असल्याने आहार-विहार, पेहराव चालीरीती यात फरक आहे. परंतु निसर्गाला अनुसरून जीवनमान हे या साऱ्यातलं सामान सूत्र आहे. निसर्ग पर्यावरण यांचा विशेष अभ्यास असणाऱ्या लेखिका वर्षा गजेंद्रगडकर यांनी तो विचार अतिशय सुंदर शब्दात ललित लेखनाच्या अंगाने मांडला आहे.
निसर्गचित्रे हे पुस्तक म्हणजे सुंदर सुंदर फुलांची बनवलेली आकर्षक माला आहे.  या पुस्तकात चैत्रापासून फाल्गुनापर्यंत चे बारा महिने आणि त्या काळातले ऋतू यांबाबत सचित्र माहिती देण्यात आली आहे. बारा महीन्यात होणारे ऋतुचक्रातले बदल आणि त्यानुसार त्यांच्याशी समरसता साधणारी आपली जीवनशैली यातून प्रभावीपणे जाणवते. लालित्यपूर्ण आणि ओघवती भाषा हे या पुस्तकाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सण उत्सव मागे असलेली प्रादेशिक भिन्नता, वेगवेगळ्या कथा यांचे शास्त्रशुद्ध स्वरूप सांगितले आहे. यातील सर्वच लेखातील महिन्यांचे वर्णन अप्रतिम आहे. प्रत्येक महिन्याचे शीर्षकही त्या त्या महिन्यातील सृष्टी बैभावाचे रूप दर्शविणारे आहे. जसे नक्षत्रजडित कार्तिक, तृप्त शांत ज्येष्ठ, रंग-गंधयुक्त वैशाख, आणि महिन्यांचे वर्णन तर अगदी चित्रमय शैलीतील आणि वाचकाला नवीन दृष्टी देणारे आहे. वैशाख म्हंटले की  लगेच वैशाख वणवा असे आठवते पण या व्यतिरिक्त "आसक्ती आणि विरक्ती या दोन्हींचा सुंदर मेळ घालणारा महिना असून सृष्टीशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ करणारा महिना" असं  त्याचे वर्णन केलं  आहे.  तसाच आषाढातलं हे पाणी सृष्टीला चिंब भिजवतं आणि न्हाऊन स्वच्छ झालेल्या भवतालाच रूप सर्वांगाने खुलून येत. झाडाझडुपांवर तर नवी झळाळी येतेच; पण काळे कठीण कातळही मायेने भरून आलेल्या डोळ्यांसारखे ओलसर प्रसन्न दिसतात. असे अतिशय सुंदर वर्णन आषाढाचे आहे. 
आपले सण आपली संस्कृती या पुस्तकात तर अगदी २६ जानेवारी पासून इतर सर्व भारतीय सणां मागची वैचारिक पार्शवभूमी, कथा  सांगितली आहे. त्यासोबतच गोडी वाढवणारी चित्रेही समाविष्ट आहेत. वसंत पंचमी, बैलपोळा, गौरीपूजन, महावीर जयंती, बकरी ईद, नाताळ आणि अगदी तुळशीचं लग्न याचाही समावेश करण्यात आला आहे. शिवाय भिन्नभिन्न प्रादेशिकता असलेल्या भागात हे सण कसे निरनिराळ्या पद्धतीने साजरे केले जातात तेही सांगितले आहे. इथेही पर्यावरणाच्या संस्कृतीत होणारा, आहार विहारात, होणारा बदल सांगितला आहे. आपली भारतीय संस्कृती हि निसर्गाच्या सान्निध्यात कशी कशी फुलत जाते ते इथे उत्तमरीत्या आणि सहज सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे. 
यो दोन्ही पुस्तकांतून आपल्या पूर्वजांच्या ऋतुमानाचा गाढा अभ्यास, त्यावर केला जाणारा सखोल विचार आणि त्यानुसार रचलेल्या परंपरा पाहता कौतुक करावे तितके थोडेच असे वाटते आणि त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. वेगवेगळे डे सेलीब्रेट करणाऱ्या आजच्या युवापिढीने तसेच भारतीय परंपरा ना वेगळं कालबाह्य  समजणाऱ्या पिढीने याचा जरूर विचार करावा असे हे पुस्तक वाचून जाणवते. जुने ते सोने असे जरी पूर्ण खरे नसले तरी ते सर्वच टाकाऊ ही नाही याचे भान हे पुस्तक आपल्याला करून देते.   

वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
 http://rasiksahitya.com/#/home









    

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज