पशुवैद्याची रोजनिशी


काल आपण सर्वानी जागतिक चिमणी दिन साजरा केला. त्यानिमित्ताने राजहंस प्रकाशनाचे पशुवैद्याची रोजनिशी हे अरुण जोशी लिखित पुस्तक हे खरोखर वाचनीय आहे. ज्यांना पशुपक्ष्यांची आवड आहे त्यांनी आवर्जून संग्रही ठेवावे असे पुस्तक. 

पशुवैद्याची रोजनिशी

Reviewed By : तृप्ती अमोल कुलकर्णी
Book Name : पशुवैद्याची रोजनिशी
Book Author : अरुण जोशी
Publisher : राजहंस प्रकाशन, पुणे
Page Size : 130
Price : Rs. 160
पक्ष्यांच्या रंजक गोष्टी अन् वैशिष्ट्यांचे अनोखे जग ‘पशुवैद्याची रोजनिशी!’ हे पुस्तक वाचले आणि नकळत नुकत्याच येऊन गेलेल्या ‘भो भो’ या मराठी चित्रपटाची आठवण झाली. या चित्रपटाचा खरा हिरो होता एक कुत्रा. आपल्या मालकिणीच्या खुनाच्या आरोपात अडकलेल्या ह्या कुत्र्याची, एका प्राणीप्रेमी इन्स्पेक्टरला खरा खुनी शोधण्यात कशी मदत होते, ते यात दाखवलं आहे.

डॉ.अरुण जोशी यांनी देखील या पुस्तकातून अशा काही गोष्टी, प्राणी विश्वातली रहस्ये सांगितली आहेत, की ती अनुभवल्याशिवाय आपण त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. अ‍ॅनिमल प्लॅनेट किंवा डिस्कव्हरी चॅनेल तसेच प्राणी आणि पक्षिमित्र संघटना यांच्यामुळे आपण सारे थोडे फार का होईना, पर्यावरण, पशु-पक्षी याबाबत जागरूक झालो आहोत. परंतु यापेक्षा अधिक काही माहिती कळण्याला हे पुस्तक एक उत्तम पर्याय होऊ शकते. यातील प्राणी आणि पक्षी यांच्या रंजक गोष्टी वाचताना आपण नकळत गुंगून तर जातोच, पण आश्चर्याने थक्क होतो.

रेड्याच्या मुखी वेद वदवणारे ज्ञानेश्वर आपणाला माहिती आहेत. तो चमत्कार जसा थक्क करतो, तसे इथे हवेत उडणारे मासे, उडणार्‍या खारी, उडणार्‍या पाली हे उष्ण कटिबंधात आढळणारे प्राणी आपल्याला त्यांच्या भौगोलिक वैशिष्ट्यांसह भेटतात. मंगल प्रसंगांत वापरला जाणारं नारळ किती कठीण असतो? पण तो न फोडता त्यातील खोबरे खाणारा एक आपला नेहमीचा परिचयाचा प्राणी आहे तो कोण आणि तो हे कसे साध्य करतो हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तकच वाचायला हवे. पृथ्वीवरील सर्वांत मोठा प्राणी म्हणजे नील देवमासा होय. त्याच्या हृदयाचा आकार किती असेल, तर छोट्या कारएवढा! झोपडीसारखे सुंदर घरटे बांधणारा बिव्हर हा प्राणी, ल्यानीआरिस हा जोडीने द्वंद्वगीत गाणारा पक्षी, वातावरणातील बदल जाणवून तिथून स्थलांतर करून जाणारे पशु-पक्षी अशी कितीतरी माहितीतून आपल्या ज्ञानात भर पडते.

पाळीव प्राण्यांपासून ते जंगली प्राण्यापर्यंत प्राण्यांची स्वभाववैशिष्ट्ये इथे शास्त्रीयदृष्ट्या विशद करून सांगितली आहेत. पशूंचा प्रजननकाळ, त्यांचा खेळकर आणि प्रेमळपणा, मालकाप्रती असलेला जिव्हाळा, इमानदारपणा, कळप करून राहण्याची वृत्ती, आपापसातले संदेशवहन, स्व-संरक्षण, स्थलांतरकाळ आणि कारण, त्यांची बुद्धिमत्ता, संकटात सजगतेने काम करण्याची वृत्ती, अशा अनेक अपरिचित गोष्टी त्यांच्या शास्त्रीय आणि शारीरिक क्षमतेनुसार आपल्याला इथे समजतात.

प्राणी आणि पक्षी हे आपले उत्तम विश्वासू मित्र बनू शकतात किंवा असतात हे त्यांनी स्वतःला आलेल्या अनुभवातून तसेच त्यांच्या इतर मित्र, नातेवाईक यांना आलेल्या अनुभवांतून सांगितले आहे. मात्र, ते सांगताना त्यांनी अतिशय रंजक पद्धतीने गोष्टीच्या रूपात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ऐतिहासिक काळात युद्धाच्या वेळी जनावरांना  दिले जाणारे प्रशिक्षण, सर्कशीत खेळासाठी, तसेच दळणवळण या कामासाठी त्यांचा होणारा वापर आणि आधुनिक काळात 
अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपीचा मानसोपचारात होणारा वापर व त्यातून मिळणारे चांगले यश या सार्‍यांचा ऊहापोह यात सविस्तर केला आहे.

डॉ.अरुण जोशी केवळ सरकारी पशुवैद्यकतज्ज्ञ किंवा ‘सिबा गायगी’मधील संशोधक अशी भूमिका निभावत नसून ते उत्तम पशुमित्र आहेत, याची जाणीव हे पुस्तक वाचताना सतत होते. चित्रकलेत उत्तम गती असून ही घरातील पाळीव प्राण्यांच्या सहवासाने त्यांनी पशुवैद्य होण्याचा निर्णय घेतला. हा वसा जपताना त्यांना आलेले कडू-गोड अनुभव शब्दबद्ध करतानाच त्यासोबत अत्यंत सुंदर रेखाचित्र रंगीत आणि कृष्णधवल अशा स्वरूपात स्वतः रेखाटली आहेत. रोजनिशीचे स्वरूप येण्यासाठी प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक त्यांनी डायरीच्या पानाचे घेतले आहे. पुस्तकाचे मुख आणि मलपृष्ठही वन्यसृष्टीला साजेसे आहे.  हिरवागार रंग आणि पांढर्‍या अक्षरातले नाव, तसेच रंगीत पशु-पक्ष्यांची चित्रे यांनी हे पुस्तक सजले आहे. पुस्तकाला दिलेली प्रस्तावना या पुस्तकाचे वेगळेपण अधोरेखित करते.

रोजनिशी मिटताना’मध्ये जैविक विविधता जपण्याचा, वनस्पती, पशु-पक्षी हे आपले जीवनाचे अविभाज्य घटक आहेत; त्यांचा सांभाळ करण्याचा सल्लाही ते न विसरता देतात. मनुष्य आणि इतर प्राणी यांच्या संबंधाचे अनोखे दर्शन हे पुस्तक देते. शेवटी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी हि सुस्वरे आळविती’ असे संतांनी म्हटले आहे, त्याची प्रचिती हे पुस्तक देते.

http://sahityasuchi.erasik.com/articles/pashuvidyachi_rojnishi  
-तृप्ती अमोल कुलकर्णी
9881157333 । truptiamolkul@gmail.com


Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज