दोन स्पेशल
Late's Talk थिएटर, अथर्व थिएटर्स आणि मिश्री थिएटर्स निर्मित
दोन स्पेशल
यातील कलाकारांसोबत दिलखुलास गप्पा आणि चर्चा
दिनांक : २४.११. २०१६, गुरुवार, स्थळ : टिळक स्मारक मंदिर, वेळ : सायंकाळी ६. ३०
काही गोष्टी घडायला योग यावे लागतात तर काही गोष्टी सहजगत्या जुळून येतात आणि अर्थातच जुळून आलेल्या गोष्टी जास्त आनंद देतात. तसंच काल माझ्याबाबतीत घडलं. झालं असं की संध्याकाळी भेटल्यावर आरतीने मला सहज विचारलं दोन स्पेशल नाटकाचा Talk थिएटर कार्यक्रम आहे येणार आहेस का? सुरुवातीला मी नाहीच म्हटलं इतर कामाच्या गडबडीत नाही जमणार शिवाय आपण ते नाटकही पाहिलं नाही तर जाऊन काय कळणार ? असे सगळॆ उदासीन विचार माझ्या मनात आले. पण नंतर तिचा एकंदरीत उत्साह पाहून मलाही वाटलं की जावं आपण तिच्या सोबत, काय हरकत आहे? आधी कार्यक्रम बघू मग आवडलं तर नाटकही बघू. मग लगेच तिला जाऊन म्हटलं, "चल, येते." आणि आम्ही टिळकस्मारक मंदिरात गेलो. तिथे आधी पासच बुकिंग केलेले असल्याने बाकी कसलं टेन्शन नव्हतं. पास घेऊन नियोजित जागी बसलो. सहज पाहिलं तर हॉल भरला होता. नाटका एवढीच गर्दी नाटकाच्या चर्चेला हे बघून जरा आश्चर्य वाटलं आणि नाटकाच्या लोकप्रियतेची खात्री पटली. कोणत्याही प्रकारच्या पुणेरी सूचना न देता साधारण ५-१० मिनिटात कार्यक्रम चालू झाला. उगाच फालतू वेळ दवडला नाही. कुठे म्युझिक लाव किंवा इतर नाटकांची जाहिरातबाजी कर हे प्रकार झाले नाहीत ते बघून बरे वाटले.
पडदा उघडल्यानंतर निवेदनकर्तीने खरोखरच दोन मिनिटांत कार्यक्रम ज्यांच्यासाठी आहे त्यांच्या हवाली केला हे फारच उत्तम झालं. नाहीतर अशा प्रसंगात निवेदकाला अचानक फार कंठ फुटतो आणि एका कंटाळवाण्या जांभईने पुढचा सगळा कार्यक्रम झोपतो. तसे न होता कार्यक्रम लगेच चालू झाला. दोन स्पेशल टीम ची सगळी मंडळी स्टेजवर आधीच बसली होती. त्यामुळे लगेचच चर्चा सुरु झाली. ज्येष्ठ पत्रकार राज काझी यांनी त्यांच्या इनोदी स्टाईलीने आधीच स्टेजवरचं वातावरण मोकळं, हलकंफुलकं केलं होत. त्यामुळे प्रेक्षकही चर्चेसाठी उत्सुकलेले होते. दिग्दर्शन आणि नाटकाचे लेखन अशा दोन्ही बाजू आपल्या खांद्यावर उत्तमपणे सांभाळणाऱ्या क्षितिज पटवर्धन यांना राज काझींनी पहिला प्रश्न विचारला. या नाटकाची कथा कशी सुचली ? हे नाटक का करावसं वाटलं ? याचं उत्तर देताना क्षितिज ने सांगितलं की कॉलेज मध्ये असताना त्यांच्या एक मित्राने ह. मो. मराठे यांची न्यूज स्टोरी कथा वाचली होती. तिचे वाचन होत असतानाच क्षितिजला ती विलक्षण आवडली होती. मग त्याने याबाबत निर्माता संतोष काणेकर यांच्याशी चर्चा केली. त्या कथेतील नाट्य काय आहे किंवा कसं निर्माण करता येईल हे त्यांना समजावून सांगितलं त्यांनाही ते पटलं मग त्यांनी हे नाटक करायचं ठरवलं. नंतर जितेंद्र जोशी यांना नायकाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं. मग प्रश्नाचा ओघ आपसूकच जितेंद्रकडे गेला आणि त्याला प्रश्न विचारण्यात आला की ही भूमिका करावीशी का वाटली ? नाटकाला प्रोड्युस का केलं ? तेव्हा त्याने सांगितलं ही कथा ऐकतानाच आवडली होती ती अर्धी ऐकून झाल्यावर मी काम करायला होकार दिला. या कथेत नीतिमूल्याला चिकटून असणारा निर्भीड पत्रकार होता. तो आतून कुठे तरी खोल दुखावलं गेला होता. हे दुखावलेपण स्वतः अनुभवले असल्याने मला हे पात्र साकार करावेसे वाटले आणि पूर्ण कथा ऐकून झाल्यावर तर ती मी प्रोड्युस करायच असं ठरवलं. कारण कलाकार हा बऱ्याचदा दिग्दर्शकाचा मिंधा असतो त्याला त्याच्या वेळेप्रमाणे भूमिका साकारता येत नाही. उत्तम नाटक करता येत नाही. एक कलाकार म्हणून मान हवा असतो तो मिळत नाही. ते या बाबती घडू नये म्हणून त्याने स्वतः प्रोड्युस करायचं ठरवलं. या नंतर कथेचे मूळ लेखक ह. मो. मराठे ह्यांना स्टेज वर बोलावण्यात आलं आणि ही कथा मूळ कशी सुचली हे विचारण्यात आलं. त्यांनी सांगितलं ते पत्रकार म्हणून काम करत होते त्यावेळी एक इमारत कोसळून पडली आणि त्यात काही माणसं दगावली अशी बातमी होती. अशा निरनिराळ्या बातम्या, असे प्रसंग यांनी ह्या कथेच बीज मनात रोवल गेलं. त्यात पत्रकारिते मुळे त्यांना रात्रपाळी, दिवसपाळी, वर्तमानपत्रातलं वातावरण, राजकारण, भ्रष्टाचार या साऱ्याचा अनुभव होता तो उपयोगी पडला असे सांगितलं. १९८१ साली किर्लोस्करांच्या दिवाळी अंकात संपादक म्हणून काम करताना त्यांनी ही कथा पहिल्यांदा छापली होती. ही कथा अतिशय सपाट होती त्यात नाट्यमय असे काहीच नव्हते. निवेदनात्मक असे तिचे स्वरूप होते. त्यामुळे जेव्हा ह्याचे नाटकात रूपांतर करू का असे विचारायला क्षितिज त्यांच्याकडे गेला तेव्हा त्यांनी सांगितले की हे काम कठीण आहे यात नाट्य कसे आणणार ? यावर क्षितिजने मला फक्त २० मिनिटे द्या मी तुम्हाला सांगतो असे म्हणून त्यांना यात एका पुरुष पात्राच्या ऐवजी स्त्री पात्र बदलण्याने कसे नाट्य येईल ते समजावून सांगितले आणि त्याला परवानगी मिळाली. नंतर गिरीजा ओक हिला ही भूमिकेबाबत प्रश्न विचारलं असता तिने तिच्या गुजराथी, इंग्रजी रंगभूमीच्या अनुभवाबाबत कथन केले. मराठी रंगभूमीशी लहानपणापासून संबंध आल्याने त्यात काम करावयाची इच्छा होतीच त्यामुळे या नाटकाद्वारे तिला मराठी नाट्यक्षेत्रात पदार्पण करता आले असे सांगितले. यानंतर रोहित हळदीकर याला त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी माहिती विचारण्यात आली. त्यात त्याने त्याच्या लहानपणीपासूनचे रंगभूमीशी असलेले त्याच्या घराचे नाते, त्याच्या काकांचा त्याच्यावरचा प्रभाव अशी सर्व माहिती दिली आणि नाटकातल्या भूमिके विषयी बोलताना तो म्हणाला की एक सज्जन, नीति मूल्यांवर विश्वास असणारा, आदर्श मानणारा, व्यवसायाशी प्रामाणिक असणारा, होतकरू पत्रकार त्याला साकारायचा होता. हे काम त्याला चांगलं आणि वेगळं वाटलं त्यामुळे त्याने ते स्वीकारलं असल्याचं सांगितलं.
या साऱ्यात कथेवरून नाट्यरूपांतर करताना येणाऱ्या अडचणींचा मागोवा काही प्रश्नोत्तराच्या घेतला गेला. नाटकाचा सेट बनवणारे प्रदीप(मामा) मुळ्ये यांनी मुद्दामहून पायऱ्यांचा केलेला वापर हा कलाकारांच्या वेगवेगळ्या पातळी दाखवायला कसा उपयोगी पडेल किंवा सेट वर उभा केलेला खांब हा आपल्याच तत्वांना चिकटून उभा राहणाऱ्याच प्रतीक आहे तसाच त्यानेच या साऱ्याचा डोलारा कसा समर्थपणे सांभाळला आहे तो नसेल तर सगळीच इमारत कोसळेल अशा सुरेख प्रतिमांचा वापर करून नाटकाला आणखीन उठाव आणायचा प्रयत्न केला. तसेच राजन खान यांनाही नाटक साहित्याला काही देत का ? असा प्रश्न विचारण्यात आला कारण त्यांच्या बऱ्याच कथांचे नाटकात सिनेमात रूपांतर झाले आहे. यावर ते म्हणाले निश्चित होतो पण नाटककाराला वेगळी दृष्टी असते लेखक एका समांतर पातळीवर असतो. नाट्य करणाऱ्याला वेगवेगळ्या पातळ्यांचा विचार करावं लागतो. कित्येकदा कथेचं नाटक पाहताना अरे हे आपल्याला का नाही सुचलं असे लेखकाला वाटतं असे त्यांनी सांगितले.
या साऱ्यांच्या अतिशय मनमोकळ्या आणि दिलखुलास गप्पा झाल्यानंतर मग प्रेक्षकांची प्रश्नोत्तरे सुरु झाली. नाटकाचा काळ हा आत्ताचा का नाही घेतला ? तरुणांना हे नाटक का आवडेल असं वाटलं ? नाटकाचं नाव दोन स्पेशल का ठेवलं ? या साऱ्याची उत्तर ऐकून खूपच छान वाटलं. एखाद्या कलाकृतीवर अशी सर्व बाजूनी चर्चा होणं त्यातून काहीतरी सकारात्मक , वैचारिक जाण समाजाला देणं हे फार महत्वाचं आहे. केवळ नाटक पाहून इतकी सारी भूमिका वैचारिकता निर्माण होईल असं नाही त्यासाठी अशी चर्चा असे खुले संवाद होणं आवश्यक आहे. तरच उत्तोमोत्तम नाट्यकृती घडतील आणि प्रेक्षकांचं रंजनही होईल.
या साऱ्यांच्या अतिशय मनमोकळ्या आणि दिलखुलास गप्पा झाल्यानंतर मग प्रेक्षकांची प्रश्नोत्तरे सुरु झाली. नाटकाचा काळ हा आत्ताचा का नाही घेतला ? तरुणांना हे नाटक का आवडेल असं वाटलं ? नाटकाचं नाव दोन स्पेशल का ठेवलं ? या साऱ्याची उत्तर ऐकून खूपच छान वाटलं. एखाद्या कलाकृतीवर अशी सर्व बाजूनी चर्चा होणं त्यातून काहीतरी सकारात्मक , वैचारिक जाण समाजाला देणं हे फार महत्वाचं आहे. केवळ नाटक पाहून इतकी सारी भूमिका वैचारिकता निर्माण होईल असं नाही त्यासाठी अशी चर्चा असे खुले संवाद होणं आवश्यक आहे. तरच उत्तोमोत्तम नाट्यकृती घडतील आणि प्रेक्षकांचं रंजनही होईल.
हे पाहून नाटक बघायची उत्सुकता वाढली हे मात्र खंर. आणि अशी चर्चा पुन्हा पुन्हा पाहावी अशी आहे हेही तितकंच खरं. इतका बुद्धीला ताण दिल्यानंतर शेवट रोहितच्या मिमिक्रीने आणि जितेंद्रच्या कवितेने गोड झाला.
Comments
Post a Comment