बाग - कथुली
बाग
“तुझ्या तुळशीच्या रोपाकडे बघ गं. काय झालंय ? तुळस नीट बहरेल की नाही शंकाय.”
घरात येताच आईचं हे वाक्य कानावर पडलं तशी रमा धावतच तुळशीच्या रोपाकडे गेली.
बघितलं तर रोप तसंच होतं. त्याला काही झालं नव्हतं. मग आई का असं म्हणतीय? रमा
गोंधळली. हातपाय स्वच्छ धुवून ती पुन्हा कुंडीजवळ गेली. तिनं नीट निरखून पाहिलं
तेव्हा तिला दिसलं की तुळस वाढण्याऐवजी दुसरंच काहीतरी उगवलंय त्यात. हं ... हे तण
आहे तर... असा विचार कर असतानाच तिला काही दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.
बाबांच्या एका मित्राची बाग बघून आल्यानंतर ती बाबांच्या मागे लागली होती. आपण
पण बाग करूया नं. तेव्हा बाबांनी तिला समजावलं होतं “बाग करणं इतकं सोपं नाही रमा !
एखाद्या माणसाइतकीच निगुतीनं त्याची काळजी घ्यावी लागते. नुसती कुंडी आणली, त्यात
रोप लावलं, त्याला खत, पाणी, उन इतकं दिलं की बाग तयार होते असं नाही काही. त्याला
खूप जपावं लागतं. त्यात तण होऊ नये म्हणून, पक्षी सुद्धा कधी कधी छोटा कोंब खाऊन
टाकतात. त्यापासूनही जपायला लागतं. इतकं सगळं जमेल का तुला ?” तेव्हा तिनं उत्साहात होकार दिला होता. “ठीक आहे
मग. तुला आता सुट्टी लागली की आणूया एखादं रोप. म्हणजे मग तुला त्याची काळजी घेता
येईल.”
असं सगळं संभाषण होऊन सुरुवातीला एका तुळशीचं रोप लावून बागेचा श्रीगणेशा झाला
होता. बाबांनी त्यांचा शब्द तर पाळला होतं. आता रमाची वेळ होती आणि नेमकं असं झालं.
तुळस वाढण्या ऐवजी त्यात तणच वाढलं होतं. काय करावं बरं ? नदी काठी वाढलेल्या तणाचं
काय करतात ? ते तर तसंच असतं की तरीही त्याच्या आजूबाजूला फुलं फुलतात, तुळस ही
असतेच की तिथं बहरलेली, आपण रोज फिरायला जाताना पाहतोय की. मग कुंडीत तण आलं तर आई बाबांना का
नकोसं असतं? खेळताना सुद्धा हा विचार मनातून जाईना.
शेवटी बाबा आल्यावर तिनं सारं काही सांगितलं. ते म्हणाले “आता एक काम कर. जे तण
आलंय ना ते कुंडीतून काढून टाक. थोडी माती उकर, त्यात काय बी वगैरे असेल तर बाहेर
काढ. म्हणजे तुळस लवकर बहरेल.” हे ऐकून, इतकं सोपं काम आहे होय, असं मनाशी म्हणत रमा
खुश झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच
बाबांनी तिला पुन्हा ते तण काढून टाकण्याची आठवण करून दिली. तशी हातात छोटसं खुरपं
घेऊन रमा कुंडीच्या दिशेनं निघाली. तिचा जामानिमा पाहून आई हसून म्हणाली ,”अगं
वेडाबाई ! इतकं सगळं न्यायची काय गरज ! एवढंस ते तण हातानं उपटून टाक. जरा माती उकरलीस
की लगेच निघेल. ते काय खुरपण्या एवढं मोठं नाहीये.”
तुळशी जवळ गेल्यावर रमाला आईचं म्हणणं पटलं. तुळशीच्या रोपात ते तण इतकं वेडवाकडं
घुसलं होतं की ते उपटताना तुळसच बाहेर येईल की काय अशी तिला भीती वाटली. हातानं
काढणंच योग्य असा विचार करून तिनं कुंडीत हात घातला. त्यासरशी त्या हिरव्या
पानांनी तिच्या हाताला गुदगुल्या झाल्या. नकळत तिनं त्या पानांवरून हात फिरवला.
त्याचं हिरवं रुपडं, कोवळा मऊ स्पर्श यानं तिला मोहात पाडलं. ते उपटून काढायचं आहे
हेच ती विसरली. बोटांना ओल्या मातीचा
स्पर्श झाला आणि तिला आठवलं ‘अरे हे उपटायचंय नाही का ?’
मात्र आता तिला ते उपटावसं वाटेना. आपोआप उगवलंय, छान हिरवंगार दिसतंय.
नाहीतरी आपल्याला बाग करायचीच आहे नं ? मग कशाला उपटायचं नी फेकायचं? राहू देत की
राहिलं तर. असं म्हणत तिनं हळूच हात मागे घेतला. पण तुळशीचं काय ती बहरणार नाही ना
! काय करावं हा पेचच पडला. आपण हात न लावता खुरपानं ते तण उपटलं असतं तरच बरं झालं
असतं असं आता तिला वाटायला लागलं. तुळस बहरण्यासाठी या तणाचा जीव घेणं तिला नकोसं
वाटायला लागलं. शेवटी तण आणि तुळस दोघांनाही तसंच ठेवून ती बाबा येण्याची वाट बघू
लागली...
इतका लांबचा प्रवास करून आले तरी आल्या आल्या बाबांनी विचारलं, “ काय रमाबाई
तुळस काय म्हणतेय ?” रमाला काय उत्तर द्यावं ते कळेना. शेवटी आईच म्हणाली, “
तुमच्या लाडक्या रमाबाई निगराणीत कमी पडल्यात बरं का ! तुळशीचं रोप कसलं बघताय कुंडीतून
तुळस हद्दपार होऊन पार तणाचं जंगल व्हायची वेळ आलीये आता.” आईच्या या सणसणीत शेरानं
रमाला जरा भरून आलं. बाबांना न बोलताच बरंच काही कळालं. “बरं उद्या सकाळी बघुयात”
असं म्हणत त्यांनी तो विषय तिथंच थांबवला.
रमाचा मात्र रात्री डोळ्याला डोळा लागेना. कुणाचाही बळी जाऊ नये म्हणून प्रयत्न
करायला गेली बिचारी पण झालं विपरीतच. तिला वाटलं हेही झाडचं तर आहे. वाढतील दोघंही
त्यांची एकमेकांशी दुष्मनी का आहे ? पण तसं झालं नाही, तुळशी ऐवजी तणचं वाढलं होतं.
आणि फार उशिरा तिला त्या तणाचा स्वार्थीपणा लक्षात आला होता. आता तण उपटून काय
उपयोग ? तुळस तर जवळपास गेल्यातच जमा होती. मग तण तरी कशाला उपटा ? म्हणून वैतागून
तिनं ते तण तसंच वाढू दिलं होतं.
सकाळी बाबांनी खुरप घेऊन ये म्हणून रमाला सांगितलं. बहुदा आईचं आणि त्याचं त्या
बाबत बोलणं झालं असावं. बाबा म्हणाले, “खुरपं कसं धरून वापरायचं ते दाखवतो मी एकदा.
मग ते तण सगळं तू उपटून काढ. आणि तण उपटत असलो तरी लक्षपूर्वक काढ. माती हळवीच
असते. तिला तण काय नि तुळस काय दोन्ही सारखीच लेकरं. त्यामुळं ती थोडी दुखावली
जाणारंच. याचं भान असू दे.”
रमानं अगदी शांतपणे, मनोभावे बाबांनी सांगितल्यानुसार तण उपटलं. माती दुखावली
असेल म्हणून तिला बोटांनीच कुरवाळल्यासारखं केलं. थोडंस थोपटवलं. ती दुखावली
गेल्यावर आईबाबा कसं शांत करतात तसं तिनं केलं. तुळशीच्या छोटुकल्या, मरगळलेल्या रोपाला
प्रेमाने कुरवाळलं, त्याला पाणी घातलं. त्याची मनोमन क्षमा मागितली आणि ते जगावं
म्हणून देवाकडे प्रार्थना केली. बाबा सगळं बघत होते. आपल्या लेकीचा हळवा स्वभाव
जाणून होते. सगळं काम झाल्यावर “याचं काय करू ?” तणाकडे बोट दाखवत तिनं विचारलं. “
हे सगळं कचऱ्यात जाऊ दे. उद्या आपण
समोरच्या बागेतल्या माळीकाकांना देऊ. ते बघतील याचं काय करायचं ते.” “बरं” असं
म्हणून तिनं ते सगळं एका बादलीत व्यवस्थित भरून ठेवलं.
बाबांनी विचारलं, “आता कळालं का वेळच्यावेळी तण उपटणं किती महत्त्वाचं असतं ते
? रमा लक्षात ठेव, पेरत्या हातांनाही उपटावं लागतंच. नाही तर जे पेरलंय ना ते जगत
नाही. आणि पेरणाऱ्याचं हे कर्तव्य आहे त्यानं ते जतन करणं. त्याला जे जे मारक आहे
ते काढून टाकणं. मला माहित आहे तुझा स्वभाव याच्या विरुद्ध आहे, हळवा आहे त्यामुळं
उपटणं तुला मानवणार नाही. पण तरीही तुला पेरलेल्याचं रक्षण करायला शस्त्र उचलावी
लागतील. तण उपटावंच लागेल. तेव्हा हळवं होणं हे नक्कीच चांगलं नाही. बागकाम करणं
इतकं सोपं नसतं बेटा. ही तुला एक चांगली शिकवण आहे. फक्त बागेच्या बाबतीतच नाही तर
मनाच्याही बाबतीत तुला हे करावं लागणार आहे. अडनिडं वय तुझं, जमीन सकस आहे. त्यात
काहीही पेरलं जाईल. तेव्हा अयोग्य ते उपटायला शिक.
आपल्यालाही बहरून येण्यासाठी असं सतत खणून बघणं, कुविचारांचे तण उपटण, मुळात
ते समजणं, उमजणं, त्याच्या मोहात नं पडणं, आयत्या गोष्टीच्या मागे न लागणं हे करावं
लागतं आता ते सारं तुला कळायला हवं. कळालं नाही तर तू ते जाणत्या व्यक्तींना
विचारायला हवं. त्यावर विचार करायला हवा. हे फार फार आवश्यक आहे. “
“आपण निसर्गाहून फार वेगळे नाही रमा ! पण निसर्गाकडून शिकलं मात्र पाहिजे.
निसर्गात परस्परपूरक गोष्टी जशा आहेत तशा मारकही. पण निसर्ग त्याचा समतोल साधतो.
तुही तो साधायला शिक. मग बघ, बाग कशी बहरेल ते !”
इतक्या वर्षानंतर स्वतःच्या घरात बागेचा श्रीगणेशा करताना तुळस आणायला
गेलेल्या रमाला, “आपको आता है ना पौन्धा लगाना ?” असं जेव्हा त्या माळी काकांनी
विचारलं तेव्हा क्षणार्धात हे सारं काही आठवलं.
तृप्ती
Comments
Post a Comment