तारेवरच्या कसरती
व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातली असो ती संवेदनशील, विचारी असेल तर तिचं जगणं अर्थपूर्ण आणि अनुभव संपन्न होतं. असं जगणं जेव्हा साहित्यात प्रतिबिंबित होतं तेव्हा साहित्यही खऱ्या अर्थानं व्यापक, बहुस्पर्शी होतं. असंच, आपल्या जगण्यातनं आलेल्या अनुभवाचं संचित; कथात्मक स्वरूपात मांडलं आहे; ते लेखक विलास गावडे यांनी, ‘तारेवरच्या कसरती’ या त्यांच्या औद्योगिक जगताचं म्हणजेच कामगार विश्वाचं दर्शन घडवणाऱ्या दुसऱ्या कथासंग्रहात.
खरंतर आजवरच्या चित्रपट, कथा, कादंबऱ्या, कविता यातून वेळोवेळी औद्योगिक विश्व सामोरं आलेलं आहे. पण पुष्कळदा यातून कामगार म्हणजे केवळ ‘शोषित’ घटक इतकीच संकुचित प्रतिमा निर्माण व्हावी असं त्याचं सादरीकरण झालं आहे. प्रत्यक्षात जरी ते खोटं नसलं तरी केवळ तितकंच खरं आहे असंही नाही. शिवाय अशा प्रकारे दाखवण्यात येणारं कामगार विश्व हे बऱ्याचदा अतिरंजितही आहे. मग खरं काय आहे? कामगार म्हणजे केवळ संप, हरताळ, उपोषण, मोर्चा इतकंच आहे का? कामगारांच्यात आणि वरिष्ठांच्यात काहीच स्नेहबंध, आपुलकी नसते का? कामगारांच्या उत्कर्षासाठी काहीच तरतूदी नाहीत का? कारखान्यात, कंपनीत कधीच चांगलं काही घडत नाही का? नक्की या व्यवस्थेत शोषण कोणाकडून होतं आहे? ज्या समस्या गंभीर आणि अशक्य कोटीतल्या समस्या म्हणून ओरड चालू असते त्या खरंच तशा असतात का? याबाबत सत्यता काय आहे? आजवरच्या इतर साहित्यकृतीतून या प्रश्नांबाबत प्राधान्यानं, गांभीर्यानं आणि मोकळेपणानं फारसं काही सांगितलं गेलं नाही. विलास गावडे यांनी मात्र अशा सर्वकष बाजू दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न ‘तारेवरच्या कसरती’तून केला आहे. इंडस्ट्रीयल रिलेशन्स ह्युमन रिसोर्सेस विभागात, वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून तीन दशकांहून अधिक कामाच्या प्रदीर्घ अनुभवातून सिद्ध झालेली ही लेखणी, कोणताही पक्षपातीपणा न करता आपल्या समोर व्यक्त झाली आहे.
लेखन कथात्मक स्वरूपाचं असल्यानं वाचताना त्यात रंजकता, उत्कंठा निर्माण झाली आहे. या संग्रहात एकूण नऊ दीर्घ कथांचा समावेश केला आहे. कथांचं विशेष म्हणजे यातल्या प्रत्येक कथेतून एक निराळीच समस्या आणि तिचं निराकरण आपल्याला वाचायला मिळतं. शिवाय विषयाचा आवाका मोठा असला तरीही कथा कुठेही पाल्हाळीक स्वरूपाची झाली नाहीये. उलट कथानक वेगानं पुढं सरकतं. प्रत्येक प्रसंग आणि त्यातले संवाद, वर्णनात्मक तपशील अतिशय मार्मिक पद्धतीनं लिहले गेले आहेत. क्वचित एखाद-दोन ठिकाणी प्रसंगांच्या वर्णनात मात्र सारखेपणा आला आहे. तो टाळता यायला हवा होता असं सलग कथा वाचन करताना जाणवतं. या सर्व कथा नाट्यमय असल्या तरी अतिरंजित नाहीत. प्रसंग कुठलाही असो अगदी एखाद्या कामगारानं सर्वांसमक्ष लांच्छनास्पद वर्तन करण्याचा असला तरी लेखनातली संयमितता दिसून येते. या कथांतून कामगार वर्ग आणि व्यवस्थापन वर्ग यांच्यातलं समस्येगणिक बदलत जाणारं नातं दिसून येतं. शिवाय पगारवाढी व्यतिरिक्तही कामगारांच्या अनेक समस्या असतात याचीही सखेद जाणीव होते. मग त्यातले कामगारांचे आपापसातले संघर्ष, मतभेद असोत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ तसंच नवीन अधिकाऱ्यांची केलेली पिळवणूक असो. अधिकाऱ्यांमधला सत्तेसाठीचा संघर्ष आणि त्याचे कामगारांवर होणारे परिणाम असोत. सारे काही निर्भीडपणे मांडलं आहे. कामगारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सवलती आणि त्याचा गैरफायदा घेणारे कामगार आहेत. स्थानिक कामगार आणि कंत्राटी कामगार यांच्यातले आपापसातले ताण-तणाव आहेत. वैद्यकीय सुविधा त्याबाबतची कामगारांची, त्यांच्या घरच्यांची अनभिज्ञता आणि त्याचा स्वार्थी राजकारणी लोकांनी घेतलेला गैर फायदाही आहे. एकंदरीत औद्योगिक जगतातल्या घडामोडीत ह्युमन रिसोर्सेस विभागात वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करताना, सर्वच बाजूचा सांगोपांग विचार करताना, तारेवरची कसरत कशी होते ते यातून स्पष्टपणे दाखवलं आहे.
सरतेशेवटी लक्षात येतं की क्षेत्र कोणतंही असो त्यात मनुष्यबळाचा वापर आला की व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानं समस्या या येणारच. आणि जिथं समस्या आहेत तिथं समस्येवर उपायही असणारचं. त्यामुळं गरज आहे ती फक्त विलास गावडे यांच्यासारख्या संवेदनशील, मानवतेला प्राधान्य देणाऱ्या, समतोलपणे समस्या हाताळणाऱ्या न्यायीवृत्तीच्या अधिकाऱ्यांची आणि अर्थातच त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची.
पुस्तकातील लेखनासोबतच पुस्तकाचं मुखपृष्ठ ही अतिशय सुंदर आणि समर्पक काढलं आहे. संघर्षाचं प्रतिक असलेला लाल रंगाची पार्श्वभूमी, त्यावर औद्योगिकरणाचा लोगो आणि काळ्या रंगातले दोन लांब हात, ज्यांनी अंगठा आणि तर्जनी यांमध्येच नाजूक दोर पकडलेला आहे, त्यावेळीस हाताची इतर बोटं मात्र जरा अंतरावर आहेत आणि त्या दोराच्या बरोबर मध्यभागी सगळ्याचं लक्ष वेधून घेणारा पांढऱ्या रंगातला एक माणूस आपला तोल सांभाळून चालताना दाखवला आहे. पुस्तकातील कथानां अगदी न्याय देणारं असं मुखपृष्ठ झालं आहे.
तृप्ती
Comments
Post a Comment