मोहिन चित्र शैली - विचारभारती मासिक

विचारभारती या मासिकात मोहिन चित्रशैली वरचा माझा लेख छापून आला आहे. संपादक मिलिंद जोशी सर आणि मिलिंद देशपांडे आणि त्यांचे सहकलाकार या दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद !



 


चित्रकलेचं आणि माणसाचं नातं हे फार फार प्राचीन काळापासूनचं आहे. माणूस बोलायलाही लागण्याआधी चित्रांच्या सहाय्यानं संवाद साधत होता. आपल्या गुहेतल्या भिंतीवर तो नैसर्गिक रंग आणि कुंचल्याच्या सहाय्यानं चित्रांद्वारे आपल्या भावना व्यक्त करत होता. कालांतरानं जसं आदिमानवाची उत्क्रांती होत होत तो प्रगत होत गेला, त्याच्या शरीरात, राहणीमानात, वर्तनात बदल होत गेला; तशी भावना व्यक्त करण्याची त्याची पद्धतही बदलत गेली. पुढं पुढं तर भाषेचाही उगम आणि विकास झाला. तसं सांस्कृतिक आणि तांत्रिक प्रगतीही झपाट्यानं होऊ लागली. स्थिर आणि सुरक्षित अशा जीवनात मग त्याच्या या भित्ती चित्रांची जागा वेगळ्या माध्यमानं घेतली. आणि मग चित्र काढण्याच्या विचारात, पद्धतीत, विषयात ही अमुलाग्र बदल घडू लागला. त्यामध्ये तात्कालीन जीवन संस्कृतीचं, समाजाचं, नीतीमूल्यांचं चित्रण दिसू लागलं. आणि त्या त्या पद्धतीनुसार त्या त्या चित्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटला गेला. इथूनच निरनिराळ्या प्रकारच्या ‘शैली’ निर्माण झाल्या. अशा कितीतरी शैली आपल्या परिचयाच्या आहेत. जसं की जयपूर, बिकानेर, राजस्थानी, बुंदी, कांग्रा, पहाडी, राजपूत, इ. चित्रांच्या या शैलींमुळं त्या त्या चित्रांकडे बघण्याचा एक दृष्टीकोन तयार झाला. त्यातला आशय पोहोचण्यासाठी रेखाटलेल्या चित्राकृती, त्यांचे अर्थ, त्यांना देण्यात येणारे रंग अशा अनेक बाबी उदयाला आल्या. आणि चित्रकार, त्याची चित्रं आणि त्याचे आस्वादक प्रेक्षक यांच्यातला संवाद अधिक नेमकेपणानं होऊ लागला. चित्रकारासोबतच प्रेक्षकांचीही अभिरुची उन्नत होऊ लागली. “शैली” च्या या वैशिष्ट्यामुळं तिचं अनुकरण करण्याचा, त्यात आपल्या कल्पकतेनुसार बदल करण्याचा प्रयत्न जास्त प्रमाणात केला जाऊ लागला.

मोहिन शैली ही अशीच एक नवीन शैली. पुण्यातील आर्ट टिचर आणि ग्राफिक डिझायनर मिलिंद देशपांडे यांनी या शैलीची निर्मिती केली आहे. मिनिएचर शैलीचं वेगळं रूप असणारी ही मोहिन शैली नावाप्रमाणेच मोहक, आकर्षक आहे. या शैलीत खूप नाजूक, बारीकसारीक कलाकुसर केली जाते. प्रामुख्यानं वेगवेगळ्या प्रकारचे पोत (टेक्शचर) वापरले जातात. ब्राईट आणि तजेलदार रंगांचा वापर केला जातो. जसं की पिंक, ऑरेंज, डीप क्रोमयलो, मॅजेंटा, व्हॉयलेट इ. या चित्रांमध्ये देवी, देवता, पानं, फुलं, पक्षी, प्राणी, वाद्यं, नृत्य, पौराणिक विषय यांवर मुख्यत: भर दिला जातो. ही चित्रं काढण्याची पद्धत म्हणजे हॅन्डमेड पेपरवर चित्र रेखाटून त्यावर पोस्टर कलरच्या सहाय्यानं प्लेन रंगकाम केलं जातं. थोडक्यात या चित्रात शेड लाईटचा वापर केला जात नाही. चित्रात बाह्य आउटलाईनला महत्त्व दिलं जातं. आणि आतले आकार हे अगदी थीन ब्रशनं पोत (टेक्शचर)चा वापर करून रंगवले जातात. एकसारख्या रेषाकृतींनी त्यात खोलीचा भास तर निर्माण होतोच शिवाय तरलता अनुभवायला मिळते. मग ते डोंगर असो, आकाश असो, पाणी असो. त्यातील रेषांच्या किमयेनं चित्रं मोहक वाटतात. या चित्रांमुळे चित्रकाराची एकाग्रता तर वाढतेच पण पाहणाऱ्याचीही वाढते. प्रत्येक रेष अन् रेषेला स्वतःच असं अस्तित्व असल्यानं आपणही नकळत खोल खोल विचारात डुंबून जातो. ज्याप्रमाणं एखाद्या तंतुवाद्यातल्या निरनिराळ्या तारा, दिसताना जरी एकसारख्या दिसत असल्या तरी प्रत्येकीचा स्वतःचा असा सूर असतो, स्थान असतं तसंच या चित्रातल्या प्रत्येक रेषेचं महत्त्व आहे. प्रत्येक रेषेला स्वतःची अशी एक लय आहे आणि ती जाणवते. आपल्याशी संवाद साधू पाहते. ही चित्रं अतिशय किचकट आणि अवघड अशी वाटली तरी तयार झाल्यावर अतिशय सुंदर, आकर्षक दिसतात.

या शैलीची आणखीनही काही वैशिष्ट्य आहेत. कधीही चित्र नं काढलेल्या अनेक लोकांनीही मोहिनशैली आत्मसात करून सुंदर चित्र निर्मितीचा भरपूर आनंद घेतला आहे आणि अजूनही घेत आहेत. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्या वयोगटातली लोकं ही शैली शिकू शकतात. चित्रकलेप्रती आवड निर्माण करण्यात ही मोहिन शैली अतिशय प्रभावी ठरत आहे. शिवाय या शैलीमुळं एकाग्रता, काम करण्यासाठी आवश्यक असणारी बैठक, चिकाटी असे आजकाल दुर्मिळ होत चाललेले गुणही आपोआपच विकसित होत आहेत. या दृष्टीनं तर लहान मुलांसाठी ती अतिशय उपयुक्त ठरली आहे.

अशा या मोहिन शैलीचं पहिलं प्रदर्शन डिस्ने आणि रेडीओ मिर्ची आणि युरो लॉजीस्ट संजय कुलकर्णी यांच्या प्रयोजकत्वाखाली २००७ साली पुण्यात पहिल्यांदा झालं होतं. शास्त्रीय संगीतातले लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. इयत्ता पाचवी ते दहावीतल्या मुलांचा त्यात समावेश होता. भारतीय संस्कृतीवर आधारित असलेल्या या प्रदर्शनात वाद्य आणि प्राणी यांवर भर दिला होता. तसंच या शैलीद्वारे सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्या कवितांवर आधारित चित्रं रेखाटण्याचा प्रकल्पही केला गेला.

अलीकडे २०१९मध्ये या मोहिन शैलीचं नव्यानं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. यात एकूण दहा कलाकारांचा सहभाग आहे. प्रत्येक कलाकारानं मिलिंद देशपांडे यांच्याकडे ही शैली शिकून, आत्मसात करून आपापल्या अभिरुची प्रमाणे सुंदर सुंदर चित्रं रेखाटली आहेत. अर्चना टाकळकर या निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी असल्यानं त्यांनी निरनिराळ्या पानांची अप्रतिम चित्रं रेखाटली आहेत. पानापानांतलं वेगळेपण आणि सौंदर्य टिपणारी ही चित्रं अतिशय रेखीव आहेत. लक्ष्मी नाडगीर यांनी आपला राष्ट्रीय पक्षी मोर हा विषय चित्रांतून मांडला आहे. ते पाहताना पु. शि. रेगेंच्या मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचं याची आठवण येते. याचं मोराचं नातं अजून एका गोष्टीशी जोडलं गेलंय ते म्हणजे सरस्वती देवीचं वाहन म्हणून. अशाच निरनिराळ्या देवतांची वाहनं रेखाटली आहेत ती केतकी देशपांडे आणि मिलिंद बडकुंन्द्री या दोन कलाकारांनी. यात मोर, हंस, नाग, उंट, कामधेनु, सिंह इत्यादी वाहनं त्यांच्या मोहक रंगात पाहायला मिळतात. याच प्रमाणे वरकरणी दिसणारे द्वैत हे प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि मैत्रीच्या धाग्यांमुळं नात्यात कसं अद्वैत निर्माण करतं ते सुप्रिया वाकणकर यांनी रेखाटलं आहे. सुदामा-कृष्ण, शिवाजी महाराज-संत रामदास, इत्यादी उदाहरणातून ते अतिशय समर्पक दाखवलं आहे. मनीषा बहुलेकर यांनी संगीतातले राग जसं की भैरव, हिंडोल यांची चित्रं रेखाटली आहेत. प्रियंका उमाळकर यांनी समस्त स्त्री वर्गाचा आवडता विषय निवडला आहे तो म्हणजे दागिने. मग तो एखादा बाजूबंद असो किंवा केसातली आकर्षक वेणी. तर स्वप्नील जोगळेकर यांनी पारंपारिक वाद्य हा विषय निवडला आहे. या विषयां सोबतच एक अतिशय वेगळा आणि आजकाल दुर्लक्षित झालेला विषय निवडला आहे तो अश्विनी काशीकर यांनी. तो विषय आहे भारतीय बैठे खेळ. सारीपाट, बुद्धिबळ, सापशिडी यांसारख्या परिचित खेळांसोबतच विमान, काऊज न लेपर्ड, नौकेटाकेटी इत्यादी अपरिचित खेळही आहेत. जे आपल्या ज्ञानात नक्कीच भर घालतात. शेवटी या शैलीचे निर्माते मिलिंद देशपांडे यांनी पंचकन्या हा विषय घेतला होता. प्रातःकाळी ज्या पंचकन्यांचं नित्त्य स्मरण केल्यानं महापातकांचा नाश होतो असं म्हणतात त्या अहिल्या द्रौपदी आणि सीता यांचा त्यात समावेश होता.

वेगवेगळ्या विषयांची निवड करून, त्यावर बरंच संशोधन करून, अभ्यास करून, स्वतःची कल्पकता आणि कौशल्य यांच्या सहाय्यानं रेखाटलेली ही चित्रं वात्सायानाच्या ‘जयमंगला’ नावाच्या ग्रंथात वर्णन केलेल्या चित्रकलेच्या सहा अंगांची म्हणजेच...
रुपभेदः प्रमाणानि भावलावण्य योजनम् |
सादृश्यं वर्णिकाभंगम् इति चित्रं षडंगकम्||
यांची सुंदर अनुभूती देणारी ठरतात. पुन्हा पुन्हा पाहण्याची ओढ निर्माण करतात.


- तृप्ती कुलकर्णी



रंगरेषांच्या या अद्भुत दुनियेत तुम्हालाही रमायचं असेल तर मार्गदर्शनासाठी मिलिंद देशपांडे सदैव उत्सुक आहेत. ९८२२२७००७४ या नंबरवर आपण केव्हाही त्यांना संपर्क साधू शकता.   

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज