प्रिय इतिहास

प्रिय इतिहास ,
तूला  साष्टांग नमस्कार !

खर म्हणजे तुला माझ पत्र पाहून आश्चर्य वाटेल कारण इतक्या वर्षांनी तुझ्याशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण काय करू शाळेत तुझ्या बद्दल जो अभिमान वाटत होता , तुझ्या कर्तृत्वाने जे मन भरून येत होते त्यातले आता काही सुद्धा शिल्लक राहिले नाही की  काय ? असे वाटते. इतिहासातल्या व्यक्तींच्या नावाने शिमगा करण्याची एकही संधी सध्या वर्तमानातले लोक सोडत नाहीत. आणि हे असच चालू राहील तर भविष्यात डोकावण्याच धाडस ही  उरणार नाही.  ज्यांनी ज्यांनी तुझ्या नावाला मोठ केल इतक, की  जरी तू इतिहास असलास तरी इतिहास जमा होऊ नये, कायम लक्षात राहावा , त्यांना त्यांना आज शरम वाटत असेल रे या सगळ्याची .
   
खरच तुला तोंड हव होत रे,  तुझ्या हातात माईक हवा होता. म्हणजे काय  तुझ्या काळात घडलेल्या घटना या खरच आम्हाला जशाच्या तश्या आणि योग्य स्वरूपात कळाल्या असत्या. अमुक अमुक अस म्हणाले, तमुक तमुक तस म्हणाले अस काही घडलं नसत आणि चुकीच्या पद्धतीने ते सांगितल गेले नसत. अरे किती बिनधास्तपणे तुझ्या समोर तुझेच धिंडवडे काढतायत, पण काय करणार तू तरी ?  तुझ्या कडे न काही मोबाईल न इंटरनेट.  तुझी बाजू मांडायला एखादा वकील तरी घ्यायचास,  तो ही नाही.

खर सांगू का तुला! तु ना माणसांवर अब्रू नुकसानीची फिर्याद दाखल कर. तुझ्या काळातल्या तुझ्या आदर्श पोरांना मग ते  कोणीहि असो  पार  बदनाम केलाय या लोकांनी.  सगळे तुझे संदर्भच बदलून टाकलेत. आम्हाला असा इतिहास आहे ? अरे तुझ्या कडून चार चांगल्या गोष्टी घायच्या राहील बाजूला. तुलाच बदलवलं  की  आम्ही ? अरे सगळे संत महंत कमी पडतील या लोकांपुढे . आज ना तूझं वाटप झालंय रे सगळीकडे, तुला माहित नसेल कदाचित पण तुला जातींच लेबल लावलय आम्ही. हो, तुझ्या मुलांना जाती धर्मानं वेगळं  केलंय.  आता तू अखंड भारताचा अखंड इतिहास नाहीस काही.  तू वेगवेगळ्या मनुष्य रूपातील प्राण्यांच्या जाती नुसार इतिहास झाला आहेस.

आणि खर सांगते आता इतिहास खणून त्यातल्या विचारांवर धिंडवडे काढण्या पलीकडे आमच्या वर्तमानात काही शिल्लकच नाही. अरे काही चांगल दिसतच नाही आम्हाला ? मग काय उचलली लेखणी लावली कागदाला आणि उचलली जीभ लावली टाळूला. तुझे मोठे ग्रंथ  अभ्यासायला नकोत की  त्यावर शांतपणे विचार करायला नको.  म्हणून म्हंटल तुला विचारावं काय करतोस आता ? 

शांत बसतोस.  का रे ? तू काहीच का बोलत नाहीस ?  बर बर ! तुझ अगदी योग्यच आहे. अरे शेवटी काय आम्ही सारे मर्त्य जीव, शेवटी आम्ही हि इतिहास जमा होणार. मग आमच्या बोलण्याला काय अर्थ ? उद्या पुढची पिढी अजून काय वेगळच बोलणार आहे म्हणतोस ? असेल बुवा ! तू सगळ्याचा साक्षीदार आहेस. तू काय  काल , आज , उद्या  असशीलच आम्ही नसू.  म्हणून  म्हंटल आहे तोवर एकदा तुला पत्र लिहून मन मोकळ कराव !

बाकी सर्व काही म्हंटल तर सुरळीत चालू आहेच.  

तुझीच एक लेक 


Comments

  1. मला माहीती नाही आपण कोण आहात.??

    वाचण्याची आणि लिखाणाची आवड तुमच्या blogspot पर्यंत घेऊन आली. वाचुन खुप छान आणि समाधान कारक वाटत आहे.

    इतिहासाला लिहिलेले पत्र अगदी वास्तविक असुन.. प्रत्येक वाचक प्रिय मानसाच्या भावना शब्दात कैद केल्यात तुम्ही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज