Priya Namu
प्रिय नमू ,
खंर तर मनीषा या तुझ्या नावाचा शॉर्टफॉर्म मी केला ते खास तुझ्या वर माझा वेगळा हक्क असावा या भावनेतून. पण जस तुझ नाव मी छोट केल तू तशी छोटीच झालीस. तुझ्या मध्ये एकदम बालपणीचा खोडकरपणा आला. तुझ्या सोबत मलापण पुन्हा लहान होण्याचा आनंद मिळाला. आपल्याला एखादी लहान बहिण असावी असे मला नेहमी वाटे तुझ्यामुळे मला ती मिळाली. तस तुझ्या लहानपणीची गोष्ट तू जेव्हा सांगितलीस तेव्हा जाणवल तुला कस अकालीच मोठ व्हाव लागल. आणि तेव्हा पासून आपल्यात मधल हे नात अधिक दृढ झालं. एकमेकांचा लहानपण जपण्याचा जणू आपण वसाच घेतला. मग काय तू धड्पडलीस किंवा एखादी चुक केलीस कि तुझी चेष्टा करायला मला मोकळीक मिळाली आणि गाल फुगवून लटक रुसायला तुला मिळाली. मैत्रीच हे नात बहिण्याच्या नात्यात बदलण्याची हि प्रोसेस खूपच छान चालू आहे.
मी तुझ्यापेक्षा मोठी असल्याचा फायदा नेहमीच घेतला, ताईगिरी केली पण तू ती खपवून घेतलीस म्हणून. माझ्यावरच्या संकटाच्या प्रसंगात तू माझ्यापेक्षा हि मोठी होऊन माझ्यासाठी लढलीस. तो बदल खरच मला अनपेक्षित होता आणि खूप काही शिकवणारा होता. तुला कोणी नाव ठेवली की मला त्रास होतो आणि तू आनंदी असलीस कि आनंद. पण हे काही मोठेपणा मिळवण्यासाठी नाही काही ते आपल्या नात्यात सहज आलं आहे. कुठल्याश्या सिनेमात,
" नात्यांची गोडी हळूहळू खुलण्यात आहे " अस म्हटलंय ते अगदी खरच आहे.
नमू दुसऱ्याच्या आनंदात सुख आणि दुखात दुख मानाणे हे चांगुलपणाचे लक्षण वैगरे बोलायला ठीक आहे पण मुळात तसं वाटायला लावणारी माणस भेटण हेच महत्वाच आहे. तुझ्या सारख्या मैत्रीच्या रूपात ती मला मिळाली हे माझ भाग्य.
तुझ्या छोट्या छोट्या चुकांवर मी पुस्तक लिहिणार म्हणून जरी मी तुला चिडवत असले तरी नमू, एक लक्षात घे कि तुझ्या चांगल्या गोष्टी आहेत माझ्याकडे पण, वेडे त्या इतक्या आहेत ना कि त्या पुस्तकात मावणार नाहीत. हे काही तुला समजत नाही.
असो, नाहीतरी तू छोटीच आहेस न माझ्या पेक्षा त्यामुळे तुला रुसायचा हक्क आहेच मुळी.
तुझीच
तृप्ती
Comments
Post a Comment