Dear Ink Pen
प्रिय शाई पेन यासं ,
तब्बल २० वर्षानंतर तुला हातात घेतले आणि लिहायला लागल्यावर आठवले ते दहावीचे पेपर्स
बोर्डाची परीक्षा. टिपिकल शाईचा वास, एकाच वेळी २-३ पेन्स जवळ ठेवणे, एकातील शाई संपली तर दुसर हव म्हणून तयारी आणि त्यावरून शाळेची आठवण झाली. शाळा संपली आणि तुझे महत्व कमी कमी होत गेले. बहुदा मनाला आणि हाताला वळण लावण्याचे दिवस संपले म्हणून असावे .
काही काळ तुझी जागा स्टायलिश बॉलपेन आणि जेलपेन यांनी घेतली. आणि मग संगणकाच्या वापरानंतर तर लिखाणाची गरज राहिली नाही. त्यामुळे एके काळी आमच्याशी घनिष्ट नात असणारा तू आता तर कित्येकांच्या आठवणीत देखील राहिला नाहीस. काळाचा महिमा दुसर काय .
खरोखर काही गोष्टी अशा असतात कि विशिष्ट परिस्थितीशी वा प्रसंगाशी त्याचं नात जोडलेलं असत. ड्रेसला पडलेले शाईच्या पेनाचे डाग, शाई निट यावी म्हणून झटकताना वह्या पुस्तकांवर नकळतपणे पडलेला शाईचा शिंतोडा. त्यामुळे नेमकी महत्त्वाचीच अक्षरे दिसेनाशी होणे हे सारे प्रकार फारच गमतीचे होते.
तुझी निफ बदलणे हा देखील एक गमतीदार प्रसंग असायचा. निफ निवडताना कधी गोल्डन तर कधी सिल्वर हवी असायची. निफ वर हलकेच दाब देऊन ती ओढून बाहेर काढायची दुसरी चांगली निफ हलकेच त्या रिकाम्या खाचेत आत ढकलायची. आणि चार ओळी लिहून बघायच्या . निफ निसटली नाही तर पक्की बसली असं समजायचं. मग पुढे transparent पेन आले त्यात लिहिताना हळूहळू कमी होत असलेली शाई दिसायची त्याची फार मजा वाटायची. ड्रोपर ने तुझ्या मध्ये शाई भरणे हे रोजच काम होत. शाई ची दौत घेऊन त्या खाली एक कागद ठेवणे मग त्यावर तुला एका हातात घेऊन दुसरऱ्या हाताने ड्रोपर ने तुझ्या मध्ये अंदाज घेत घेत शाई भरायची. हे सार काम अगदी मन लावून , शाई न सांडता करणे हि तेव्हा एक कसरत वाटायची.
खूप वर्षांनी तुला हातात घेतल्यावर मन लगेच भूतकाळात गेलं आणि तुझ आणि आमच कस नात होत ह्याची आठवण झाली. आणि हुरहूर वाटली कि अरे आपल्या पुढच्या पिढीला संगणकाच्या युगात ह्या साऱ्या आनंदाला मुकावे लागेल कि काय ?
Comments
Post a Comment