Surel Mitri 1
सुरेल मैत्री - भाग १
रविवारची रात्र, साधारण बारा वाजून गेले होते. कुठे एखादा दुसरा आवाज जर सोडला तर हॉस्पिटल मध्ये सगळी शांतता होती. अचानक आलेल्या या प्रसंगाने मी आणि माझी आई जरा बावरून गेलो होतो. आयसीयुमध्ये असलेल्या वडिलांच्या काळजीने मन अस्वथ होत. झोपायला पुरेशी जागा नव्हती , म्हणून एका बाकड्यावर आम्ही दोघी विसावलो होतो. डोळे मिटून त्याही परिस्थिती आम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असताना, अचानक कानावर कोणी तरी हळूच गाणं गुणगुणत आहे असा भास झाला. या अशा वेळी, अशा ठिकाणी कोण बर गाणं म्हणत असेल ? म्हणून डोळे उघडून इकडे तिकडे पाहिल. कोणी दिसेना जो तो झोपलेला किंवा पेंगुळलेला दिसत होता. भास झाला जाऊ दे ! म्हणून मी परत डोळे मिटले. परत तोच आवाज ऐकू आला. आता त्या आवाजाने आई हि जागी झाली होती याचा अर्थ तो भास नक्कीच नव्हता. मग मात्र मी उठले आणि आवाजाच्या दिशेने थोडी पुढे चालत गेले. चालता चालता एका ठिकाणी लाईट च्या प्रकाशात एक पाठमोरा मुलगा दुसऱ्या एका मुलाला एका गाण्याचे शब्द, त्याचा अर्थ, सांगत होता. त्याच्या आवाजात एक वेगळाच गोडवा होता आणि बोलताना ते दोघे अगदी गुंग होऊन गेले होते. मी त्यांच्या समोर अगदी दिसेल अशी उभी होते तरी त्यांना कळाल नाही. पण त्यांच बोलण थांबवावं अस देखील मला वाटल नाही. का कोण जाणे पण माझ्या मनावरचा भार एकदम हलका झाल्या सारख वाटल. डोक्यातले विचार शांत झाले. त्या दोघांच बोलणं चालूच होत पण मी मात्र माझ्या जागे कडे निघून आले आता उद्या ची चिंता तात्पुरती जावून नवीनच विचार सुरु झाला. कोण असेल हा मुलगा ? ह्या हॉस्पिटल मध्ये काय करतोय या वेळी ? आणि गाणी काय म्हणतोय ? हा गायक असेल का ? यांच्या घरच कोण आजारी असेल ?
बाकापाशी आल्यावर आईने विचारलं कोण गातंय ग ? आवाज चांगला वाटतोय , का रेडीओ चालू आहे ? मग मी तिला सगळ सांगितलं. तिलाही जरा आश्चर्य वाटल म्हणाली, 'या आवाजाने मनावरचा ताण एकदम हलका झाला बघ, आता मला चांगली झोप येते आहे.' मी म्हणल, ' थांब ! इथे आत जाऊन परत पाहते तुला झोपायला जागा आहे का ?' तशी एक काका पण त्या आवाजाने कि काय जागे झाले होते ते म्हणाले, त्या तिकडे तुम्हाला झोपायला जागा आहे. बघितलं तर २ जागा रिकाम्या होत्या खऱ्या पण त्यावर कोणी तरी त्याचं सामान ठेवलं होत. ते सामान बाहेर काढून आपण कस तिथे झोपायच ? या विचारात असताना ते काका लगबगीने पुढे आले आणि म्हणाले थांबा ! ते सामान द्या इकडे ते लोक काही आता इकडे लवकर झोपायला येणार नाहीत. आले तर मी दुसरी कडे जागा देईन त्यांना. तुम्ही दोघीजणी बिनधास्त झोपा. आई दमलीच होती तिला लगेच झोप लागली. मला मात्र काही केल्या पटकन झोप येईना. आत्ताचे घडलेले सगळे प्रसंग जरा विचित्र वाटू लागले मी अंथरुणात उठून बसले . ते पाहून परत ते काका म्हणाले," झोप मुली तू, त्यांची काळजी करू नको मी बघतो." मग मी मनात म्हंटल जे होईल ते होईल मात्र आत्ता झोपलो तर उद्या धावपळ करता येईल. आणि मधून मधून हलके हलके ऐकू येणाऱ्या त्या स्वरांनी मी शांत झोपी गेले इतकी कि माझ्या इथे कोणी आल्याची चाहूल देखील मला लागली नाही.
Comments
Post a Comment