सुरेल मैत्री ४   



   वाऱ्याच्या गतीने दिवस पळत होते सुदैवाने बाबंची तब्येत सुधारत होती. आता आयसीयू मधून बाबांना बाहेर आणायचा दिवस उजाडला. त्या दिवशी सगळे खूप आनंदात होतो. संदीप , त्याचे घरचे यांना देखील खूप आनंद झाला होता. चार दिवस सतत काळजीत असलेले आम्ही सारे जणू काही एक कुटुंबीय झालो होतो.  माणुसकीच्या एक धाग्याने सगळा परकेपणा  पुसला होता. ज्या दिवशी आम्ही दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट झालो त्या दिवशी आमचे हॉस्पिटल मधले सर्व सोबती बाबांना येउन भेटून गेले.  त्यामुळे बाबांना  देखील खूप फ्रेश वाटत होते. हळू हळू  रूम बाहेर पडून चालायला त्यांनी सुरवात केली होती.

   संदीप च्या बाबांची तब्येत देखील सुधारली होती त्यानाही आता आयसीयू मधून बाहेर आणले होते. आमच्या खालच्या मजल्यावर ते शिफ्ट झाले होते. आम्ही रूम बदलली तरी वेळ मिळाला कि त्यांना भेटायला जात असू. असे करता करता आमचे जाण्याचा दिवस आला. सर्वांचे निरोप घेऊन आम्ही घरी निघालो तेव्हा आमच्या सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू  होते ते दोन अर्थाने एक म्हणजे खूप मोठ्या संकटातून सुटलो आणि आपल्याला आणखीन चांगली माणसे मिळाली. आमची आठवण ठेवा विसरू नका, असे एकेमकांना सांगून फोन नंबर ची देवाण घेवाण झाली.

        या गोष्टीला आता ९ वर्षे झाली. त्यावेळीस तो गाणारा मुलगा आता स्टार झाला आहे. त्याने खूपच उंच भरारी मारली आहे तरीही आमच्या तेव्हाचे मैत्रीचे  घट्ट झालेले  धागे आजही तसेच घट्ट आहेत. कधीही पेपर मध्ये त्याचा फोटो पाहिला कि आम्हाला त्या प्रसंगाची आठवण येते. नुकताच त्याचा ' चला हवा येऊ द्या ' मध्ये कार्यक्रम झाला आम्ही सर्वांनी तो पाहिला त्या निमित्ताने या  जुन्या  आठवणींचा लेखन प्रपंच झाला .


Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज