Posts

Showing posts from 2019

जाणीव

प्रेम म्हणजे काय ? हे नीट समजतंही नव्हतं तिला. तेव्हापासून तिनं मनात ‘कृष्ण’ जपला होता. खरंतर आपण मनात ‘कृष्ण’ जपलाय ही जाणीवही नव्हती तिला. पण तरीही प्रेम आणि समर्पण इतकं होतं की नीळंशार आकाश, दुपारचं स्वच्छ उन, झाडांच्या सावल्या, संध्याकाळचा गारवा, चांदण्यांची चाहूल, चंद्राचं अस्तित्व, नदीचा प्रवाह सारं काही कृष्णमय आहे असं वाटायचं तिला. आणि त्या सगळ्यांच्या अनुभूतीत डुंबायची ती. तिचं वयात येणं असं मोरपंखी होतं. तरल, स्वप्नील... सात्विक. कसलासा अपार आनंद, तो लुटत असताना आपल्याच भाग्याचा हेवा वाटून मधेच जाणवणारी हुरहूर... आणि तृप्तता... विलक्षण तृप्ततेत तिचं तारुण्य बहरलं होतं. दिवस कसे वाऱ्याच्या वेगानं उडून जात होते. आणि अचानक एक दिवस   तिला वाटलं, हे जे सगळं हवंहवंसं वाटतंय ते व्यक्त करायला कुणीतरी हवं. आपलं असं. हे असं का वाटतंय हे ही तिला समजत नव्हतं. हे वाटणं योग्य का अयोग्य ? हे ही समजत नव्हतं... ती गोंधळली...बावरली. आजपर्यंत असं कधीही झालं नव्हतं. मनात प्रश्नच आले नव्हते. जे मिळत होतं, भावलं होतं ते ती टिपत गेली. कसलाही विचार न करता. किंबहुना आपण ते टिपत आहोत हे ह...

मोहिन चित्र शैली - विचारभारती मासिक

विचारभारती या मासिकात मोहिन चित्रशैली वरचा माझा लेख छापून आला आहे. संपादक मिलिंद जोशी सर आणि मिलिंद देशपांडे आणि त्यांचे सहकलाकार या दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद !   चित्रकलेचं आणि माणसाचं नातं हे फार फार प्राचीन काळापासूनचं आहे. माणूस बोलायलाही लागण्याआधी चित्रांच्या सहाय्यानं संवाद साधत होता. आपल्या गुहेतल्या भिंतीवर तो नैसर्गिक रंग आणि कुंचल्याच्या सहाय्यानं चित्रांद्वारे आपल्या भावना व्यक्त करत होता. कालांतरानं जसं आदिमानवाची उत्क्रांती होत होत तो प्रगत होत गेला, त्याच्या शरीरात, राहणीमानात, वर्तनात बदल होत गेला; तशी भावना व्यक्त करण्याची त्याची पद्धतही बदलत गेली. पुढं पुढं तर भाषेचाही उगम आणि विकास झाला. तसं सांस्कृतिक आणि तांत्रिक प्रगतीही झपाट्यानं होऊ लागली. स्थिर आणि सुरक्षित अशा जीवनात मग त्याच्या या भित्ती चित्रांची जागा वेगळ्या माध्यमानं घेतली. आणि मग चित्र काढण्याच्या विचारात, पद्धतीत, विषयात ही अमुलाग्र बदल घडू लागला. त्यामध्ये तात्कालीन जीवन संस्कृतीचं, समाजाचं, नीतीमूल्यांचं चित्रण दिसू लागलं. आणि त्या त्या पद्धतीनुसार त्या त्या चित्रांमध...

अट

कोरे कागद, रंग, पेन्सिली, शार्पनर, पट्टी, खोडरबर असा सगळा जामानिमा घेऊन बसलं तरी काही केल्या रमाला चित्र कोणतं काढावं ते सुचेना. सुट्टीत रोज एकतरी चित्र काढेनच असं तिनं तिच्या बाबांना प्रॉमिस केलं होतं. सुरुवातीचे काही दिवस उत्साहात पार पडलेही होते. मासिकातली, पुस्तकातली आवडती रेखाटनं, चित्रं शोधून ती एका वहीत चिकटवूनही ठेवली होती. आणि आता यातलं एकेक चित्र बघून काढायचं असं सुरुवातीला तिनं ठरवलं खरं पण आता तिलाच ती एकसारखी चित्रं पाहून तसंच काढण्याचा कंटाळा आला होता. पण रोज एक चित्र काढायचं म्हणून तर बाबांनी त्यांचा कॅन्व्हास, ड्रॉइंग बोर्ड, त्यांच्या पेन्सिली असं सारं काही रमाला वापरायला दिलं होतं. ज्या दिवशी चित्र काढलं जाणार नाही त्या दिवसापासून बाबांचं हे सगळं सामान रमाला वापरता येणार नव्हतं. शिवाय बाबांची अजून एक अट होती. खरंतर चित्र काढण्यापेक्षा ती ‘अट’ सांभाळणंच रमाला अवघड जात होतं. आपण निवडलेलं चित्र का निवडलं? त्यात काय वेगळेपण आहे असं तिला सांगायचं होतं. प्रत्येक चित्रातलं वेगळेपण हुडकणं हे खूपच कठीण काम आहे असं रमाला जाणवू लागलं. शिवाय चित्राची माहिती...

बाग - कथुली

बाग “तुझ्या तुळशीच्या रोपाकडे बघ गं. काय झालंय ? तुळस नीट बहरेल की नाही शंकाय.” घरात येताच आईचं हे वाक्य कानावर पडलं तशी रमा धावतच तुळशीच्या रोपाकडे गेली. बघितलं तर रोप तसंच होतं. त्याला काही झालं नव्हतं. मग आई का असं म्हणतीय? रमा गोंधळली. हातपाय स्वच्छ धुवून ती पुन्हा कुंडीजवळ गेली. तिनं नीट निरखून पाहिलं तेव्हा तिला दिसलं की तुळस वाढण्याऐवजी दुसरंच काहीतरी उगवलंय त्यात. हं ... हे तण आहे तर... असा विचार कर असतानाच तिला काही दिवसांपूर्वीचा प्रसंग आठवला.  बाबांच्या एका मित्राची बाग बघून आल्यानंतर ती बाबांच्या मागे लागली होती. आपण पण बाग करूया नं. तेव्हा बाबांनी तिला समजावलं होतं “बाग करणं इतकं सोपं नाही रमा ! एखाद्या माणसाइतकीच निगुतीनं त्याची काळजी घ्यावी लागते. नुसती कुंडी आणली, त्यात रोप लावलं, त्याला खत, पाणी, उन इतकं दिलं की बाग तयार होते असं नाही काही. त्याला खूप जपावं लागतं. त्यात तण होऊ नये म्हणून, पक्षी सुद्धा कधी कधी छोटा कोंब खाऊन टाकतात. त्यापासूनही जपायला लागतं. इतकं सगळं जमेल का तुला ?”   तेव्हा तिनं उत्साहात होकार दिला होता. “ठीक आहे मग. तुला आता सु...

खिडक्या अर्ध्या उघड्या

तर दिसतं असं की, उंचीवरच्या माणसांनाही दरीची खोली भिववतेच; कारण स्वतःच्या जगण्याचा ते केंद्रबिंदू झालेले असतात. निसर्गनियमाप्रमाणे जेव्हा चढ येतो तेव्हा उतारही असतोच. मात्र याची जाणीव होईस्तोवर बऱ्याचदा उशीर झालेला असतो म्हणजे घडतं असं की, माणसं आपल्या जगण्यातून स्वतःच स्वतःसाठी समस्या निर्माण करतात आणि त्यात अधिकाधिक अडकत जातात.  'खिडक्या अर्ध्या उघड्या' या गणेश मतकरींच्या कादंबरीवजा कथासंग्रहातून ही गोष्ट प्रकर्षानं जाणवते. या कथांमधल्या व्यक्तिरेखा या उच्चभ्रू समाजातल्या आहेत. रोजच्या रोजीरोटीच्या, जातिभेदाच्या समस्या त्यांच्या आयुष्यावर फारशा परिणाम करू शकत नाहीत. मात्र वरती म्हटल्याप्रमाणे आपल्याच जगण्याच्या उंचीचं आता त्यांना भय वाटू लागलं आहे. ही उंची काही कायम राहू शकणार नाही याची जाणीव झाल्यावर त्या या उंचीच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना जगण्यासाठी केवळ उंचीच आवश्यक नसून खोलीही तितकीच आवश्यक आहे हे त्यांना जाणवू लागतं.  मग अर्ध्या का होईना उघड्या खिडकीतून आपल्यापेक्षा वेगळं बाहेरचं जग पाहू लागतात आणि समस्यांच्या मुळाशी पोहोचतात. त्या...

नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य

छत्री घेतली म्हणजे पाऊस नाहीसा होतं नाही पण पावसात आपण स्थिरतेनं उभं राहू शकतो. स्वतःला कोरडं ठेवू शकतो. हे सत्य निरनिराळ्या व्यक्तिरेखांतून, भुमिकांतून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न म्हणजे 'नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हा कथा संग्रह. या कथा वाचत वाचत आपण सहजगत्या विषयाच्या मूळापाशी जाऊन पोहोचतो.  मनुष्याच्या जन्मापासूनच त्याच्याशरीराचा भाग असणारी नाभि त्याच्या काही समस्यांशीही नकळतपणे जोडली गेली आहे. त्या समस्यांची मुळं तीच्या पोटात दडली आहेत.  या समस्या जुन्यापुराण्या आहेत. कित्येकदा त्या आपापल्यापरीनं सोडवण्याचा प्रयत्नही माणसानं केला आहे. पण त्याच्या मुळापर्यंत न जाता वरवरच्या इतर गोष्टींनाच महत्त्व दिल्यानं त्या अधिकाधिक जटील झाल्या आहेत. जगण्याच्या संघर्षाचं प्रमुख कारण ठरल्या आहेत. मानवी नात्यांवर, जगण्याच्या बदलत चाललेल्या मुल्यांवर ,एकूणच माणसांच्या आणि मनुष्येतर जीवांच्याही सहजीवनावर पुर्नविचार करायला लावणार्या या 'नाभि'कथा आहेत. त्यामुळं प्रणवच्या या कथांतून तुटलेली छत्री आणि बदनाम झालेला काळा तलावही आपलं मन 'मोकळं' करत...

जागतिक कविता दिन

आज २१ मार्च जागतिक कविता दिन. कविता या साहित्यप्रकाराचं ‘जतन’ आणि ‘संवर्धन’ करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. अगदी याच भावनेतून गेली एकोणीस वर्षं म्हणजे २००० सालच्या एप्रिलपासून ‘कुसुमाकर’ हे कवितेला प्राधान्य देणारं मासिक प्रकाशित होत आहे. भांडूप येथील कवी, लेखक, संपादक, प्रकाशक ‘श्याम पेंढारी’ हे याचे सर्वेसर्वा आहेत. नवोदित आणि प्रथितयश अशा दोन्ही कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणारं हे मासिक सुरु झालं ते एका काव्यमंचापासून.  १९९५ साली पेंढारी सरांनी ‘काव्यगंध’ न ावाचं मंडळ स्थापन केलं. कवींनी एकत्र येऊन आपापल्या कविता सादर कराव्यात, त्यांच्यावर चर्चा घडाव्यात, विचारांची, मतांची देवाणघेवाण व्हावी हा याचा उद्देश होता. साधारणपणे चार एक महिन्यांनी ते एखाद्या नामवंत कवीला बोलावून कवी संमेलनही भरवत असत. संमेलनाला कवींचा उत्तम प्रतिसाद मिळायचा. एकूण प्रवासात चारशे-पाचशे कवींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमांचं आयोजन सदस्यांच्या मासिक वर्गणीतून करीत असत. कवितेच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं हा त्यांचा व्यासंग होता. या कामात त्यांना कवयित्री सीमा बिठाणे, कवयित्री ...

संवादी कुलुप

माझ्या लहानपणीची गोष्ट. तेव्हा आम्ही चाळीत रहायचो. घरोघरी फोन नसण्याचा आणि सांगून वेळ ठरवूनच कुणाकडे जावं इतकी औपचारिकता पाळण्याचा तो काळ नव्हताच. माणसं एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुक असायची. त्यामुळं आपण कुणाकडे जाणार असलो किंवा कुणी आपल्याकडे येणार असलं तरी शेजारीपाजारी सांगून जायची पद्धत होती. किंवा अगदी शेजारीही नसतील तर मात्र दरवाजाचं कुलूप शेजाऱ्याचं काम करायचं. समजा आपण अपरिहार्य कारणामुळे बाहेर जाणार असू आणि कोणी येणार असेल तर अशा परिस्थितीत आमचं कुलूप आमच ्यावेळेला दोस्तासारखं धावून यायचं. आम्ही येणाऱ्याव्यक्तीसाठी कुलुपाला छोटीशी चिठ्ठी अडकवून जायचो. ती चिठ्ठी अडकवण्याचीही एक सांकेतिक पद्धत होती आणि वाचणाऱ्याला ती बरोबर समजायची. असंच आम्ही एकदा बाहेर गेलो होतो आणि आमच्याकडे बाबांचे एक मित्र म्हणजे काळे काका आले. घराला कुलूप पाहिल्यावर शेजारी गेले तर शेजारील घरही कुलुपबंद. मग त्यांनी आमच्या कडी कुलुपाच्या मधल्या जागेत एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या सोबतच एक छोटसं चाफ्याचं फुल ही चिठ्ठीत गुंडाळून ठेवलं. त्याचं काम झालं होतं. त्यांची खेप काही वाया गेली नव्हती....

मधुमालती

आठवणींच कुलूप उघडलं की दरवाजा उघडण्याची वाटही न पाहता मिळेल त्या फटीतुन बाहेर येऊ पाहतात हेच खरं. परवा संध्याकाळी युटर्न घेता घेता एका बंगल्यातनं हळूच बाहेर डोकावणारी मधुमालती नजरेस पडली. तीच्या जवळून जाताना तीचा ओझरता स्पर्श झाला तेव्हा एक मंद सुवास आला आणि त्याच्या सोबतच मला कवी बाईंच्या शाळेत घेऊन गेला.  मधुमालतीचं झाड म्हणजे आपली शाळा आली अशी एक खुण होती. शाळेत जाताना मधुमालतीचे घोसच्या घोस फुललेले असायचे. तेव्हाची घरगुती बालवाडीची शाळा होती ती. पण अंगण स्वच्छ ध ुतलेलं. दारात रेखीव रांगोळी आणि सोबतीला असंख्य फुलांचा वास दरवळणारा आणि थंडावा देणारी सावली. सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यंत प्रेमळ, मनमिळावू अशा कवी बाई. कधीच कोणावर न रागावणाऱ्या. शाळेतल्या सगळ्या मुलांवर विलक्षण प्रेम करणाऱ्या. तर ही मधुमालती इतकी फुललेली असायची की तिच्या वेलीच्या कमानीखालुन जावं लागायचं आणि आम्हाला ते फारच आवडायचं. थोडे पाय वर करून किंवा उड्या मारून आम्ही ती फुलं तोडण्याचा प्रयत्न करायचो. कधी मिळायची, कधी मिळायची नाही. जी मुलं उंच होती. त्यांना पटकन तोडता यायची. आपण पण उंच असाय...