खिडक्या अर्ध्या उघड्या

तर दिसतं असं की, उंचीवरच्या माणसांनाही दरीची खोली भिववतेच; कारण स्वतःच्या जगण्याचा ते केंद्रबिंदू झालेले असतात. निसर्गनियमाप्रमाणे जेव्हा चढ येतो तेव्हा उतारही असतोच. मात्र याची जाणीव होईस्तोवर बऱ्याचदा उशीर झालेला असतो म्हणजे घडतं असं की, माणसं आपल्या जगण्यातून स्वतःच स्वतःसाठी समस्या निर्माण करतात आणि त्यात अधिकाधिक अडकत जातात. 

'खिडक्या अर्ध्या उघड्या' या गणेश मतकरींच्या कादंबरीवजा कथासंग्रहातून ही गोष्ट प्रकर्षानं जाणवते. या कथांमधल्या व्यक्तिरेखा या उच्चभ्रू समाजातल्या आहेत. रोजच्या रोजीरोटीच्या, जातिभेदाच्या समस्या त्यांच्या आयुष्यावर फारशा परिणाम करू शकत नाहीत. मात्र वरती म्हटल्याप्रमाणे आपल्याच जगण्याच्या उंचीचं आता त्यांना भय वाटू लागलं आहे. ही उंची काही कायम राहू शकणार नाही याची जाणीव झाल्यावर त्या या उंचीच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना जगण्यासाठी केवळ उंचीच आवश्यक नसून खोलीही तितकीच आवश्यक आहे हे त्यांना जाणवू लागतं. 

मग अर्ध्या का होईना उघड्या खिडकीतून आपल्यापेक्षा वेगळं बाहेरचं जग पाहू लागतात आणि समस्यांच्या मुळाशी पोहोचतात. त्या वेळेस त्यांना उमगलेलं सत्य म्हणजे त्यांचा संघर्ष कुणा बाहेरच्या व्यक्तीशी नसून त्यांच्याच 'स्व'शी आहे. या अस्सल जाणिवेनंतरचा त्यांचा वैचारिक प्रवास फारच महत्त्वाचा आहे. वाचक म्हणून आपल्यालाही विचारप्रवृत्त करणारा...

तो अनुभवण्यासाठी आपणही या अर्धउघड्या खिडकीतून एकदा डोकवायला हवं.

तृप्ती

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज