मधुमालती


आठवणींच कुलूप उघडलं की दरवाजा उघडण्याची वाटही न पाहता मिळेल त्या फटीतुन बाहेर येऊ पाहतात हेच खरं. परवा संध्याकाळी युटर्न घेता घेता एका बंगल्यातनं हळूच बाहेर डोकावणारी मधुमालती नजरेस पडली. तीच्या जवळून जाताना तीचा ओझरता स्पर्श झाला तेव्हा एक मंद सुवास आला आणि त्याच्या सोबतच मला कवी बाईंच्या शाळेत घेऊन गेला. 

मधुमालतीचं झाड म्हणजे आपली शाळा आली अशी एक खुण होती. शाळेत जाताना मधुमालतीचे घोसच्या घोस फुललेले असायचे. तेव्हाची घरगुती बालवाडीची शाळा होती ती. पण अंगण स्वच्छ धुतलेलं. दारात रेखीव रांगोळी आणि सोबतीला असंख्य फुलांचा वास दरवळणारा आणि थंडावा देणारी सावली. सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यंत प्रेमळ, मनमिळावू अशा कवी बाई. कधीच कोणावर न रागावणाऱ्या. शाळेतल्या सगळ्या मुलांवर विलक्षण प्रेम करणाऱ्या. तर ही मधुमालती इतकी फुललेली असायची की तिच्या वेलीच्या कमानीखालुन जावं लागायचं आणि आम्हाला ते फारच आवडायचं. थोडे पाय वर करून किंवा उड्या मारून आम्ही ती फुलं तोडण्याचा प्रयत्न करायचो. कधी मिळायची, कधी मिळायची नाही. जी मुलं उंच होती. त्यांना पटकन तोडता यायची. आपण पण उंच असायला हवं असं तेव्हापासून वाटायचं. उंचीच वेड लागण्यात त्या मधुमालतीचा वाटा असावा असं अजूनही मला वाटतं. पण फांदी वाकवून फुल तोडावीत असं काही वाटायचं नाही तेव्हा. कोवळं वय ते कुणाला तरी वाकवण्यापेक्षा आपण उंच उडी मारून पोहोचण्यातल्या मजेचं तेव्हा फारच अप्रुप असायचं. मग आमच्यात स्पर्धा कोण उंच उडी मारतंय याची. जितकी फांदी उंच तितका ती गाठण्याचा आटापिटा आणि आनंद असायचा. नुसता फुलाला हात टेकला तरी 'सपशेल पास' असायचो आम्ही. तो दिवस आनंदात जायचा आणि जो फुल तोडेल तो तर एकदम 'हुश्शार'. त्यानं फार काही मिळवलं असं वाटायचं. 

मग एक दिवशी मला नाव आठवत नाही त्याचं पण एक मुलगा म्हणाला आपण रोज फुल तोडतो अशानं एक दिवस झाड नाहीसं होईल की रे. आम्ही सगळे बावरलो. झाड नसेल?! कल्पना सहन होणं शक्यच नव्हतं. मग जरा फुलं तोडण्यातला उत्साह कमीच झाला. कारण वेलीच्या खालून जाण्यातली मजा काही औरच होती. काही केल्या ती काही आम्हाला गमवायची नव्हती. पुढं दुसऱ्या शाळेत गेलो हर्डीकर बाईंच्या. त्या बंगल्याभोवती मधुमालती होती पण तीच्या अशा वेली नव्हत्या. तेव्हापासून मधुमालती अंतरली ती अंतरलीच आणि उंच उडी मारण्यातली गंमतही. 

हायस्कुलात जात असतानाही मधुमालतीच्या ओढीनं कवी बाईंकडे जाण्याचा हट्ट मी बाबांकडे केला होता. मग एकदोनदा गेलोही होतो पण मधुमालती तितकीशी बहरलेली नव्हती. नंतर नंतर तर ती फारच रोडावली. तीचं अलीकडचं प्रत्यक्षातलं रूप काही बघवेना. आणि मनातल्या मधुमालतीला निरोप काही देववेना. मग आपल्या घरासमोर अंगण असावं, त्यात असं मोठं झाड असावं, त्याच्या फुलांच्या कमानी खालून आपण रोज जा-ये करावं अशी खोल इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. जी आजतागायत अपुर्णच आहे. आता बघुया ती कधी पुर्ण होतेय.

तृप्ती

Comments

Popular posts from this blog

बाग - कथुली

तारेवरच्या कसरती

मोहिन चित्र शैली - विचारभारती मासिक