संवादी कुलुप


माझ्या लहानपणीची गोष्ट. तेव्हा आम्ही चाळीत रहायचो. घरोघरी फोन नसण्याचा आणि सांगून वेळ ठरवूनच कुणाकडे जावं इतकी औपचारिकता पाळण्याचा तो काळ नव्हताच. माणसं एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुक असायची. त्यामुळं आपण कुणाकडे जाणार असलो किंवा कुणी आपल्याकडे येणार असलं तरी शेजारीपाजारी सांगून जायची पद्धत होती. किंवा अगदी शेजारीही नसतील तर मात्र दरवाजाचं कुलूप शेजाऱ्याचं काम करायचं. समजा आपण अपरिहार्य कारणामुळे बाहेर जाणार असू आणि कोणी येणार असेल तर अशा परिस्थितीत आमचं कुलूप आमच्यावेळेला दोस्तासारखं धावून यायचं. आम्ही येणाऱ्याव्यक्तीसाठी कुलुपाला छोटीशी चिठ्ठी अडकवून जायचो. ती चिठ्ठी अडकवण्याचीही एक सांकेतिक पद्धत होती आणि वाचणाऱ्याला ती बरोबर समजायची. असंच आम्ही एकदा बाहेर गेलो होतो आणि आमच्याकडे बाबांचे एक मित्र म्हणजे काळे काका आले. घराला कुलूप पाहिल्यावर शेजारी गेले तर शेजारील घरही कुलुपबंद. मग त्यांनी आमच्या कडी कुलुपाच्या मधल्या जागेत एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या सोबतच एक छोटसं चाफ्याचं फुल ही चिठ्ठीत गुंडाळून ठेवलं. त्याचं काम झालं होतं. त्यांची खेप काही वाया गेली नव्हती. 

कारण जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा दरवाजाला अडकवलेली चिठ्ठी पाहिली पण चिठ्ठी न उघडताच आम्हाला कळलं की कोण येऊन गेलंय आणि त्यांना काय बातमी द्यायची आहे. चाफ्याचं फुल म्हणजे काळे काका आले आणि एखादं होऊ घातलेलं काम चांगलं झालं म्हणून हे चाफ्याचं फुल इथं ती सुवार्ता सांगत बसलं आहे. त्यांची हीच खासियत होती. एखादी चांगली बातमी असली की हमखास ते चाफ्याची फुलं आणायचे. अशा प्रत्येकाच्या येण्याजाण्याच्या काही खुणा ठरलेल्या असायच्या.

परवा एका ठिकाणी जायचं होतं तर फोन उचलला नाही म्हणून जायचं रहित केलं. उगाच घराचं कुलूप कशाला पहा असा विचार मनात आला आणि स्वतःच्याच विचारांचं आश्चर्य वाटलं... आपला हा इथ पर्यंतचा यंत्राधारित प्रवास कसा काय झाला? संवादाची माध्यम नव्हती तेव्हा कधीच त्यावाचून अडलं नाही भेटी होत होत्या. चुकामुकही होत होती पण त्यातही एक निराळाच आनंद होता. खरतरं त्या चीठ्ठ्यातून, क्वचित शेजारी ठेवलेल्या खाऊतून, नात्यातला जिव्हाळा अधिक वाढत होता. जपला जात होता. आणि आता ... आता संवादाची थेट साधनं असूनही भेट होणं मुश्कील झालं आहे. इतकंच काय मुळात संवाद होणंच मुश्कील झालं आहे अगदी हातात फोन असले तरीही. म्हणून तेव्हाच्या कुलुपाची अशी कुलुपबंद आठवण अचानक उघडली गेली.
तुमच्याही असतील ना अशाच काही कुलुपबंद आठवणी.

तृप्ती

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज