उन्हाळा
तुम्ही कितीही नाकं मुरडा त्याला तरीही तो येतोच नेमानं. आणि सगळं
वातावरण उजळवून टाकतो आपल्या अस्तित्वानं. त्याचा रखरखीत स्पर्श नकोसा असला
तरी त्याच्या खाली थोडी का होईना ओल असतेच की. मला तर तो शिवासारखाच
भासतो. संहार आणि निर्मिती या दोहोला कारणीभुत असणारा. सृष्टीच्या
कल्याणासाठी स्वत: देखील संन्यस्त राहणारा.
आपल्या रुक्षत्वाची खोल आणि ओल जाणिव असतेच की त्याला , म्हणून तर त्याची परतफेडही तो वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. आपण फक्त त्याला नीट जाणलं पाहिजे.
आंबा, कैरी, कलिंगड, टरबुज,
उस अशा नानाविध रसदार, चित्तवृत्ती शांत करणार्या फळांची लयलूट करतो तो.
दिवसाचे कितीतरी प्रहर त्याच्यामुळं अनुभवायला येतात. आणि चैत्रगौरीचं हळदी
कुंकू, पन्हं, कैरीची डाळ यासगळ्यानं रूक्षपणा कमी करून वातावरणात
आपलेपणाचा गारवा आणायचा प्रयत्नही करतोच तो. निसर्गाच्या प्रत्येक घटकात
प्रकाशाचे उजळ रंग भरतो. अगदी झाडांच्या सावल्यासुद्धा मोहक वाटतात.
रात्रीचं निरभ्र आकाश, चमचमणार्या चांदण्या, सोबतीला मोगरा आणि रातराणी,
चाफा यांचा सुगंध, माठातलं वाळ्याचं पाणी, उसाचा रस. हे सगळं अनुभवण्यासाठी
उन्हाळाच हवा. सणावारांमध्ये फारसा न रमणार्या त्याला राम नवमी, हनुमान
जंयती, अक्कलकोट स्वामींची जयंती अशा निरनिराळ्या विभुतींनी मात्र आपलंस
केलंय. कदाचित यासाठीच त्यानं हा वैराग्याचा सोस पत्करला असावा.
ऊन ऊन सोबत देणारा हा उन्हाळा आताशी कडक होवु लागलाय ते त्याला आपलंस न
केल्यानंच. त्याला काय हवं ते न दिल्यानंच. त्याला हवीए. हिरवाई त्याच
स्वतःचं ऊन ऊन पण शमवण्यासाठी. त्यालाही डुंबायचंय खोल खोल नितळपाण्यात. पण
आपण त्याला तशी कुठं सोय ठेवलीए. ती ठेवली असती तर... त्यालाही आवडलंच
असतं बहरायला. करपण्याचा का त्याला सोस आहे?
तृप्ती
तृप्ती
Comments
Post a Comment