नोंद

नोंद

वाचता वाचता आवडलेल्या ओळींवर हळुवारपणे पेन्सिलने खुणा करायची रमाला सवयच होती. आजही एक वाक्य तिला आवडलं ‘जेवढा अंधार असतो, त्या आकाराचा दिवा लागत नाही. अंधार मोठा असतो, पण दिवा छोटा असला तरी अंधार घालवता येतो.’ अहाहा ! काय सुंदर वाक्य आहे हे. एका वाक्यात आख्ख्या लेखाचा सारांश आलाय. इतकं छान वाचल्यावर आजच्या वाचनाचं सार्थक झालं. आजचा दिवस चांगला जाणार असं तिला वाटू लागलं. वाक्य पुस्तकाइतकंच मनात नोंदवलं गेलं. 

पहाटेच्या रम्य वेळी हातात चहाचा कप आणि सोबतीला असं एखादं पुस्तकं असेल तर तो दिवस शुभ आहे असं मानायला हरकत नाही असा विचार तिच्या मनात यायला आणि देवळात घंटानाद व्हायला एकच गाठ पडली. अतीव समाधानानं तिनं पुस्तक मिटलं. घंटानादाच्या तालावर एखाद्यानं आरती म्हणावी तशा तल्लीनतेनं ती ते वाक्य पुन्हा पुन्हा म्हणू लागली. 

खरंच पुस्तक वाचण्यातनं माणसाला काय मिळू शकेल हे काही सांगता येत नाही. आईचं हे वाक्य तिला पुन्हा आठवलं. त्याचबरोबर सवड मिळेल तेव्हा पुस्तकं वाचणारी आईही आठवली. ‘तुला असं सतत वाचून वाचून कंटाळा येत नाही का गं ?’ एकदा न राहवून तिनं आईला विचारलं होतं. तेव्हा आईनं ‘पुस्तक माणसाला कधी आणि काय काय देऊ शकतं ते सांगता येत नाही रमा’. असं सांगितलं होतं. रमानं फक्त हसून मान डोलावली होती. वाक्याचा अर्थ खोलवर कळण्याइतकी समज तिला आली नव्हती. अजून परीकथेच्या विश्वातून बाहेरच्या विश्वात यायला तिला जरा अवकाश होता. 

पण आता मात्र या वाक्याचा अर्थ तिला कळू लागला होता. खरंच किती वेगळंच आहे ना हे सगळं. वैश्विक मन म्हणतात ना ते आहेच नक्की कुठेतरी. नाहीतर लेखक लिहितो ती परिस्थिती किती वेगळी, वाचक वाचतो ती परिस्थिती किती वेगळी. दोघांच्या विचारपद्धती, जगण्याच्या पद्धती किती भिन्न तरीही काही काळासाठी त्या दोघांच एक वेगळंच भावविश्व तयार होतं नाही? लेखकाच्या शब्दखुणांच्या आधारे वाचक एका अज्ञाताच्या प्रवासाला निघतो. कुठं जाणार माहित नाही. कसं जाणार माहित नाही. पण लेखकावर भरवसा मात्र असतो. हा प्रवास अनुभवावासा वाटतो हेच खरं. 

रमाला मनोमन आश्चर्य वाटलं. एखाद्या परिस्थितीत आपण एखादं पुस्तक वाचायला घेतलं काय ? आणि आपल्या पुढं हे वाक्य आलं काय ? आपल्या आत्ताच्या परिस्थितीला किती चपखल लागू होतं हे वाक्य. जेवढं संकट मोठं तेवढा उपाय ही मोठाच पाहिजे. शिवाय संकटाला तोंड देण्यासाठी आपल्या सोबत कोणती तरी महानशक्ती असली पाहिजे असंच का वाटतं आपल्याला ? आपला छोटासा दिवासुद्धा त्या अंधाराला तोंड द्यायला पुरेसा आहे असा साधा विचारही आपल्या मनात कधीच का येत नाही ? 

प्रश्नांची एकामागून एक येणारी आवर्तनं आता तिला पुरती वेढून टाकणार हे तिनं ओळखलं. आता या भोवऱ्यात सापडण्याआधीच त्या प्रश्नांना वाहत्या पाण्यात सोडून द्यावं असंच तिला वाटलं.
असाही वाढता प्रवाह तिला साद घालत होताच....

तृप्ती

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज