आठवणी गुणगुणतात तेव्हा...


परवा एका कार्यक्रमात 'अमृताहूनी गोड नाम तुझे देवा' हे गाणं कानावर पडलं... अन् नकळत मी ते गुणगुणायला लागले ते अगदी थेट घरी येईपर्यंत. बराच वेळ आपण तेच गाणं गुणगुणतोय हे पटकन लक्षातही आलं नाही... पण मनाला एकदम मोकळं वाटलं.

अरे वा! आज इतकं का प्रसन्न वाटतंय ? यावर नकळतच विचार चालू झाला. मोठं झालं की असं असतं, मन आनंदी असलं तरीही आपण लगेच त्याचं कारण शोधतो.

असं कारण शोधताना जाणवलं की, अरे हे गाणं आपण कुंटेबाईंच्या क्लासमध्ये म्हणायचो. आमच्या घराजवळच हा क्लास होता. जवळपास महिनाभर हे गाणं त्या आमच्याकडून घोटून घेत होत्या. सुट्टीतला तो क्लास, भर दुपारची तीन ते चार वेळ आणि आम्ही मस्त जेवण करून पायीपायी क्लासला जायचो. काही दिवसांनंतर मात्र त्याच-त्याच गाण्याचा कंटाळा यायला लागला... पण इलाज नव्हता.

या आठवणीबरोबरच मग गाण्याच्या कितीतरी आठवणी निघाल्या. खास करून माणसांच्याच...
एखादं गाणं पहिल्यांदा कुणाच्या तोंडून ऐकलंय बरं...
सगळ्यांत पहिली आठवली अश्विनीकाकू, अश्विनी मेढेकर. 'मागे उभा मंगेश' हे गाणं कधीही, कुठंही लागलं तरी पटकन अश्विनीकाकूच डोळ्यांपुढं येते. हे तिचं पेटंट गाणं. सुंदर आणि विलक्षण गोड आवाज. ते पहिल्यांदा ऐकलं तेव्हाचा सोळा सोमवारच्या उद्यापनाचा प्रसंगही आठवतो. नंतर 'वद जाऊ कुणाला शरण गं' आणि 'शूरा मी वंदिले' ही दोन गाणी आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून गाणारी प्राचीही आठवते. अजूनही टेबलावर बसलेली छोटी प्राची; गाण्याबरोबरच आपल्या पायानी ठेका धरणारी; शेजारी स्वयंपाकघरात काम करणारी अश्विनीकाकू आणि दुपार तिच्याकडं खेळायला म्हणून गेलेली असताना सहज म्हणलेली गाणी हे दृश्य पटकन आठवतं. 

'विकल मन आज झुरत असहाय' आणि 'उगवला चंद्र पुनवेचा' ही गाणी लागली की मंगलआत्याची आठवण आल्यावाचून राहत नाही. सहज गप्पा मारतामारता घरात जमलेली छोटीशी मैफील आणि कसल्याही साथीशिवाय गाणारी आत्या हे दृश्य बर्‍याचदा अनुभवलेलं असल्यानं मनात ठसलेलं. मग मंदारदादाच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकलेली दोन गाणी 'दिस नकळत जाई', आणि 'अखेरचे येतील माझ्या'. यांत मंगेशदादानं परातीच्या साहाय्यानं दिलेलं बॅकग्राऊंड म्युझिक आणि आम्ही घरातले सगळे जमलेलो. बाबा ते गाणं टेपरेकाॅर्डवर रेकाॅर्ड करतायत...

शाळेत असताना कीर्ती जोशीच्या तोंडून हमखास ऐकलेली 'कुहु कुहु बोले कोयलिया' आणि 'पैल तो गे काऊ' ... ही गाणी वर्गात बेंचवर सगळ्यांनी धरलेला ठेका.
आत्ता अलीकडे आईच्या आजारपणात स्मिताकाकूनं हाॅस्पिटलमध्ये म्हटलेली भजनं. जवळपास तीनचार दिवस रोज येत होती, भजन म्हणत होती. 

ही सगळी दृश्यं एखाद्या सिनेमासारखी नजरेसमोरून जायला लागली अगदी बॅकग्राऊंड म्युझिकसह.
ही गाणी नंतर रेडिओवर, प्रत्यक्ष कार्यक्रमांत, चित्रपटांत बर्‍याचदा ऐकली. पण समोरासमोर आपल्या
जिवाभावाच्या माणसांच्या तोंडून ऐकताना एक वेगळाच आनंद आणि भाव मनात निर्माण झाला. खोल खोल उतरत गेला... म्हणूनच ही गाणी नकळतच रुजली गेली मनात रुणझुणुत राहिली, राहतीलही अगदी त्या त्या व्यक्तींसह.
तृप्ती

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज