मोहिन चित्र शैली - विचारभारती मासिक
विचारभारती या मासिकात मोहिन चित्रशैली वरचा माझा लेख छापून आला आहे. संपादक मिलिंद जोशी सर आणि मिलिंद देशपांडे आणि त्यांचे सहकलाकार या दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद ! चित्रकलेचं आणि माणसाचं नातं हे फार फार प्राचीन काळापासूनचं आहे. माणूस बोलायलाही लागण्याआधी चित्रांच्या सहाय्यानं संवाद साधत होता. आपल्या गुहेतल्या भिंतीवर तो नैसर्गिक रंग आणि कुंचल्याच्या सहाय्यानं चित्रांद्वारे आपल्या भावना व्यक्त करत होता. कालांतरानं जसं आदिमानवाची उत्क्रांती होत होत तो प्रगत होत गेला, त्याच्या शरीरात, राहणीमानात, वर्तनात बदल होत गेला; तशी भावना व्यक्त करण्याची त्याची पद्धतही बदलत गेली. पुढं पुढं तर भाषेचाही उगम आणि विकास झाला. तसं सांस्कृतिक आणि तांत्रिक प्रगतीही झपाट्यानं होऊ लागली. स्थिर आणि सुरक्षित अशा जीवनात मग त्याच्या या भित्ती चित्रांची जागा वेगळ्या माध्यमानं घेतली. आणि मग चित्र काढण्याच्या विचारात, पद्धतीत, विषयात ही अमुलाग्र बदल घडू लागला. त्यामध्ये तात्कालीन जीवन संस्कृतीचं, समाजाचं, नीतीमूल्यांचं चित्रण दिसू लागलं. आणि त्या त्या पद्धतीनुसार त्या त्या चित्रांमध...