रेखा द अनटोल्ड स्टोरी
credit- aksharnama web portal
रेखा द अनटोल्ड स्टोरी
(मूळ लेखक – यासीर उस्मान, अनुवाद - चैतन्य डुम्बरे, सायन पब्लिकेशन्स)
तिनं पडद्यावर असंख्य भूमिका साकारल्या पण तिची पडद्यामागची 'ही' दडलेली भूमिका मात्र कुणीतरी साकार करायला हवी. होय ! तिची कथा वाचताना असं वाटू शकत. निदान एक वाचक आणि तिची चाहती म्हणून मला तरी तसं वाटलं. ही ती म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून 'भानुरेखा गणेशन' होय. भानुरेखा गणेशन ! हे नाव पटकन समजायला जरा कठीणच जातं. पण त्याऐवजी रेखा असं म्हणलं की मात्र डोळ्यापुढे पटकन तीच्या चित्रपटांच्या नावांची लांबलचक यादी येते. खुबसुरत, उमरावजान, घर, इजाजत अशा अनेक समांतर आणि व्यावसायिक चित्रपटांची नावं आणि त्यातला रेखाचा दर्जेदार अभिनय आठवतो.
चित्रपटसृष्टी म्हणजे मायावीनगरी. अनेकांची स्वप्नं फुलवणारी आणि अनेकांना स्वप्नं दाखवणारी. झगमगती झळाळती अशी ही दुनिया. प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही गोष्टी अफाट मिळवून देऊ शकणारी. अक्षरशः एका रात्रीत नशीब बदलवणारी. पण हिच्या आश्रयाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहजासहजी या गोष्टी मिळतात का? आणि हिच्या आश्रयाला येणारी प्रत्येक व्यक्ती ही अगदी राजीखुशीनं आलेली असते का? या झळाळीमागे असणाऱ्या काजळीचं काय ? असे अनेक प्रश्न 'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकामुळं माझ्या मनात निर्माण झाले.
सायन पब्लिकेशन्स यांनी मराठीत प्रकाशित केलेलं हे पुस्तक आपल्याला फक्त रेखाचं जीवन चरित्र सांगत नसून ते त्या काळातल्या सामाजिक परिस्थितीचं स्वरूप कसं होतं तेही सांगतं. झळाळीमागे असणाऱ्या काजळीचं दर्शन घडवतं. लेखक आणि सिनेपत्रकार यासीर उस्मान यांनी पुस्तकाच्या लेखन प्रेरणेचा हा उद्देश आपल्या मनोगतात स्पष्टपणे सांगितला आहे. हे पुस्तक लिहिताना त्यांना येणारे संमिश्र अनुभव वाचले की रेखाच्या जीवनाबद्दलचं कुतूहल अधिकाधिक वाढत जातं.
चित्रपटाच्या रंगीबेरंगी दुनियेत सातत्यानं वावरणाऱ्या रेखाचं वास्तवातलं आयुष्य मात्र अगदीच कृष्णधवल होतं. स्वतःच्या नावाचा आणि आडनावाचाही त्याग करायला लागण्यापासुनच तिच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली होती. अगदी लहानवयात, मनाविरुद्ध, घरच्यांच्या दबावाला बळी पडून तिनं या चित्रपटसृष्टीत पाउल टाकलं. ऑक्टोबर १९५४ सालची रेखा वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी म्हणजे १९६६ साली ‘रंगूला रत्नम’ या तमीळ चित्रपटात काम करत होती. जात्याच उत्तम बुद्धिमत्ता लाभलेल्या रेखाला स्वतःचं शालेय शिक्षण मात्र मनाविरुद्ध अर्धवट सोडावं लागलं. रेखाची आई पुष्पवल्ली ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक उत्तम नावाजलेली अभिनेत्री होती आणि वडील दाक्षिणात्य चित्रपटातील नावाजलेले चित्रपटनिर्माता होते. त्यामुळं रेखानं चित्रपटात काम करून नाव कमवावं अशी रेखाच्या आईची खूप इच्छा होती. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती खालावलेली असल्यानं तेव्हा दुसरा काही पर्यायही नव्हता. त्यादृष्टीनं पाहता चित्रपटसृष्टी ही रेखासाठी तशी अज्ञात आणि त्रासदायक ठरायचं कारण नव्हतं, पण दुर्दैवानं रेखाला ना तिच्या आईच्या ओळखीचा फारसा फायदा झाला, ना वडिलांच्या नावाचा फायदा झाला. अनौरस संबंधातून जन्माला आलेली मुलगी अशा बातमीमुळे रेखाला समाजाच्या रोषाला कायमच तोंड द्यावं लागलं. अगदी वडिलांनीही आपली मुलगी म्हणून तिचा स्वीकार केला नव्हता. या गोष्टीचं शल्य रेखाच्या आईच्या मनात शेवटपर्यंत तसंच राहिलं. पुढं बऱ्याच कालावधीनंतर जेव्हा रेखाचा त्यांनी स्वीकार केला तेव्हाचा घडलेला प्रसंग मोठा मजेशीर म्हणावा असा आहे. फिल्मफेअरने तिच्या वडिलांना म्हणजे जेमिनी गणेशन यांना रेखाच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार दिला. त्या प्रसंगी त्यांनी आपली कन्या म्हणून रेखाचा जाहिररीत्या स्वीकार केला. जेमिनी गणेशन तेव्हा म्हणाले " त्यांना त्यांच्या मुंबईस्थित कन्येकडून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल फार फार आनंद झाला आहे. " याच वेळी रेखानेही "माझ्या जीवनातील हा सर्वांत अभिमानास्पद क्षण आहे आणि तो म्हणजे मला आज माझ्या हाताने खुद्द माझ्या वडिलांना हा पुरस्कार प्रदान करण्याची संधी मिळाली आहे." असे उद्गार काढले होते. अवघं बालपण वडिलांविना गेलं होतं, समाजाकडून तिरस्कारानं, अपमानानं वागवलं गेलं होतं. आई-वडील हयात असतानाही स्वतःच्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी झगडावं लागलं होतं. त्या रेखाचे हे उद्गार तिच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण अधोरेखित करतात. चित्रपटसृष्टीत हिंदी सारख्या परभाषेशी जुळवून घेत, चुकतमाकत, स्वतःमध्ये बदल घडवून आणत, अखेरीस तिनं या मायावी दुनियेत स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. पण या सगळ्या संघर्षात तिनं खूप काही गमावलं. तेही बऱ्याचदा अनवधानानं.
पूर्वार्धात आणि उत्तरार्धात पूर्णतः भिन्न चेहरा असलेल्या रेखाचा हा व्यक्तिगत जीवन प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेसा आहे. रेखाने आजपावेतो दीडशेपेक्षा जास्त चित्रपटात काम केलं आहे. ती कुणी सर्वसामान्य अभिनेत्री नव्हे तर पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे. नियमितपणे योग साधना करणारी, काळाची पुढची पाउलं ओळखून वागणारी अभिनेत्री रेखा ही गुलजार, मुझफ्फर अली, श्याम बेनेगल, हृषीकेश मुखर्जी, सावन कुमार यांसारख्या दिग्दर्शकांव्यतिरिक्त खऱ्या अर्थाने फारशी कुणाला कळलीच नाही असं म्हणावं लागेल. गुलजार आणि रेखा यांच्यातलं नातं हे फक्त व्यावसायिक पातळीवरचं नव्हतं तर गुलजारांची पत्नी राखी ही रेखाची चाहती असल्यामुळे रेखाचं त्यांच्या घरीही जाणं येणं असायचं. ‘घर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या रेखाबरोबरच्या आठवणींनी गुलजार यांचे डोळे काही क्षण ओलावतात. ते सांगतात, "ही एक अस्सल कलावंताची अशी गुणवत्ता आहे. वो उस किरदार को लिबास की तरह पहेन लेती है."
हृषीकेश मुखर्जींच्या खूबसूरत चित्रपटाच्या बाबतीतला रेखाच्या आणि त्यांच्या संवादातनही त्या दोघांमधलं बापलेकीचं नातं दिसून येतं. त्यांनी अगदी हक्कानं रेखाला सांगितलं की, "हा चित्रपट अतिशय अल्पखर्चात करण्यात येणार आहे. त्यामुळे तूच मला तुझे स्वतःचे असे साधारण पंचवीस कपडे दे. तसेच तुला आता चित्रपटाची पटकथासुद्धा माहित झालीय त्यामुळे अशा प्रसंगात तुला कोणते कपडे शोभून दिसतील, हेसुद्धा तुला माहित आहेच. माझी अशी इच्छा आहे की, या सिनेमात तुझी जी वास्तवातली नैसर्गिक प्रतिमा आहे तसेच तू दिसावेस, त्यामुळे चित्रकरणाला येताना तुझ्या आवडीनुसार तू कपडे घालून ये आणि आपला सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत माझ्याकडेच तुझे ते कपडे सोपव." याला रेखाही आनंदानं राजी झाली.
चित्रपटसृष्टीशी रेखाचं प्रदीर्घ नातं असलं तरी रेखाला तिथं कधीही चांगल्या प्रकारे वागवलं गेलं नाही. एक कलाकार म्हणून इतरांना जो मानसन्मान सहज मिळाला तसा तो रेखाच्या वाटेला फारसा आला नाही. अर्थात याला काही प्रमाणात का होईना खुद्द रेखाही जबाबदार आहे. सुरुवातीच्या काळात आपल्या अभिनयाकडे लक्ष देण्यापेक्षा इतर अनेक गोष्टींकडे लक्ष दिल्यानं, वेळेची कदर न केल्यानं रेखानं स्वतःच अपरिमित नुकसान करून घेतलं आहे.
आपल्या वैयक्तिक जीवनात समाजाला किती हस्तक्षेप करू द्यावा ? कौटुंबिक गोष्टी किती चव्हाट्यावर आणाव्यात ? आणि त्या किती काळ चवीने रवंथ कराव्यात? याबाबतीत रेखानं निश्चितच काही मर्यादा आखायला हवी होती. सुरुवातीला निरनिराळ्या पत्रकार परिषदांमध्ये बिनधास्तपणे आपल्या जीवनाबद्दल बोलणाऱ्या रेखानं पत्रकारांच्या हातात जणू कोलीतच दिलं होतं. नंतर तिला त्याचे गंभीर परिणाम भोगायला लागल्यावर ती त्यापासून दूर होऊ लागली. सुरुवातीला काहीसं अल्लड, अपरिपक्व आणि बेफिकीर असणाऱ्या रेखाचं रूप अमिताभ बच्चन यांच्या प्रभावामुळं मात्र बदललं आणि एका सुंदर परिपक्व, दर्जेदार अभिनय करणाऱ्या सामर्थ्यवान, गुणी अभिनेत्री रेखाचं दर्शन सर्वांना घडलं. सुरवंटाचं फुलपाखरू होण्याच्या या काळात रेखाला आलेले व्यामिश्र अनुभव वाचताना तत्कालीन समाजाची मानसिकता ही आपल्याला अंतर्मुख करते.
हिंदी चित्रपटसृष्टीतलं तत्कालीन वातावरण, भारतीय समाजाची मानसिकता, कलाकारांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन, कलाकारातले आपापसांतले संबंध, चित्रपटसृष्टीशी संबंधित असणारी निरनिराळी मासिकं, नियतकालिकं, त्यातल्या तिखटमिठ लावून चघळल्या जाणाऱ्या सनसनाटी बातम्या, चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हेतुपूर्वक उठवल्या जाणाऱ्या अफवा, अशा अनेक गोष्टींवर हे पुस्तक प्रकाश टाकतं.
कानफाट्या म्हणून नाव झाल्यानं रेखाच्या इतर चांगल्या गुणांकडे न पाहता तिच्या ठराविक चुकांचचं माप तिच्या पदरात कायम टाकलं गेलं. तिची असफल प्रेमप्रकरणं, तिचे अयशस्वी विवाह, तिच्या नवऱ्याची आत्महत्या अशा अनेक गोष्टींसाठी केवळ रेखालाच जबाबदार धरलं गेलं. तिच्या सोबत काम करणाऱ्या प्रथितयश कलाकारांनीही खऱ्या-खोट्याची चाड न बाळगता केलेली विधानं आणि तिच्या बरोबरचं त्याचं वर्तन वाचून आपल्याला अचंबित व्हायला होतं. नीतीमत्ता, पाप-पुण्य, प्रेम, त्याग यांना महत्व देणाऱ्या आपल्या हिंदी चित्रपटसंस्कृतीचा दांभिकतेचा बुरखा फाडण्याचं आणि वास्तवातला चेहरा दाखवण्याचं काम हे पुस्तक अगदी सहजतेनं करतं.
या पुस्तकाचा मराठी अनुवाद केल्यानं मराठी वाचकाला आणि प्रेक्षकालाही ही ‘द अनटोल्ड स्टोरी’ समजायला अधिक सोपी झाली आहे. चैतन्य डुम्बरे यांनी अतिशय प्रभावी अनुवाद केला आहे. आपण अनुवादित पुस्तक वाचत आहोत असं न वाटता हे मराठीत लिहिलेलं स्वतंत्र पुस्तक आहे असं वाटतं. ओघवती भाषा असल्यानं प्रत्येक कथेगणिक रेखाला जाणण्याची उत्कंठा वाढत जाते.
'रेखा’ चित्रपट जगतातलं एक वादळी व्यक्तिमत्व ! तिच्यावरच्या सर्व आरोपप्रत्यारोपांसह आपल्यापुढं सच्चेपणानं उभं राहतं. आयुष्यात घडणाऱ्या प्रतिकूल घटनांना कायमच झुंज देणाऱ्या वास्तवातल्या नायिकेचं हे शब्दबद्ध झालेलं रूप ही तितकंच भावतं. रेखाबद्दल मनात आत्मीयता निर्माण करतं.
Comments
Post a Comment