रंग अनोख्या मैत्रीचा !
रंग अनोख्या मैत्रीचा !
सभेच्या ठिकाणी एकदम शांतता पसरली होती. पवन, प्रकाश, अवनी आणि तिचे सोबती सगळेजण सभा सुरु होण्याची वाट पहात होते. पवन तर थोडासा बैचेनच वाटत होता. तिमिरची वाट आतुरतेनं पहात होता. काही झालं तरी तिमिरने आज यायलाच हवं होतं. नाहीतर चर्चेला आणखीनच खतपाणी मिळाल्यासारखं झालं असतं. इतक्यातच संध्या आली, तसा पवन आणि अवनीला जरा धीर आला आता तिमिर येईलच असं वाटू लागलं. पवनने संध्याचं स्वागत केलं. तिमिराची काय हालचाल असंही विचारलं. तो यायला निघालाय हे कळताच सगळेच जरा आश्वस्त झाले. अखेर एकदाची चर्चा मिटणार होती. संदेह संपणार होता आणि वातावरण पूर्वीसारखंच शांत आणि निर्मळ होईल अशी आशाही आता सगळ्यानांच वाटू लागली होती.
इतक्यातच तिमिर आला आणि लगेच त्याने सभेचा ताबाही घेतला. उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्याने मुख्य विषयाला हात घातला. ‘मित्र हो, गेले काही दिवसांपासून आम्ही खूप बैचेन आहोत. पवनने सांगितलेल्या गोष्टीमुळे प्रकाश आणि मी आज एकत्र येऊन या समस्येवर काही तोडगा निघतोय का ते बघावं असं ठरवलंय. आणि जर का तसं झालंच तर या सगळ्या क्षणांचे तुम्ही साक्षीदार असावं असं आम्हाला वाटलं. आता पुढील संभाषणाची सूत्रं मी प्रकाशकडे सोपवतो.’
प्रकाश बोलू लागला, ‘पवनने सांगितल्यानुसार अवनी आणि तिचे सोबती या सर्वांचा असा समज झाला आहे की माझं आणि तिमिरचं हाडवैर आहे. कारण आम्ही एकत्र असत नाही. पण मित्रहो आमचं असं कोणत्याही प्रकारचं वैर नाही. आम्ही फक्त आपापली कर्तव्यं पार पाडत आहोत. अर्थात त्यामुळेच आम्हाला कधी एकत्र भेटता येत नाही. तसं बघाल; तर आम्हीही दोन डोळ्यांसारखेच आहोत, कायम एकमेकांशेजारी असूनही कधीही न भेटणारे, पण एकाला वेदना झाली तर दुसऱ्याच्या डोळ्यातून ओघळणारे. त्यामुळे आम्ही काय केलं म्हणजे तुमचा हा गैरसमज दूर होईल आणि ही चर्चा थांबेल ते सांगा.
दोन क्षण शांततेत गेले. संध्या म्हणाली, “तिमिर आणि प्रकाश, तुमच्या मैत्रीची मी खरी एकमेव साक्षीदार आहे. पण मीही जे सांगते, ते यांना पटत नाही कारण मी फारच थोड्यावेळ असतेना ! माझा अनुभव त्यांना तोकडा वाटतो. त्यामुळे यावर आता तुम्हीच काय तो मार्ग काढावा असं आम्हाला वाटतंय.” यांवर चर्चेला पुन्हा उधाण येऊन ती भरकटायला नको म्हणून पटकन पवन म्हणाला, ‘हवं तर तुम्ही दोघं जरा बाजूला जाऊनही चर्चा करू शकता. म्हणजे तुम्हाला मोकळेपणाने बोलता येईल.’
यावर प्रकाश आणि तिमिर जरा दुसरीकडे जाऊन चर्चा करू लागले. एकमेकांशी चर्चा करताना ते जवळ आले आणि हळूच एकमेकांत मिसळून गेले. आता बाहेर पडून पुन्हा सभेला जावं असं म्हणतायत तर पटकन बाहेर कुठे पडता येतंय. मोठ्या मुश्किलीने ते मोकळे झाले पण बघतायत तर काय त्यांच्यात काही बदल झाला होता. त्यांचं रंगरूप पालटलं होतं. काहीसा राखाडी अंग झालं होतं. आता काय करावं त्यांना प्रश्न पडला. तसेच ते सभेच्या ठिकाणी गेले. सभेच्या ठिकाणी सगळेजण त्यांची वाट पहात होते. पण आता त्यांना बघून सगळेच बुचकळ्यात पडले. अरेच्चा ! हे काय झालं? हे दोघे जाताना तर वेगळे होते थोडाच वेळ झाला आणि आता इतके वेगळे कसे ? त्यांचा राखाडी रंग बघून त्यांना सारा प्रकार लक्षात आला. तिमिर आणि प्रकाश मात्र आनंदात होते. ते दोघे एक होऊ शकतात याचा पुरावा त्यांना सापडला होता. त्याचं हाडवैर नसण्याचा तो पुरावा जपून ठेवावा असं त्यांना वाटतं होतं. पण आपापलं कर्तव्यं करायला तर तिमिर आणि प्रकाश यांना त्याचं मूळ स्वरूप आवश्यकच होतं. या दोघांना त्याचं मूळ स्वरूप कसं काय मिळणार ? यावर उपाय काय? सारे हैराण झाले होते. आता तिमिर आणि प्रकाश आपला हेका सोडायला तयार नव्हते. त्यांना हा पुरावा जपायचा होता. एक नवीनच समस्या उद्भवली होती.
यावर पवन म्हणाला, ‘मला वाटतं आता यांना याचं पूर्वीचं रूप परत मिळण्यासाठी याचं हे रूप कोणीतरी स्वीकारलं पाहिजे म्हणजे यांना पूर्ववत होता येईल.’ मग पवनपासूनच सुरुवात झाली. तो म्हणाला, मला आवडलं असत पण काय आहे ना, मी कधी एकाजागी थांबत नाही. मला सारखं पळावं लागतं. मग माझा काय उपयोग ?” वनश्रीला विचारलं ती म्हणाली, “मी ही केली असती मदत पण काय आहे ना, मला ऋतूप्रमाणे बदलावं लागतं. कधी बहरून येते तर कधी निष्पर्ण होते मग मी पुरावा कसा काय जपणार? माझंच रूप स्थिर नाही.” मग सरिताला विचारलं ती म्हणाली, “मी कुठून कुठेही वाहत जाते आणि जे जे माझ्यात डोकावतात त्यांना त्याचं रूप दाखवते मग मी पुरावा कसा काय जपेन. माझ्यात तर कितीतरी बिंब सामावली असतात.” मग अवनीचे सोबती म्हणाले, “आमचं जीवन शाश्वत नाही. कधीही मृत्यू ठरलेला. आम्ही काही पुरावा जपू शकत नाही.” आता फक्त उरले खडक त्यांना विचारण्याआधीच ते म्हणाले, “आम्ही जपू शकतो हा करडा, राखाडी रंग. आम्ही अविचल आहोत. आमचा अंतही पाझर फुटला तर होतो. तो ही हळूहळू. काळ लोटतो तेव्हा. त्यामुळे आमचा हा करडा रंग बघून ज्याला त्याला आठवण राहील प्रकाश आणि तिमिर यांच्या मैत्रीची. आम्ही शतकानुशतके गाथा सांगत असतो आपल्या इतिहासाची. तुमचा हा मैत्रीचा इतिहास आम्ही नक्कीच सांगत राहू. आमच्या अविचल असण्यामुळे सारेच आमच्यावर विश्वासही ठेवतील. युगानुयुगे पुरावा म्हणून आम्ही असूच इथे.” खडकाच्या या बोलण्याने पर्वतही गहिवरला त्याने आपल्या मुलांना जवळ घेतलं आणि भरपूर आशीर्वाद दिला. इकडे प्रकाश आणि तिमिर दोघांनीही खडकाला आलिंगन दिलं आणि त्यांचं रूप खडकानं स्वीकारलं. प्रकाश आणि तिमिर म्हणाले आम्ही तुला कधीच अंतर देणार नाही. दोघंही कायमचं तुझ्यावर प्रेम करू. तुला भेटण्यासाठी आम्ही कायम एकत्र येऊ.
आणि मग काय मित्रांनो ! राखाडी/करडा रंग असा तयार झाला. त्याला उदास म्हणून हिणवू नका. तो प्रतिक आहे प्रकाश आणि तिमिर यांच्या मैत्रीचं. आपापली कर्तव्यं सांभाळणाऱ्या दोन मित्रांच्या मध्ये सुवर्णमध्य साधणारा करडा रंग वाद मिटवायला सांगतो.
Comments
Post a Comment