गांधी - प्रथम त्यांस पाहता ...
गांधी - प्रथम त्यांस पाहता ...
संपादक - थॉमस वेबर, अनुवाद - सुजाता गोडबोले, मराठी संपादन - आनंद हर्डीकर, प्रकाशन - राजहंस
एखादं
चित्र साधंसरळ असेल; तर आपण त्याच्याकडे फार वरवर पाहतो. खरंतर आपल्याला
सहजपणे जितकं दिसतं; तितकंच बघतो. त्याचे एकेक भाग, त्यांचा एकमेकांशी
साधलेला तोल, त्यांतल्या रंगाच्या सूक्ष्मछटा असं
बारकाईनं जाणीवपूर्वक आपण पाहत बसत नाही. एक साचेबद्ध आकृती आपल्यासमोर आली
की चित्र कळल्याची ओळख आपल्याला पटते आणि आपण लगेच दुसरीकडे वळतो.
पण
जर एखादं चित्र तुकडे तुकडे जोडून एकत्र केलं असेल किंवा चित्रात काही
पॅचवर्क केलं असेल किंवा काही निराळ्याच आकृतिबंधात ते मांडलं असेल तर ? तर
... निरनिराळ्या अवशेषांतून त्याचं हे एका रूपात साधलं जाणं
आपण जास्त लक्षपूर्वक बघतो. आपली नजर शोधक होते. कुठं काही चुकलंय का ?
राहिलंय का ? हे चित्र आपल्याला काय सांगू पाहतंय? या चित्रात इतका
जिवंतपणा नक्की कशामुळे आलाय ? आपल्याला कधी वाटलंच नव्हतं असंही चित्र असू शकतं, ते छान दिसू शकतं वगैरे वगैरे. अशा विचारांत आपण त्या चित्राकडे नकळत ओढले जातो.
अगदी
असाच अनुभव ‘गांधी - प्रथम त्यांस पाहता’ या पुस्तकानं मला दिला. राजहंस
प्रकाशनाचं महात्मा गांधींवरचं हे पुस्तक म्हणजे उत्तम व्यक्तिचित्रणाचा एक
आगळावेगळा नमुना म्हणता येईल. महात्मा गांधींना पहिल्यांदा पाहणाऱ्या आणि
भेटणाऱ्या काही लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत काय होतं ते जाणून घेण्याचा
प्रामाणिक प्रयत्न या पुस्तकात केला आहे. अर्थात छापील पुस्तकाच्या म्हणून
ज्या काही मर्यादा असतात; त्या लक्षात
घेऊन प्रसिद्ध
व्यक्तींच्या मतांचा, त्यातही ज्यांनी गांधींबद्दल काही विशेष नोंद
जाणीवपूर्वक केली आहे; त्यांचा समावेश यात केला आहे. केवळ भारतातल्याच
नव्हे तर कितीतरी अभारतीय लोकांची मतंही आपल्याला इथं वाचायला मिळतात आणि
केवळ गांधींच्याच बाबतीत नव्हे; तर त्याकाळचा भारत कसा होता तेही उलगडत
जातं.
शिवाय गांधीजी
‘महात्मा’ होण्याआधी लोकांना कसे वाटत होते हेही आपल्याला समजतं.
निरनिराळ्या पदांवर काम करणाऱ्या,निरनिराळ्या जातिधर्माच्या लोकांनी
गांधींबद्दलचं आपापलं मत फारच प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे मांडलं आहे.
अहिंसात्मक लढा, सत्याग्रह अशा त्यांच्या चळवळींमुळे भारताचं वेगळेपण
प्रकर्षानं जाणवतं. जगाच्या पटावर भारताची प्रतिमा काय होती अशा प्रश्नांची
उत्तरंही यात सापडतात; जी आजपर्यंतच्या इतिहासातून आपल्याला फारशी कधीही
मिळाली नाहीत. महात्मा गांधींबद्दल पुष्कळ प्रवाद आहेत, गैरसमज आहेत. त्या
साऱ्या गैरसमजांवर पडदा टाकण्याचं काम हे पुस्तक करेल असं वाटतं.
निरनिराळ्या
लोकांच्या नजरेतून दिसणारे गांधी‘महात्मा’ होण्यापर्यंतचा प्रवास वाचताना
गांधी नावाची आकृती पुसट होत जाऊन गांधी नावाचा विचार आपल्या मनावर खोल ठसा
उमटवतो. गांधींमध्ये दडलेले 'बापू' इथं सापडत
जातात. हजरजबाबी, मिश्कील, वेळेच्या बाबतीत काटेकोर, स्वतःच्या
तत्त्वांवरही अपत्यवत प्रेम करणारे, साध्या राहणीचा पुरस्कार करणारे बापू
पुन्हापुन्हा सामोरे येत राहतात पण याव्यतिरिक्तही त्यांच्यातले
बापू
जाणवतात ते विलक्षण आपलेपणानं प्रत्येकाला पहिल्या भेटीतच आपलंसं करणारे
बापू. समोर भेटायला येणारी प्रत्येक व्यक्ती मग ते लहानमुलं असो अथवा वयानं
मोठी असणारी व्यक्ती असो वा प्रतिथतयश व्यक्ती असो. बापूंचा आपल्यावर
विलक्षण विश्वास आहे, त्यांच आपल्यावर खूप प्रेम आहे आणि ते आपल्याला एक
महत्त्वाची व्यक्ती मानतात असा जो विश्वास सर्वांना वाटायचा तो थक्क करणारा
आहे. अहोरात्र अथक काम करणारे बापू दिवसाच्या
कोणत्याही प्रहरी तितकेच उत्साही असायचे हेही विशेष. सभेच्या वेळी जर काही
कारणाने ती चालू व्हायला विलंब होणार असेल; तर चक्क ते सूत कातत असत.
स्वयंपूर्णता म्हणजे काय? ती कशी आणता येईल? हे त्यांच्या कृतीतूनच दिसत
होतं. गांधींचा शाकाहार आणि त्यांचे निसर्गोपचार यांबाबतीतल्या त्यांच्या
प्रेमाचे प्रसंग मजेशीर आहेत. त्यांच्या शांतताप्रभावित चळवळी पाहून
त्यांना येशू ख्रिस्ताची उपमा दिली गेली. अर्थात
बापूंबद्दल केवळ अनुकूल लिहिलं आहे असे नाही. त्यांच्या उणिवांबद्दल
प्रामाणिकपणे लिहिलं आहे. विशेषतः संततीनियमनाच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या
वैद्यकीय औषधांबाबतची आणि उपायांबाबतची त्यांची मतं आपल्याला वेगळेच बापू
दर्शवतात.
एकंदरीतच या
पुस्तकाच्या आणि गांधींच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर येणाऱ्या
अडचणी,त्यावर केलेली मात या गोष्टी वाचायला मिळतात. निरनिराळ्या
तुकड्यांमधून गांधीजींना पाहण्याचा प्रयत्न आपल्याला गांधीजींची खरी आणि नवी ओळख करून देतो. आपल्या साचेबद्ध नजरेला जो एक ठरावीक आकृतिबंध पाहण्याची सवय लागली आहे; ती मोडून काढायला भाग पाडतो.
गांधींवर प्रेम करणारे, त्यांचा तिरस्कार करणारे अशा सर्वांनीच किमान एकदा तरी हे पुस्तक वाचावं असं आहे.
न जाणो, माणसं कशी वाचायची ते आपण यातून शिकू शकू.
Comments
Post a Comment