टी टाइम

                                                                                          credit - sahitysuchi magzine/ rasik sahitya
 टी टाइम 
(लेखक श्रीपाद ब्रह्मे)
एखादं फाईव्ह स्टार हॉटेल असो वा अमृततुल्य असो किंवा एखादी छोटीशी टपरी, चहा पित पिता गप्पा मारत बसलेली मंडळी हे दृश्य आपल्याला सरावाचंच.  इतका चहा हा आपल्याला जवळचा, जीवनातला अविभाज्य घटक आहे. आता हेच पहा ना ! एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण आपल्याला भेटली किंवा नव्याने ओळख झाली तर  परत भेटण्याचा वायदा हा चहापानाच्या आमंत्रणानेच केला जातो. थोडक्यात काय ! तर यामध्ये चहा पिणं हे फक्त एक निमित्त असतं. खरा उद्देश भेटणं, बोलणं असाच असतो. श्रीपाद ब्रह्मे यांचं 'टी टाइम' हे पुस्तक वाचताना तर हे प्रकर्षानं जाणवतं. यात चहा पिता पिता मारल्या जाणाऱ्या गप्पांचे, चर्चेचे विषय छोट्या छोट्या लेखस्वरूपातून मांडण्यात आलेले आहेत. मग अगदी राजकारण असो सामाजिक समस्या वा कौटुंबिक विषय असो त्या त्या प्रसंगात आपल्या मनात येणाऱ्या भावना या सध्या सोप्या शब्दांत मांडल्या आहेत. गंभीर विषय हलकाफुलका मांडला असला तरी तो विचारप्रवृत्त करणारा आहे. त्याचबरोबर कुठेही कुटाळक्या (गॉसिप) असे याचे स्वरूप नाही हे मात्र नक्की. वाचताना 'अरे  हो खरंच की, मलाही असंच वाटतं,' असं कित्येकदा आपल्या मनात येऊन जातं. कधी उपहास, कधी नर्म विनोद , शाब्दिक कोट्या या सगळ्या आधारे वाचक या विषयाशी नकळतपणे जोडला जातो.
या टी टाइम चं आणखी काही वैशिष्ट्य आहेत. एक तर यातल्या लेखांची सुरुवात ही चैत्र महिन्यापासून केली आहे. त्या त्या महिन्याप्रमाणे येणारे प्रसंग, सणवार किंवा परीक्षा हे क्रमवार आले आहेत. शिवाय हे लेख वृत्तपत्रातील सदरासाठी लिहलेले असल्याने त्या त्या काळातील घडामोडी आपल्याला वाचायला मिळतात. एखादी घटना घडली तेव्हा तिचे पडसाद कसे उमटत  होते, सर्वसामान्य प्रतिक्रिया कशा होत्या हे वाचून गंमत वाटते तर कधी नॉस्टॅलजिया वाटतो.  जी पिढी त्या नंतरची आहे तिला कदाचित घटनांचे तपशील माहित नसल्याने प्रसंग कळणार नाहीत पण काळ बदलत चालल्याची जाणीव नक्की होईल आणि काही काही प्रसंगातून काळ बदलला तरी काही गोष्टी बदलत नाहीत याचीही जाणीव होईल. परीक्षा मधील परीक्षेचं वातावरण, विद्यार्थांची मानसिकता, समराचे सम्राट मधील पर्यटन करणाऱ्याचे प्रकार, निरीक्षण, सांस्कृतिक उन्नयन मधील गाण्यांचे महोत्सवाचे वर्णन किंवा चित्रपट गृहातील वर्णन हे सारे प्रसंग याची जाणीव करून देणारे.
शिवाय या लेखांचं वर्गीकरणही छान केलं आहे. फेस्टिव्ह स्पेशल, सोशल कटिंग, तरतरीत ऋतू, मसाला दिन, राजकीय मारामारी, वाफाळते साहित्य, कडक सुट्टी, अमृत तुल्य अशा विभागांत त्या त्या विषयासंबंधित लेख आहेत. त्यामुळे आपल्याला हवं तेव्हा जसा मूड असेल तसा लेख पटकन शोधून वाचणं सोयीचं पडतं.  याच प्रमाणे लेखांची शीर्षकही आकर्षक आणि गमतीदार आहेत. जसे ' अण्णाण्ण' दशा, कांदा द बॉस, अश्विनशेठ केम छो !, अंक लिपी, व्हेंटिलेटर डे इत्यादी . चहा हा कसा पिढ्यानुपिढ्या प्यायला जाणारा शिवाय वेगवेगळ्या प्रकारे बनवता येणारा, तशाच या चहा पितानाच्या गप्पाही आपल्या आवडी प्रमाणे कडक किंवा स्पेशल अशा रंगणाऱ्या,  चहाचा आस्वाद घ्यायला मदत करणाऱ्या एकदातरी वाचाव्यात हे नक्की !!

वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
 http://rasiksahitya.com/#/home

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज