कवितेचे वर्तमान

                                                                                                   credit - sahityasuchi magzine/ rasik sahitya
कवितेचे वर्तमान 
(महेंद्र कदम)

संवेदनांची धारदार टोके  आत वळली की होतात त्या जखमा आणि बाहेर वळली की होते ती कविता असे कविते बाबत म्हणले जाते ते अगदी योग्य आहे. ' कविता ' हा प्रकार मुळातच अतिशय संवेदनशील, तरल आहे. तो ठरवून लिहिण्याचा प्रकार नाही. तिथे आतला आवाज, आतली जाणीवच नेमक्या शब्दांतून व्यक्त होते. कविता सुचण्याआधी कवीच्या मनावर अनेक आघात झालेले असतात. असंख्य वादळांना तोंड देत देत अपरिहार्यपणे कवितेचा जन्म झालेला असतो. ही अपरिहार्यता अत्यंत सहजपणे रफिक सुरज यांनी पुढील काव्य पंक्तीतून सांगितली आहे.  
" हे काय, ते काय ,  पाठमोरे सारे पाय /  कवितेतून उगवून येणे , हा एकच आता उपाय "

'कवितेचा हा जाणिवे पासून नेणिवेपर्यंतचा रम्य प्रवास' हळुवार पद्धतीने 'कवितेचे वर्तमान' ह्या समीक्षारूपी पुस्तकातून  उलगडून दाखवला आहे. अगदी सुरवातीच्या काळात जात्यावर दळताना म्हणल्या जाणाऱ्या ओवी पासून अभंग, भारूड ते इतर आधुनिक गेय आणि मुक्त छंदातल्या कविता यांची निर्मिती, त्यांच्यातील कालसापेक्ष होणारे बदल, प्रवाहीपणा, साचेबद्धपणा विषय वैविध्य, या साऱ्या गोष्टींची मीमांसा इथे केलेली आहे. निरनिराळ्या संत मंडीळीच्या ओव्या , अभंग, भारूड, या काव्य प्रकारांपासून आताच्या काळातल्या मुक्त छंदातल्या आधुनिक कवींच्या कवितेचा प्रवास टप्प्याटप्प्याने कसा कसा बदलत गेला ते इथे जाणवते. या शिवाय कवितेतील अंगभूत गुणवैशिष्ट्यांचा म्हणजे लय, नाद, अल्पाक्षरत्व, संदिग्धता, संवादात्मकता, वेगवेगळ्या प्रतीकांचा, रूपकांचा होणार वापर, आशयघनता, शब्द लालित्य, शब्दांची रचना, यांचा अभ्यास केलेला जाणवतो. कविता हा प्रकार अभ्यासणाऱ्यांना हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरू शकेल इतक्या उत्तमरित्या इथे कवितेचे  समीक्षण केले आहे .  

या पुस्तकाचे आणखीन वैशिष्ट्य म्हणजे येथे महेंद्र कदम यांनी कवितेच्या विषयानुसार तिची केलेली मांडणी आणि त्या अनुषंगाने त्या त्या विषयातील कवींची ओळख.  कवीची आणि कवितेची पार्श्वभूमी आपल्याला सहज कळून येते. कवीची अभिव्यक्ती, त्याची मानसिकता, जडणघडण, सामाजिक जाणीव यांचा  देखील विचार केला आहे तसाच त्याचा कवितेवर पडणारा प्रभाव कसा कवितेच्या स्वरूपात बदल करतो हे दाखवले आहे. त्यामुळे कविता म्हणजे केवळ अलंकारिक शब्दांची रचना किंवा रम्य कल्पना विलास असे नसून तीची नाळ आपल्या वास्तवाशी जुळलेली आहे ह्याची जाणीव प्रकर्षाने होत राहते. कविते बद्दल विशेष ममत्व वाटू लागते. जरी कवितेची निर्मिती वेगवेगळ्या कवींनी केली असली तरी त्यातून आपल्याच भावभावना प्रकट होतात असे जाणवते. ही कविता वर्तमानातले अनेक विषय प्रामुख्याने शेती, पारंपरिक  जीवन शैली, निसर्ग, स्त्री जीवनाची कथा-व्यथा, भोवतालची सामाजिक परिस्थती त्यात घडणाऱ्या क्रांती, निरनिराळ्या चळवळी, खेडयांचे होणारे शहरीकरण, शहरातील व्यस्त आणि स्व केंद्रित जीवनशैली, नात्यांमधला वाढता दुरावा, तसेच हिंदू-मुस्लिम तणाव या साऱ्या बदलांना सहजपणे स्वीकारत जाते. किंबहुना या साऱ्या सतत होणाऱ्या बदलांमुळेच ती पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या स्वरूपात जन्म घेते. उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर इंद्रजित भालेराव ह्यांनी पुरुषप्रधान संस्कृतीत शतकानुशतके स्त्रीच्या वाट्याला आलेल्या अपरिहार्य एकाकीपणा फार सुंदररित्या व्यक्त केले आहे.  
    " सत्व राखून आणि दुःख चाखूनही ,
      तिला होता येत नाही सीता - सावित्री 
      तीच दुःख तिला गिळावं लागत ,
    तिच्यासाठी दुभंगत नाही धरित्री  "
तसेच शेती आणि शेतकरी यांबाबत ची वेदना शेतकऱ्याची कष्टप्रद परंपरा आणि निसर्गावर आधारित अशी परावलंबी जीवनशैली ही देखील स्वाभाविकरीत्या पुढील ओळींतून व्यक्त केली आहे
" उबगलं  जीवन तरी वाऱ्याशी झुंजतो आहे ,
  गाभाऱ्यात अभंग ओला देवाशी भांडतो आहे
शेतीभातीत नांदून व्हावे  गोदेचे पाणी पावन,
उजळमाथ्यानं फिरू दे आता कुणबीपण घेऊन "
समजायला सोपी पण तितकीच आशयघन रचना अशा स्वरूपातील या कविता केवळ ग्रामीण जीवनाचंच नव्हे तर तत्कालीन परिस्थितीचे प्रतिनिधित्व करीत आहेत.  तसेच श्रीकांत देशमुख यांच्या कवितेतील शहरी भागात नोकरी निमित्त जाणाऱ्या मुलाची भावस्थिती वास्तवावर तसेच शहरातील चाकोरीबद्ध आणि बंधिस्त जीवनावर नेमकेपणे बोट ठेवते. 
" कधी माझ्या खोलीचं बंद कोरीवं दार, लावून सुरक्षित मी बसतो आत
सिमेंटनं गच्च ताठलेल्या छताकडे पाहात, येतो पापणीच्या कडेला
माळदा खाली थरथरणारा बाप, माझ्या दुरावण्यालाही आशीर्वाद देताना "   
शहरी, ग्रामीण आणि स्त्री जीवनावरून वाटचाल करणारा हा प्रवास नकळतपणे अंतरीचा भेद करतो. रक्तातल्या नात्यातला संपत चाललेला ओलावा , वाट्याला येणारा असहाय्य एकाकीपणा हा पुन्हा पुन्हा  अपरिहार्यपणे कवितेतून व्यक्त होतो.
" मी रानाबरोबर माणसं पेरायला शिकलो,
  आता रानात पीक मावता मावत नाही
 पण माणुसकी मात्र उगवता उगवत नाही "   
स्त्रीपुरुषाचं सहजीवन हा जिव्हाळ्याचा विषय ही कवितेतून समर्थपणे व्यक्त होतो. संजीवनी तोडगावकर  यांनी तो अतिशय सुंदररित्या व्यक्त केलाय.
" स्वप्नाळू डोळ्यांनी मी तुझ्या घर अंगणात पाऊल ठेवलं
आणि उजाड माळरानच स्वागतासाठी पुढ्यात आले
मग मीही रुजवून घेतलं स्वतःला माळरानावर
वटवृक्ष होऊन सावली देण्याच्या निर्धारावर "
अशा निरनिराळ्या विषयांनी कवितेचं वर्तमान परिस्थितीतील स्वरूप येथे समजून घेता येते. त्याचबरोबर त्या त्या काळातील कविता ही त्या काळच्या चालू वर्तमानाशी कशी सुसंगत आहे, बदलणाऱ्या परिस्थितीला, वास्तवाला कशा प्रकारे ती सहजगत्या सामावून घेत आहे , माणसाच्या सुखदुःखाची जाणीव किती हळुवारपणे  टिपली आहे या साऱ्याचा मागोवा घ्यायला हे पुस्तक उपयुक्त ठरतं. कविता कोणतीही असो पारंपरिक व आधुनिक ती कल्पने इतकीच वास्तवालाही  धरून आहे, वेदनेला बोलके करणारी आहे, अंतरात्म्याला साद घालणारी आहे याची सुखद  जाणीव करून देते.

वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
 http://rasiksahitya.com/#/home

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज