शोध मनाच्या विकासाच्या बोर्नव्हिटाचा !!! आधुनिक प्रवचने बालमित्रांसाठी

शोध मनाच्या विकासाच्या बोर्नव्हिटाचा  !!! आधुनिक प्रवचने  बालमित्रांसाठी 

"९० % दिमाग का विकास बच्चे कि पाच साल तक होता है " हे काजोलच 
बोर्नव्हिटाच्या जाहिरातीतलं वाक्य आपण नेहमीच टीव्ही वर पाहतो. कुठल्याही गोष्टीची जाहिरात करून ती सतत मनावर बिंबवली की  ती खरी वाटते, त्यात आता काजोलने हे वाक्य म्हंटल्यावर तर कित्येक आया, आणि टीव्ही ने प्रभावित मुले लगेच बोर्नव्हिटा म्हणत तिकडे धाव घेणार आणि काजोल महिमा म्हणून वडीलही त्याला संमती देणार हे ओघाने आलंच. आपलं मूल हुशार कर्तबगार  व्हावं असं कोणाला नाही वाटणार ? आणि ते योग्यही आहेच. पण  जेवढ  महत्व मुलाच्या बाह्य विकासाला ,शैक्षणिक विकासाला देतो तितकंच महत्व आपण त्याच्या मानसिक विकासाला, मानसिक आरोग्याला देतो का ? हा विचारही  करायला हवा.  दुर्दैवाने  तसं  घडत नाही हे खरं. ह्या मागे असं एक कारण असू शकत की त्याची जाहिरात केली जात नाही आणि त्याचा ' कमी वेळात लवकर परिणाम करणारा यशस्वी फॉर्म्युला ' अजून तरी सापडला नाही . 

यासाठी केवळ एकच उपाय !  उत्तम संस्कार करणारा पुस्तक रुपी बोर्नव्हिटा  !!! मुलांना चांगले चारित्र्य घडवण्यासाठी, चांगल्या आदर्शांची, चांगल्या गोष्टींची ओळख करून देण्याची गरज आहे.  जी गरज आपली पुस्तके पूर्ण करू शकतात. छोट्या छोट्या गोष्टीतून नीतिकथा, बोध कथा, धार्मिक प्रवचने , कीर्तने याद्वारे मुलांच्या मानसिक विकासाचा पाया चांगला होऊ शकतो. तसे न घडल्याने आज अत्यंत हुशार मुले देखील वाया चाललेली दिसतात.     

हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे शैलजा मुकुंद सबनीस यांचे " आधुनिक प्रवचने  बालमित्रांसाठी  " हे नुकतेच वाचण्यात आलेले पुस्तक होय. यामध्ये लहानमुलांसाठी ज्ञानेश्वरी मधील अठरा अध्यायांवरील एकवीस प्रवचने आहेत.  लहान मुलांच्या भावविश्वाला साजेसे तसेच तंत्रज्ञाच्या प्रभावाखाली असणारी मुले लक्षात घेऊन त्यांना समजायला सोपे पडेल, असे हे पुस्तक आहे. या पुस्तकात  मुलांकरिता उपयुक्त ठरतील अशा दोन दोन ओव्या निवडल्या आहेत. त्या ओवीच्या स्पष्टीकरणार्थ त्याच आशयाच्या काही नीती कथा , बोध कथा, काही परिचित मराठी आणि हिंदी कविता यांचाही समावेश केला आहे. ज्यायोगे प्रवचने हा प्रकार निरस, कंटाळवाणा वाटणार नाही. पुस्तक लिहिणाऱ्या शैलजा सबनीस ह्या स्वतः उत्तम शिक्षिका असल्याने मुलांच्या वाचनाचा वेग, त्यांची एकाजागी बसून वाचन करण्याची क्षमता, आकलन क्षमता या साऱ्याचा विचारही या पुस्तकात केला गेला आहे.  छोटी छोटी प्रकरणे असून , मुलांशी जणू काही गप्पा मारत आहे अशा संवादात्मक शैलीत हे पुस्तक लिहिले आहे.  त्यामुळे जणू कोणी आजीआजोबाच  आपल्याला गोष्टी सांगत आहेत असा वाचताना अनुभव येतो. 

या पुस्तकात आपल्याला निरनिराळी संत मंडळी , समाजसुधारक , थोर शासनकर्ते , शास्त्रद्न्य यांच्याही गोष्टी वाचायला मिळतात.  नामवंत कवीच्या कविता अर्थसहित वाचायला मिळतात. गौतमबुद्ध, अकबर बिरबल, शिवाजी महाराज, कार्व्हर, विवेकानंद,  रवींद्रनाथ टागोर, अशा निरनिराळ्या क्षेत्रातल्या आदर्श व्यक्तींच्या विचारांची ही  शिदोरी असून  उत्तम संस्कारासाठी मुलांसाठी ही  फार मोठी पर्वणी आहे.  वाचनाची आणि लेखानाची गोडी वाढवण्यासाठी किंवा लावण्यासाठी अशा प्रकारच्या पुस्तकाची खरंच आज आवश्यकता आहे.  आणि धावपळीच्या गतीमान युगात हे पुस्तक म्हणजे जणूकाही उत्तम, पोषक  घटक असलेला आणि मानसिक आरोग्याला सशक्त करणारा बोर्नव्हिटा आहे. गरज आहे ती फक्त आपण त्याचे रोज थोडे का होईना सेवन करण्याची. चला तर मग आपण हि सुरवात करू या .

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज