विरंगी मी ! विमुक्त मी !


                                                                                                     credit- sahitysuchi magzine/rasik sahitya
 
विरंगी मी ! विमुक्त मी ! 
अंजली जोशी (विवेकनिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ)शब्द पब्लिकेशन, मुंबई  
A painter should begin every canvas with a wash of black because all things in nature are dark except where exposed by the light.

Leonardo da Vinci - 

छान वाटलं ना हे वाक्य वाचून, किती खोल अर्थ आहे त्याचा. लिओनार्दोचं हे वाक्य कालातीत ठरेल असंच आहे. जरी ते एका चित्रकाराला उद्देशून असलं तरी केवळ त्याच्या पुरतंच मर्यादित राहात नाही. ते आपल्यासारख्या सर्व विचार करणार्‍या मानवी समूहाला तितकंच लागू होतं . विरंगी मी ! विमुक्त मी ! या अंजली जोशी यांनी लिहिलेल्या पुस्तकात चित्रकारितेच्या संदर्भात हे वाक्य पुनर्मुद्रित केलं आहे. एकंदरीत पुस्तकाचा विचार करता हे वाक्य या संपूर्ण विषयाला अगदी साजेसं आहे. विशेषतः त्यातला दुसरा भाग all things in nature are dark except where exposed by the light.   हे वाक्य पुस्तकातील मूळ विषयाच्या उपेक्षेबाबत आहे. येशू पाटील यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत समर्पक बनवले आहे. काळ्या कुळकुळीत रंगावर एका स्त्रीची रेखीव आकृती रेखाटली आहे.  तिच्या रेखीवपणाचे प्रतिनिधित्व करणार्‍या अवयवांवर तेही फक्त आउटलाईनवर हायलाईट्स दाखवले आहेत. भोवतालच्या मिट्ट अंधाराची  तमा न बाळगता अत्यंत दृढ निश्चयाने आपल्या कमरेवर हात ठेवून ती उभी आहे आणि जणू काही प्रकाशच तिच्या या दृढ निश्चयापुढे नतमस्तक होऊन तिला शोधत आला आहे. या मुखपृष्ठाचे अजूनही अर्थ निघू शकतात. या स्त्रीच्या भोवताली अंधाराचं साम्राज्य आहे इतके की, जणू काही तिचे अस्तित्व त्यात विलीन होईल की काय ? जणू काही प्रकाशाचा स्पर्श तिला वर्ज्य आहे काय ? की जणू अंधाराला सोबत करण्यासाठीच ती जन्मली आहे की काय? असे एक ना अनेक अर्थ हे मुखपृष्ठ सूचित करतं. तसेच हे पुस्तक लैंगिकतेवर भाष्य करते. लैंगिकताजिला आपण कुठल्यातरी अहं निर्मितसंस्काराच्या वस्त्रात / धाग्यात गुंडाळलेलं आहे, ती लैंगिकता इथे नग्न स्वरूपात म्हणजे वस्त्र किंवा धागाविरहित आपल्यासमोर उभी ठाकली आहे. तिला नैसर्गिकपणे न स्वीकारल्याने मिळेल त्या वाटेने आपला मार्ग शोधत ती कुठल्यातरी वाईट कृतीतून रंगविहीन झाली आहे आणि मुक्त होऊ पाहात आहे. आपल्याला त्यातला कोणता अर्थ योग्य वाटतो हे ज्याने त्याने पुस्तक वाचून ठरवावे. कदाचित यापैकी आणखीनही काही वेगळा अर्थ वाचकाला सुचू शकेल. कारण हे संपूर्ण पुस्तकच मुळी अप्रकाशित बाजू प्रकाशित करणारं आणि आपल्याला विचारप्रवृत्त करणारं आहे.
हा विषयच तसा नाजूक, संवेदनशील आहे. ज्यांना आपल्या समजुती, जीवनपद्धती या धर्म विरहित, मानसिक आणि तार्किक दृष्ट्या पडताळून पाहाव्याशा वाटतात फक्त त्यांनीच ते वाचावं. इतरांनी त्याच्या वाटेकडे जाऊ नये. स्त्रियांच्या लैंगिकतेवर भाष्य करणारी एक निर्भीड कादंबरी असेच तिचे वर्णन ब्लर्ब् मध्ये आहे. पण ही कादंबरी या व्यतिरिक्त इतर अनेक विषयही हाताळते. लैंगिकता हा कादंबरीचा मुख्य विषय आहे पण त्याचा होणारा परिणाम वेगवेगळ्या सामाजिक घटनांतून दाखवला आहे. ही कादंबरी एका झटक्यात वाचून होणारी नाही. ती अत्यंत उत्कंठावर्धक आहे यात तिळमात्र शंका नाही पण तरीही ती वाचताना आपल्याला मध्ये मध्ये थोडेसे थांबावेसे वाटू शकते. विचार करावा असे वाटू शकते. काही संवाद, काही प्रसंग हे लैंगिक संबंध, विवाह संस्था, स्त्रियांचे सामाजिक आणि कौटुंबिक स्थान अशा परिस्थितीवर परखड भाष्य करतात.  आता सोपं उदाहरण देते समजा, आपल्याच घरात एखादी खोली किंवा तळघर असतं. अगदी आपल्या कित्येक वर्ष पाहाण्यात असत, त्यामुळेच आपल्याला त्याचं आकर्षण वाटत नाही. आपण तिकडे ढुंकूनही पाहात नाही, पण चुकून एखादी वेळ आलीच,  म्हणजे एखादी महत्त्वाची गोष्ट सापडत नसेल तर मात्र ती शोधायला आपण तिथे हळूहळू अंदाज घेत घेत पावलं टाकत, चाचपडत जातो. घर आपलंच आहे म्हणून थेट घुसत नाही. बरोबर ना ! अगदी हे पुस्तक वाचताना तसंच वाटतं.  
खरे पाहाता लैगिंकता ही गोष्ट आपल्याला नवीन नाही. आपल्या जन्मांपासूनच ती आपल्यात तळ ठोकून बसली आहे. जसे तहान, भूक, झोप  या प्रेरणा सहज नैसर्गिक आहेत तशीच ही पण नैसर्गिक प्रेरणा आहे शिवाय अनेक गोष्टींचा उगम जसे नीती-अनीती, तिच्यातूनच झाला आहे. धर्मावरदेखील त्या गोष्टीचा पगडा आहे. कौटुंबिक व्यवस्था, सामाजिक प्रथा- परंपरा या सार्‍यांवर तिचा प्रभाव पडलेला आजही स्पष्टपणे जाणवतोच आणि पुढेही जाणवेल.  स्त्री-पुरुष नात्याचे अनेक पदर असतात. वडील-मुलगी, भाऊ-बहीण, नवरा-बायको, मित्र-मैत्रिणी असे अनेक संबंध येतात. ज्यांच्याशी व्यवहार करताना या लैंगिकतेचा जबरदस्त पगडा आपल्या मनावर असतो. आपला पोशाख, वागण्या-बोलण्याच्या पद्धती या सर्वच बाबतीत ही लैंगिकता परिणाम करते. याची जाणीव हे पुस्तक अधिकाधिक करुन देते.
आपल्या शरीराच्या तळघरात लपलेली किंवा मुद्दाम दाबून ठेवलेली ही गोष्ट जेव्हा सर्व शक्तीनिशी बाहेर येते तेव्हा तिचा होणारा विस्फोट हा साहजिकच असतो. याची अनेक उदाहरणं आज आपल्या आजूबाजूला पाहायला मिळत आहेत. बलात्कार, एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडणारे गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार, वाढते घटस्फोट या सार्‍याच्या मुळाशी आपल्या लैंगिकतेकडे बघण्याच्या संकुचित आणि प्रसंगी विकृत दृष्टिकोनाचा प्रभाव आढळतो. मुळातच जी प्रेरणा नैसर्गिक आहे ती न दडपता तिचा योग्य प्रकारे स्वीकार केला (याचा अर्थ स्वैराचार नक्कीच नाही ) आणि तिचे आपल्या जीवनातले स्थान जाणले म्हणजे काय, तर शरीर आणि मन यावर होणारे तिचे परिणाम शास्त्रीय दृष्ट्या जाणले तर अनेक सामाजिक समस्या कमी होऊ शकतात. अलीकडच्या काळात शाळेत लैंगिक शिक्षण असावे असे का वाटत आहे ? याचे उत्तर आपल्याला येथे मिळू शकते. मुळातच नीती-अनीती, पाप-पुण्य यांच्या वसनात गुंडाळलेल्या या नैसर्गिक प्रेरणेला उघडपणे म्हणजेच वस्त्रविरहित पाहाणे, समजावून घेणे आजपर्यंत घडलेले नाही. ही प्रेरणा फारतर माणूस दडपू शकतो पण नष्ट करू शकत नाही. येथे उघडपणे लैंगिकतेला उत्तेजन द्यावं असा हेतू नाही, पण तिला जाणीवपूर्वक दडपून टाकून समस्या सुटत नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न मात्र जरुर आहे.
मुळात या कादंबरी लेखनामागची प्रेरणा काय ? असाच प्रश्न पडतो. त्याचं उत्तर लेखिकेने पुस्तकाच्या मनोगतात सविस्तर सांगितले आहे. लेखिका स्वतः मानसोपचारतज्ज्ञ असून तिच्याकडे येणार्‍या अनेक समस्यांचा अभ्यास करताना तिला जाणवले की, अनेक समस्यांच्या मुळाशी लैंगिकता कळत नकळतपणे जोडली गेली आहे. विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचा अभ्यास करताना तिला विख्यात मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिसयांनी ’‘कामप्रेरणाया विषयावर विपुल लेखन केले असल्याचे लक्षात आले. त्यापैकी  डशु रपव ींहश ङळलशीरींशव चरप हे पुस्तक वाचताना बेटी डॉडसनचा संदर्भ कळला. तसेच एलिस यांच्या डशु थळींर्हेीीं र्ॠीळश्रीं या पुस्तकातही तिचा संदर्भ मिळाला. अनेक आक्षेप, प्रचंड टीका सहन करणारी, एक उत्तम चित्रकार व लेखिका असणारी, उघडपणे समाजात हस्तमैथुनाचा प्रचार करणारी, स्वतःच्याच नग्न चित्रांचे प्रदर्शन भरविणारी अशी ही एकोणीसाव्या शतकातली अमेरिकेतील धारिष्ट्यवान स्त्री कोण ? ती कशी घडली ? ही उत्सुकता त्यांना स्वस्थ बसू देईना. तिच्यावर झालेले आरोप पाहाता ती खचितच केवळ कामप्रेरणेला उत्तेजन देणारी स्त्री नसावी, तिने चालवलेल्या कार्यशाळा, तीचे निर्भीड लिखाण, त्याला मिळालेली कुप्रसिद्धी, तरीही तिच्या पुस्तकांचा झालेला विक्रमी खप हे सारे पाहाता तिच्याकडे दुर्लक्ष करावे असे त्यांच्यातल्या मानसशास्त्रज्ञाला वाटेना आणि म्हणून मिळेल तिथून तिचे संदर्भ गोळा करत त्यांची जुळणी करत त्या व्यक्तिरेखेशी मिळतीजुळती काहीसे कल्पनेचे स्वातंत्र्य घेतलेली ही कादंबरी त्यांनी लिहिली. अगदी घटकाभर आपण धरलं की समजा ही कादंबरी लिहिली नसती तरी काय बिघडलं असतं ? कादंबरी लिहून का लगेच परिवर्तन होईल ? असेही प्रश्न हे पुस्तक वाचताना मनात निर्माण होतात. परंतु या प्रश्नाचे उत्तर हे पुस्तकच देऊ शकेल.  बेटी ही एकोणीसाव्या  शतकातील अमेरिकेतील ख्रिश्चन परिवारात तसेच मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेली मुलगी आहे. तो काळ जागतिक महायुद्धाचा देखील आहे. त्यामुळे बेटीच्या घरातील वडील, काका, भाऊ हे देखील काही काळापुरते का होईना सैन्यात दाखल झाले होते. प्रचंड साहस, परकीय आक्रमण, त्यावर विजय मिळवण्याची वृत्ती, स्वावलंबी बाणा, कर्तव्यनिष्ठा, आणि कलासक्त मन हे गुण तिच्यात आनुवंंशिक आले असावेत असे जाणवते. बेटीच्या आयुष्यात येणारे प्रसंग, त्यांना तिने दिलेला लढा, तिच्यातील मनोनिग्रह हे या कादंबरीत वारंवार जाणवतात. अगदी तिच्या कुमार वयाच्या काळापासून ते शेवटच्या काळापर्यंत. आजूबाजूला घडणार्‍या गोष्टी स्वतःच्या तार्किकतेवर पडताळून पाहाणारी, भाबडेपणाचा, संकोचाचा लवलेशही नसणारी ही मुलगी आपल्याला खूप विचारप्रवृत्त करते. पुस्तक वाचताना पुष्कळ प्रसंगात तिच्या विचारांशी आपण सहमत होणार नाही. उदाहरणार्थ तिला स्वतःची रेड फोर्ट कार घेण्याची इच्छा असते त्यासाठी ती पैसेही कमावते पण हातात पैसे असताना केवळ स्वतःला हवं असलेलं गाडीचं मॉडेल मिळवण्यासाठी रोनाल्ड नावाच्या गाडी विक्रेत्याला ती स्वतःचा विनयभंग करू देते. हा प्रसंग काही केल्या आपल्या पचनी पडत नाही. परंतु त्यानंतर तिच्या विचारात झालेला बदल, तिच्या स्त्री असण्याचा, त्यामुळे समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा तिला समजलेला दृष्टिकोन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या चुकीचे समर्थन न करता, खोटा कांगावा न करता ती चूक पुन्हा करू न देण्याचा, सतर्क राहण्याचा तिचा दृढनिश्चय हा निश्चितच तिच्या स्वभावाचा वेगळा पैलू दाखवतो.  
 
बेटीच्या कार्याला अनेकजणांचा विरोध होता, त्यात स्त्रियाही होत्या. तरीही समाजाबद्दलचा तिचा दृष्टिकोन हा कधीही पूर्वग्रहदूषित किंवा पूर्णतः नकारात्मक जाणवत नाही. तिने सतत स्वतःला प्रेरणा दिली.  स्वतःचे विचार ठामपणे मांडले, त्यांचा स्वीकार होईल अशी इच्छाही बाळगली त्या दृष्टीने प्रयत्न केले. अनेक प्रसंगांतून स्वतःला आलेले अनुभव जाणून दुसर्‍या कोणाला तसे दुःखद अनुभव येऊ नयेत म्हणून समाजाच्या विरोधात जाणारे निर्णय घेतले त्याबातीत कार्य ही केले. याबाबतीत गर्भपात कायद्याचा प्रसंग हा खूप विचारप्रवृत्त ठरतो. डेटिंग नंतर जर एखाद्या मुलीला दिवस राहिले तर गर्भपात करण्याचा अधिकार त्याकाळी नव्हता. त्यामुळे अशा प्रसंगात अडकल्या जाणार्‍या विवाहित, अविवाहित अशा स्त्रियांना भयानक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागे. बेटीने स्वतः गर्भपाताचा भयानक अनुभव सहन केला. अप्रशिक्षित तसेच अशा मुलींकडे पापी वृत्तीने पाहाणार्‍या लोकांमुळे, स्त्रियांचा गर्भपात करताना होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यानंतरचे त्यांचे वेदनादायी जीवन किंवा मृत्यू तिने स्वतःच्या नजरेने पाहिले. अक्षरशः अंगावर काटा येईल किंवा शिसारी येईल असेच ते प्रसंग आहेत. पण त्याने खचून जाता तिने यावर स्वतः तोडगा काढला. त्यात बदल करण्याचा प्रयत्नही केला. नंतर गर्भपाताला कायदेशीर मान्यताही मिळाली. परंतु या सार्‍या गोष्टींकडे बघताना तिने केलेले विचार हे खरोखरच आपल्यालाही अंतर्मुख करणारे आहेत. ज्या लैंगिक संबंधांना लग्नाआधी बेकायदेशीर, वाईट, पापी नजरेने पाहिले जाते ते केवळ लग्न या एकाच प्रकाराने लगेच योग्य कसे ठरतात ? समाज त्याला लगेच कशी स्वीकृती देतो ? गर्भधारणा होताना त्यात स्त्री आणि पुरुष दोघेही तितकेच जबाबदार असतात तर मग गर्भपात करण्याच्या वेळी केवळ स्त्रीलाच दोषी का मानले जाते ? किंवा तिच्यावर तशी वेळच का येते ? आजही हे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि वर्षानुवर्षे कितीही संस्कार केले, धर्माचे नीती नियम बनवले, लादले तरी तसेच समोर उभे आहेत.
 
कामप्रेरणा म्हणजेच लैंगिक प्रेरणा ही निसर्गाने दिली आहे. त्यामुळे धर्माचे नियम पाळणारी एखादी व्यक्ती असो किंवा धर्म न पाळणारी व्यक्ती असो तिच्यातही ती असतेच. अशा व्यक्तीने मग केवळ लग्न न करता स्वतंत्र राहाण्याचा निर्णय घेतला तर तिला एक शारीरिक गरज म्हणून लैंगिक सुख का मिळू नये ? केवळ ती धर्म मानत नाही म्हणून ? त्यातही स्त्रीला लैंगिक सुखोपभोगाबाबतीत अनेक धार्मिक बंधने आहेत. जर निसर्ग तिला ही प्रेरणा देत आहे तर यात धर्म आणण्याची आवश्यकता ही पुरुषी वर्चस्वातून आली असेल का ? असा तिचा प्रश्न सहज स्वीकारता आला नाही तरी नाकारताही येत नाही. कित्येकदा तर यात केवळ धर्मविषयक समजुती आणि सामाजिक परिस्थितीचे अवांतर दडपण असते. स्त्रीला तिच्या स्त्रीत्वावरुनच कित्येकदा दडपले जाते. तिचा पेहराव, तिचे खाणेपिणे, तिचा व्यवहार या सार्‍यावर एक लादलेले स्त्रीपण असते. ती कधी एक सामाजिक घटक किंवा व्यक्ती म्हणून वावरत नाही. मानवतावादी दृष्टिकोनाच्या अभावाने कित्येक कुटुंबही विफल आयुष्य जगतात. आजही समाजाच्या विरोधात जाऊन एखादा निर्णय घेणार्‍या स्त्रीला खूपच अवहेलना सहन करावी लागते. या सगळ्याचे मूळ काय तर लैंगिकता होय. 

बेटीच्या आयुष्यात आलेले अनेक प्रसंग हे त्यामुळेच विचारप्रवृत्त करतात. मग तिने नग्नता हा चित्रकलेसाठी निवडलेला विषय असो किंवा हस्तमैथुनाचा केलेला प्रचार असो किंवा समलिंगी संबंध यांच्याबाबत मांडलेला विचार असो. त्यात वरवर पाहाता केवळ लैंगिकतेचा पुरस्कार आहे काय? असेही वाटेल पण जेव्हा काही विशिष्ट प्रसंग आपण वाचतो तेव्हा त्यातला मानवतावादी दृष्टिकोनही जाणवतो. जसे की विधवा, परित्यक्ता, अविवाहित स्त्रियांनी तसेच विधुर घटस्फोटित, अविवाहित पुरुषांनी कधीच लैंगिक सुख उपभोगू नये का ? एखाद्या विशिष्ट घटनेच्या घडण्याने किंवा न घडण्याने त्यांच्यातली नैसर्गिक कामप्रेरणाही नष्ट होत नाही. मग अशा माणसांनी ही प्रेरणा दडपली तर ती कोणत्यातरी वाकड्या मार्गाने बाहेर पडते. परिणामी ते समाजस्वास्थ्याला जास्त हानिकारक ठरते. हस्तमैथुनाद्वारा जर कोणतीही व्यक्ती कोणावरही अवलंबून न राहाता, कोणालाही कसलाही त्रास न देता आपली कामपूर्ती करून घेत असेल तर त्यात समाजाचे नुकसान काय ? या द्वारे लैंगिकसुखासाठी बळजबरी करण्याचे प्रमाण हे बव्हंशी कमी होईल. तसेच कोणत्याही दोन व्यक्ती जर परस्पर संमतीने एकमेकांशी कामसंबंध ठेवत असतील आणि त्याद्वारे कोणालाही कसलीही हानी पोहोचत नसेल तर समाजाने त्यात हस्तक्षेप का करावा? असे अनेक अनुत्तरित प्रश्न हे पुस्तक व्यक्तिगत पातळीवर निर्माण करते. 

अंजली जोशी यांनी इतका संवेदनशील विषय अत्यंत संयतपणे हाताळला आहे. याबाबत त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पुस्तकाची मांडणी, त्यात विख्यात चित्रकारांच्या विचाराचा केलेला समावेश, एकंदरीत नग्नता या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्या पद्धतीने मांडला आहे तो अतिशय परिणामकारक झाला आहे. बेटी जेव्हा स्वतः न्यूड मॉडेल बनून स्टुडिओत उभी राहाते तेव्हा तिच्या मनात निर्माण होणारी वैचारिक स्पंदन, तिच्याकडे केवळ एक कलाकृती म्हणून पाहाणारे चित्रकार आणि स्वतःच्या शरीराची वेगवेगळी रूपे पाहिल्यावर तिला वाटणार्‍या भावना या अप्रतिम शब्दात साकारल्या आहेत. जणूकाही एखादा कसलेला चित्रकारच आपल्याला ते सांगत आहे असे जाणवते आणि या सर्व प्रसंगाकडे बघण्याची दृष्टीच बदलते. 

घटकाभर धरुन चालू की हस्तमैथुन, विवाहबाह्य संबंध सारे काही वाईट आहे. तर मग याला कोणत्याही धर्मात दुसरे पर्याय का नाहीत? आणि आज करोडो लोकं या सामाजिक तसेच धार्मिक नियमांचे पालन पिढ्यानुपिढ्या करत आहेत तरीही सामाजिक पातळीवर लैंगिक गुन्हेगारी अग्रणी का आहे ? या पुस्तकात केवळ स्त्रीच्या लैंगिक समस्या मांडल्या नसून लैंगिकतेचा केला जाणारा अवास्तव बाऊ मांडला आहे. तहान, भूक, झोप या सार्‍या शारीरिक गरजांप्रमाणे लैंगिकता ही एक गरज मानून त्याप्रमाणे जर तिला योग्य प्रकारे वाट मोकळी करून दिली तर नक्कीच ही लैंगिकता मानवी आयुष्यात अनेक रंग भरेल आणि स्त्री-पुरुष, श्रेष्ठ-कनिष्ठ या अहं भावनेतून कायमची मुक्तही करेल. अन्यथा दिवसेंदिवस बदलणार्‍या काळासमोर ही लैंगिकता मानवी आयुष्यातले अनेक बेरंग करणारे क्षण आणेल आणि अपराध व न्यूनगंडाच्या भावनेत अडकवणारी व मुक्तीपासून रोखणारी बेडी/ साखळी बनेल हे मात्र नक्की.


वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
 http://rasiksahitya.com/#/home


Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज