कायमचे प्रश्न

                                                                                                                                    Credit - sahitysuchi magzine /rasik sahity
कायमचे प्रश्न 
(रत्नाकर मतकरी, संपादन- मुकुंद कुळे, समकालीन प्रकाशन, पुणे, * पृ.- २१६ *  मुल्य २५०/- रु.)
  
काळपट-लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर धष्टपुष्ट गेंडा असून एका टोकदार भाल्याने त्याचा वेध घेतला आहे. किंवा असे म्हणता येईल की सुस्तावलेल्या त्या धष्टपुष्ट गेंड्याला भाला टोचून जाग आणण्याचा हेतू आहे. हे मी बोलत आहे ते रत्नाकर मतकरी यांच्या “कायमचे प्रश्न” या पुस्तकाच्या मुखपृष्टाबाबत. लाल काळपट रंग म्हणजे कदाचित एखाद्या युगाचा अस्त किंवा एखाद्या युगाची सुरवात अशा अर्थानेही घेता येईल.  इथे  गेंडा म्हणजे जणूकाही भोवतालच्या  समाजातील न सुटणारे  प्रश्न आहे. आता भाला हे जखमी करण्याचं टोकदार शस्त्र ते या गेंड्यावर उगारलं आहे, का ? तर त्याला काही गोष्टी निदर्शनास आणून देण्यासाठी , संवेदनशील बनवण्यासाठी.  हे उत्कृष्ट  मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलं आहे आणि पुस्तकाचे संपादन मुकुंद कुळे यांनी केलं आहे.  
रत्नाकर मतकरी म्हणजे रहस्यकथा, ललित लेखन आणि नाटककार म्हणून यशस्वी असलेलं बहुआयामी व्यक्तिमत्व. समाजाशी नाळ जोडलेले, सामाजिक जाणिवांचे  भान आणि कर्तव्याची जाण असणारे, आणि आपल्या साहित्यातून सातत्याने त्याची जाणीव करून देणारे लेखक.  या पुस्तकातही रत्नाकर मतकरींच्या राजकीय-सामाजिक प्रश्नांशी निगडित लेखांचा तसेच साहित्यिक व सांस्कृतिक विचारांबाबतच्या सडेतोड भाषणांचा समावेश केला आहे. हे पुस्तक म्हणजे सार्वकालिक आणि सार्वत्रिक समस्यांचा अभ्यासपूर्ण उहापोह आहे. साहित्याची एक व्याख्या अशी आहे की सामाजिक जाणीवे ‘सहित चालत’ ते साहित्य या अर्थाने हे लेखन खरोखरच जाणीव निर्माण करणारे, विचारप्रवृत्त करणारे आहे.  प्रस्थापित, नवोदित लेखकांच्या समस्या मांडणारे तसेच त्यांच्या उणीवा दर्शविणारे ही आहे. साहित्याचे समाज परिवर्तनातील महत्व अधोरेखित करणारे आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून ते आजतागायत महाराष्ट्रातील परिस्थिती कशी बिकट होत चालली आहे, पक्षीय राजकारण कसे वाढत चालले आहे ते प्रामुख्याने यात दर्शविले आहे. मग त्यात मराठी माणसे, असो व अमराठी माणसे  त्यांच्या समस्या, त्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी, भ्रष्टाचाराचा भस्मासुर, याबाबतही सांगितले आहे. तसेच शिक्षण, आरोग्य, आर्थिकस्थिती, सांस्कृतिक आणि वैचारिक घडामोडी, औद्योगिकरण, शेतीविषय, स्त्रीजीवन  अशा निरनिराळ्या प्रश्नांचा विचार यात केला आहे. खास करून मध्यमवर्ग आणि तळागातील वर्ग यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली आहे. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या ? घडविल्या जाणाऱ्या निवडणूका ? मतदारांची शरणागत भूमिका, प्रश्न न विचारता केवळ बघ्याची भूमिका घेणारा समाज, राज्यकर्त्यांची मनमानी, राजकारणातील सक्रिय गुन्हेगारी, तरुणाईचा वाढता चंगळवाद या काही प्रश्नांची पुनरावृत्तीही झाली आहे. पण ही पुनरावृत्ती म्हणजे जणू काही सामाजातील संवेदनशील जागांना टोकदार भाल्याने टोचण्याचा प्रयत्न आहे.
समाजात एकीकडे श्रद्धा, अंधश्रद्धा, भोंदूगिरी  आणि धर्मांधता यांची होणारी वाढ आणि एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाला दिले जाणारे महत्व या साऱ्यात भरकटलेल्या समाजाचे उत्तम चित्र रेखाटले आहे. याबरोबरच मराठी भाषा आणि इतर प्रादेशिक भाषा यांची जपणूक आणि त्यांचे संवर्धन या आव्हानात्मक समस्येचाही विचार केला आहे. त्याबाबत मार्गदर्शनही केले आहे. याच अनुषंगाने एकेरी भूमिका घेऊन चालणाऱ्या इंग्रजी / मराठी शाळा यांची सद्यस्थिती, तसेच मुलांचे वाचनकलेकडे होणारे दुर्लक्ष, पालकांची ही मुलाने सर्वगुणसंपन्न बनावे यासाठी चाललेली स्पर्धा या साऱ्याचे वैचारिक मंथन येथे केले आहे. सामाजिक प्रश्नात नर्मदा आंदोलन असो किंवा गिरणीकामगार यांचा प्रश्न असो त्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्यांकडे होणारे हेतुपुरस्पर दुर्लक्ष, आणि त्याहून महत्वाचे म्हणजे सर्वसामान्य माणसाला या प्रश्नांबाबत असलेली अनास्था याबाबत चिंता व्यक्त केली आहे.  वाढता दहशदवाद, सुशिक्षित बेकारी, गुन्हेगारी,  भ्रष्टाचार, दलित क्रांती या सार्वत्रिक समस्या सोडविण्याबाबत असलेली उदासीनता याबाबत निराशा व्यक्त केली आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई हिची पाच दशकातली वाटचाल कशी घडली तेही सांगितले आहे. 
साहित्याच्या संदर्भात तर अनेक गोष्टींचा उहापोह येथे केला आहे. साहित्यिक कोणाला म्हणावे ? त्याचा सामाजिक सुधारणांशी, घडामोडींशी कसा संबंध असावा ? साहित्यातून त्याने समस्या कशा हाताळाव्यात ? नवोदित साहित्यकांनी काय भान ठेवावे ? असे प्रश्न तर आहेतच शिवाय साहित्य संमेलनाचे बाजारू स्वरूप, मिळणाऱ्या पुरस्कारांची गुणवत्ता, संमेलनांना होणार वारेमाप खर्च तसेच कोणत्याही सरकारी कार्याचे मेळावे, उद्योगपतींची संमेलन यावर होणारी उधळपट्टी थांबवली पाहिजे शासनकर्त्यांना जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत याची जाणीव करून दिली आहे. साहित्यसंमेलनात सेलिब्रेटी व्यक्ती मग त्या राजकारणातल्या असोत किंवा चित्रपटातल्या यांची मक्तेदारी का ? साहित्यिकांनी सरकारचे मिंधेपण का सहन करावे ? ग्रंथालयांची निर्मिती अधिकाधिक व्हावी तसेच प्रकाशकांची साहित्य प्रसार करण्यात काय भूमिका असावी ? वितरणाचे प्रमाण कसे वाढवावे ? उत्तोमोत्तम लेखक कसे शोधून काढावेत ? प्रकाशन संस्थेचे औद्योगिकरण का असू नये ? लेखकांना, मुद्रितशोधितांना दिले जाणारे अल्प मानधन, साहित्यिकांनी साहित्यप्रकाराकडे जोड व्यवसाय म्हणून पाहणे या समस्या मांडलेल्या आहेत. वाचका विषयी आत्मीयता बाळगणे, लेखन कलेत सहज सोपेपणा आणणे, सर्वांसाठी लेखन करणारे, बालवाङ्मयसाठी काम करणे त्यात विपुल साहित्यनिर्मिती करणे  असे उपायही सुचवले आहेत.  आजचे बालक भविष्यातील नागरिक असतात त्यांची वाढ उत्तोमोत्तोम विचाराने होणे आवश्यक आहे. जे चांगल्या समाजासाठीही आवश्यक आहे त्यात साहित्य हे मोलाचे काम करू शकते असा त्यांना विश्वास आहे. 
साहित्य आणि समाज या परस्परावलंबी घटकांचा सर्वंकष विचार या पुस्तकातून केला आहे.  अगदी ज्ञानेश्वरी ,भगवदगीता या शेकडो वर्षांपासून असणाऱ्या अभिजात साहित्यकृतींचा अभ्यास केला असता आपल्यालाही आढळते की त्यातही सामाजिक जाणीव, स्थित्यंतरे यांचा प्रभाव पडला आहे.  या दृष्टीने रत्नाकर मतकरी यांचे हे पुस्तक म्हणजे सुस्त आणि अलिप्त समाजाला जागे करणारे बोचरे व टोकदार साहित्य आहे. वेगवेळ्या कालखंडातल्या, वेगवेगळ्या प्रसंगातल्या निवडक लेखांचे आणि  भाषणांचे मुकुंद कुळे यांनी केलेले संपादन हे सूचित करते की बदलत्या काळातील आणि समाजातील काही कायमचे प्रश्न हे गेंड्याच्या निगरगट्ट कातडीसारखे असून त्यांना टोकदार भाल्याने पुन्हापुन्हा भोसकून नाहीसे करणे अत्यंत गरजेचे आहे.


 वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध
 http://rasiksahitya.com/#/home
 

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज