पाऊले चालती ...

पाऊले चालती ...
प्रत्येक प्रदर्शनात काही ना काही वेगळं असतंच. यावेळेसच्या बालगंधर्वच्या प्रदर्शनात आवर्जून उल्लेख करावा अशी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चित्राकृती आणि शिल्पाकृती यांची उत्कृष्ठ मांडणी. जेव्हा आपण एखादं चित्र आणि शिल्प पाहतो त्या वेळेस त्या त्या कलाकृतीच्या आजूबाजूच्या वातावरणाचाही आपल्या आस्वाद घेण्यावर परिणाम होतो. कितीही सुंदर कलाकृती असली तरी जर ती योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे ठेवली नसेल; तर तिचा आस्वाद घेण्यात रसिक प्रेक्षकांना नकळत अडथळा येतो. तिची परिणामकारकता कमी होते. या दृष्टीने पाऊले चालती हे शिल्प सभागृहात अशा योग्य ठिकाणी ठेवलं होतं की जिथे चित्रांचा आस्वाद घेत घेत माणूस काही काळ विसावण्याचा विचार करतो. त्याची दृष्टी ज्या एका संथ लयीत रमलेली असते तिला थोडंसं थांबवून वळण देणारी लय ही आवश्यक असते... पुढच्या चित्रांचा आस्वाद घेण्यासाठी.

बरोबर त्याच मोक्याच्या जागी शिल्पांची केलेली मांडणी ही सर्वच कलाकृतींना न्याय देणारी ठरली. थोडक्यात काय तर 'पाऊले चालती' बघण्यासाठी थोडी पाऊलं चालून जाणं आवश्यक होतं. वारीला चाललेले आजोबा आणि त्यांच्या खांद्यावर झेंडा पकडून बसलेला त्यांचा नातू असं हे शिल्प. शिल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे बोलके भाव, आणि मला जाणवलेलं आणिखीन एक वैशिष्ट्य म्हणजे शिल्पकाराने आवरलेला मोह !! होय ! हे शिल्प पूर्ण न करता आजोबांच्या केवळ कमरेपर्यंतचा भागच दाखवला आहे. पण शिल्पाचं नाव मात्र 'पाऊले चालती' असं ठेवलं आहे. पायांचा, पावलांचा वापर नकरताही शरीराची रचना अशी केली आहे की खरोखरच ते चालत असल्याचा भास होतो. अंगावरील कपडे त्यांची रचना, आजोबांनी हातात धरलेली किंचित मागून पुढे येणारी काठी, त्या काठीच्या आधारावर नातवाचा पुढं येऊन टेकलेला एक पाय, तर दुसरा माग सरकलेला पाय चालण्याचा भास आणतायत. दोघांच्याही कपाळावर असणारा बुक्का आणि चेहऱ्यावरील श्रद्धा हे सारं विलोभनीय आहे. पण या व्यतिरीक्तही हे शिल्प अजूनही काही सांगू पाहतंय असं वाटतं.
आजोबा ते नातू हे दोन पिढीतलं अंतर ... एक पिढी तिच्या पुढच्या काही पिढ्या आपला भक्कम आधार देत कशी तयार करते किंवा पुढची पिढी मागच्या पिढीच्या भक्कम आधारानं कळत नकळत कशी तयार होते हे यातनं जाणवतं. आपल्या खांदयावरची जबाबदारी नातवाच्या हातात सोपवताना आजोबांच्या चेहऱ्यातून सारं काही जाणल्याचा भाव आणि नातवाच्या सारं काही जाणून घेण्याचा भाव.
शिवाय काळाची दोन रूपं या दोघांत दिसतात. एका जुनाट खोडाला रुजवा फुटावा तसं ...
अजून एक जाणवलं की या शिल्पातून  'सहवास' दिसतो.  आजोबा आणि नातू नुसते बरोबर नाहीत तर ते एकत्र आहेत. वयाचा भार असला तरी नातवाचाही भार घेऊन फिरणारे आजोबा आणि विश्वासानं त्यांच्या खांदयावर बसलेला नातू हे नुसतं रक्ताच्या नात्यानं साध्य होणारं नाही. त्यासाठी आतून ओढच असावी लागते ती सहवासाची ओढ यातून जाणवते.  
परंपरेचं जतन तर यातून दिसतच पण आपला प्रवास कितीही नाही म्हंटल तरी भगवंताच्या दिशेनं आपल्या 'मूल' स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठीच चाललेला असतो. मानवाचा तो अनंत काळापासून, पिढीगणिक चालणारा हा प्रवासही इथं प्रतीत होतो.
ताक - हे शिल्प अशोक काळे यांनी काढलेलं आहे. फोटोत नाव कळल्याने सांगत आहे. याआधीच्या चित्रकारांची नावं फोटोत नीट काळात नव्हती. या सर्वच कलाकारांना सलाम !!          

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज