दिवाळी अंक एक दृष्टिक्षेप !
credit - sahitysuchi magzine/rasiksahitya
दिवाळी अंक एक दृष्टिक्षेप !
दिवाळी अंक एक दृष्टिक्षेप !
ऑक्टोबर
महिन्यात रणरणत्या उन्हात निवांत न बसता खरेदी करण्याकरता जेव्हा झूबंड
उडते तेव्हा दिवाळी जवळ आल्याचे पडघम वाजू लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे
कपड्यांचे सेल, अमुकतमुक खरेदीवर इतकी टक्के खास सूट असे घोषणा फलक जेव्हा
दिसू लागतात तेव्हा बाजारपेठांइतकीच माणसांची
मनेही आनंदाने फुलू लागतात. खरं च हा सण 'सृजनशील' आहे. फराळाचे विविध
प्रकार बनवणे, रांगोळ्या रेखाटणे, वेगवेगळ्या भेटवस्तू बनवणे, आकाशकंदील,
रंगीबेरंगी पणत्या, सुगंधी उटणं-तेल, शुभेच्छा पत्र, किल्ले बनवणे यांमुळे
शरीराइतकीच बुध्दीलाही चालना मिळते. याव्यतिरिक्त दिवाळीचं एक खास मराठमोळं
वैशिष्ट्य म्हणजे वाचकांना वैचारिकदृष्ट्या संपन्न करणारा 'दिवाळी अंक'
होय. केवळ बाह्य सजावटीलाच महत्त्व न देता वैचारिक सौंदर्य खुलवणारा,
वेगवेगळे विषय घेऊन येणारा, बौद्धिक रंजन करणारा हा असा दिवाळी अंक.
शे-दीडशे
वर्षांपासून हा दिवाळी अंक मराठी साहित्य संपदेत मानाचं स्थान टिकवून आहे.
महाराष्ट्रात आजमितीला अंदाजे ३००-४०० दिवाळी विषेशांक निघतात. यातील
काही अंकांनी तर रौप्य वर्ष आणि सुवर्ण वर्ष देखील साजरे केलेले आहे.
यावरूनच दिवाळी अंक हे किती आवडीने वाचले जातात त्याची कल्पना येते. अंकाची
ही परंपरा पाहता तो आपल्या वारीचं प्रतीक वाटतो. दरवर्षी ठराविक काळात
नेमाने येणारा, वाचकभक्तांना आपल्या साहित्यरसात डुंबावणारा, दैनंदिन
जीवनातल्या व्यथा-विवंचनांना क्षणभरासाठी विसरायला लावणारा, साहित्यातील
नवरसांद्वारे आयुष्याचे विविध आयाम दाखवणारा, असा हा दिवाळी अंक दिवाळी
खरेदीच्या यादीत आपलं नाव न नोंदवेल तर नवलच! वेगवेगळ्या स्टॉलवर आकर्षक
मुखपृष्ठांसह वाचकांच्या प्रतीक्षेत असलेल्या या अंकांमध्ये पारंपरिक
अंकांसोबत काही नवीन विषयांवर आधारित नोंद घेण्याजोगे अंकही प्रकाशित झाले
आहेत. तसेच दिवाळी अंक श्राव्य स्वरूपातही काढण्यात आले आहेत. बुकगंगाने
प्रथमच तर 'छात्र प्रबोधन' गेले दोन वर्ष श्राव्य स्वरूपात अंक काढत आहेत.
काळाच्या सोबत चालण्याचा हा त्यांचा उपक्रम स्तुत्य आहे. तरीही छापील
दिवाळी अंकांनी ललित साहित्य, कथा, कविता, लेख या ठराविक विषयांबरोबरच
लहान-थोरांच्या बदलत्या अभिरुचीतला टिपण्याचा प्रयत्न केला आहे
जो उल्लेखनीय आहे.
सण
कुठलाही असो जास्त आनंद लुटतात ती लहानमुलेच आणि फटाक्यांबरोबरच
त्यांना आकर्षण असतं ते किल्ले तयार करण्याचं. याच किल्ल्यांशी दोस्ती
करण्यासाठी संदीप तापकीर आणि योगेश काळजे यांनी संपादित केलेला दुर्गांच्या देशातून हा
पहिलावहिला ट्रेकिंग याविषयावर निघालेला दिवाळी अंक नजरेखालून घालायलाच
हवा. ठाकूरदास परदेशी यांनी 'परांडा' गडाचे काढलेले अतिशय लक्षवेधी
छायाचित्र मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त इतरही अनेक
वैविध्यपूर्ण गोष्टींचा समावेश यात करण्यात आला आहे. किल्ले रायगड आणि
फोर्ट जिब्राल्टर यांची तुलना, भारतीय आरमार, मराठी साम्राज्याची नाणी,
किल्ल्यावरच्या समाध्या आणि दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्यावरचा लेख असे
अनेक वैशिष्ट्यपूर्ण लेख, जोडीला उत्कृष्ट रंगीत चित्र, आकर्षक मांडणी
यांसह तो अंक गडप्रेमींच्या प्रतीक्षेत आहे. रघुनाथ आंबेरकर संपादित किल्ला इतिहासातला, मनातला, वास्तवातला हा
अंकही वाचनीय आणि प्रेक्षणीय आहे. उत्कृष्ट मांडणी व रचना, अक्षर
सुलेखनही उल्लेखनीय आहे. त्यातील 'वाव संस्कृती' हा अमोल सांडे यांचा लेख
वाचनीय आहे.
ही
दुर्ग भटकंती वाचून झाली की नक्कीच आपल्याला मुशाफिरी करायचा मोह होईल. ती
कोठे आणि कशी करावी यासाठी फार त्रास होऊ नये म्हणून सुहास कुलकर्णी आणि
आनंद अवधानी संपादित मुशाफिरी हा
दिवाळी अंक आपल्या मदतीला तयार आहे. यामध्ये हटके मुशाफिरी, म्युझियम
मुशाफिरी, शहर मुशाफिरी, खाद्य मुशाफिरी, फोटो मुशाफिरी, जंगल मुशाफिरी,
शोधक मुशाफिरी असे भाग आहेत. एकंदरीत आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते
मनसोक्त हुंदडण्याचे अनेक पर्याय आपल्यासमोर खुले आहेत. याचबरोबर भारत पर्यटन हा
संयम पब्लिकेशनचा अंकही नजरेखालून घालायला हरकत नाही. ही मुशाफिरी करताना
आपल्याला जे भवतालचं दर्शन घडतं त्याचा फारसा विचार किंवा त्याची पुरेशी
दखल आपल्याकडून घेतली जात नाही. पण याबाबत जागृती होणे ही काळाची गरज आहे
हे ओळखून पर्यावरण प्रेमी अभिजित घोरपडे यांनी भवताल हवा पाणी पर्यावरणाचा आरसा हा
दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. यामधील 'कारण आम्हाला दगड कोणी
शिकवलाच नाही' हा संपादकीय लेख उत्कृष्ट आहे. तसेच मांडणी, रचना, मुखपृष्ठ
आणि निरनिराळी सदरं यादृष्टीने अंक वाखाणण्याजोगाच आहे. विषय आगळा वेगळा
असल्याने संग्रही ठेवावाच असा आहे. इतिहास आणि भूगोल याच्याशी दगडाची
जोडलेली नाळ सर्व लेखांतून अत्यंत प्रभावीपणे प्रकट झालेली आहे. याबरोबरच
आपल्यासमोर आणखीन एक मोठे आव्हान आहे ज्यावर वारंवार चर्चा केली जाते,
निरनिराळे पर्याय शोधले जातात ते म्हणजे बळीराजा आणि त्याची शेती.
यासाठी सकाळने प्रकाशित केलेला अग्रोवन शाश्वत शेती हा
अंक संग्राह्य ठरेल. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सकस शेतीचं संचित
राखायच असेल तर भवतालच्या निसर्गाचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावरच
येते. निसर्गाला पूरक अशीही शेती करणं हा त्याचाच एक भाग. याबाबतची सर्व
माहिती या अंकात अत्यंत योग्य आणि आकर्षक स्वरूपात मांडण्यात आली आहे.
यावर्षी मेघराजाच्या कृपेने पाण्याची काळजी नसल्याने यातील
माहितीचा कृषिबांधवांना नक्कीच उपयोग होईल असे वाटते आणि अन्नदाता सुखी
होईल असे म्हणायला हरकत नाही.
एकंदरीत
निसर्ग, पर्यावरण, शेती या महत्वाच्या विषयांबरोबरच या वारीत आणखीनही नवीन
वारकरी सामील झाले आहेत. सैराट सिनेमामुळे आंतरजातीय विवाह,
पौगंडावस्थेतील तरुण आणि पालक, नात्यांमधला ताण - तणाव आणि अपेक्षा,
जोडीदाराची निवड अशा अनेक प्रश्नांची लाटच आली आहे. या विषयांवर आधारित
अंकांची निर्मिती केल्यामुळे सामाजिक प्रश्नांबाबतची जागरूकता जनमानसात
निर्माण होण्यास मदतच होईल. यात उल्लेखनीय म्हणता येईल असा राजश्री नाळे
यांचा दृष्टीलक्ष्य हा अंक
होय. नात्यांचा दीपोत्सव असा विषय असलेल्या अंकात नात्यांचा परीघ,
विस्तारलेलं नाते जगत, नात्यांची भूमिका, सुगंध नात्यांचा, नात्यांपलीकडलं
नातं. तसेच कला, क्रीडा, देश, अंतराळ या क्षेत्राशी असलेलं नातं, विशिष्ट
मुलांशी असलेलं नातं, अव्यक्तिगत कार्याशी असलेलं नातं यांचा उहापोह केला
आहे. यात मिल्खासिंग, वंदना गुप्ते, डॉक्टर वीणा देव, संदीप वासलेकर, आनंद
भाटे अशा मातब्बर मंडळींचा सहभाग आहे. सुभाष सूर्यवंशी यांचा अक्षरभेट हा
अंकही प्रेमभावना की शारीरिक आकर्षण, दूरदर्शन मालिकांचा प्रभाव, लैंगिंक
शिक्षणाची गरज, इंद्रियनिष्ठ सुखकल्पना, दिशाहीन तरुणाई, पोर्नग्रस्त पौगंड
अशा निरनिराळ्या विषयांचा समावेश केलेला आहे. असाच चांगला प्रयत्न
दत्तात्रय उभे यांच्या अपेक्षा या अंकानेही केला आहे.
नात्यांच्या
या गुंतागुंतीत सकारात्मक विचाराचे महत्व खूपच आहे आणि ते सर्वच क्षेत्रात
लागू आहे. या सकारात्मक विचाराच्या पायावर उभा असलेला थिंक पॉझिटिव्ह हा
प्रभाकर भोसले यांचा अंक आवर्जून वाचावा असाच आहे. स्वतःत बदल करण्याची
शक्ती, वा! म्हणण्याची शक्ती, सुसंगत विसंगती, असे निरनिराळे लेख सकारात्मक
विचारांचं महत्व अधोरेखित करतात. याचप्रमाणे सकारात्मक विचारांच्या जोडीला
प्राणायाम योगासने आणि खेळ यांचेही तितकेच महत्व आहे. संयम पब्लिकेशन चा योगासने प्राणायाम व ध्यानमुद्रा हा
अंक केवळ योगाच्या प्रचारासाठीच आहे. यात ताणतणावाचे नियोजन, प्राणशक्तीचे
वर्धन तसेच सुलभ प्रसूतीसाठी योग असे वेगवेगळे विषय समाविष्ट आहेत.
क्रीडाप्रेमींसाठी अष्टपैलू हा संजय
दुधाणे यांचा क्रीडाविषेशांक उपलब्ध आहे. यात स्त्री शक्तीचा नारा,
ऑलिम्पिक अमृतानुभव, विजेत्यांचे विजेते, भारतीय खेळ इत्यादी लेख आहेत.
तसेच मोतीराम पोळ यांचा अक्षरदान हा अंक स्पर्धा परीक्षा आणि नव्या पिढीच्या संघर्ष गाथा यावर आधारित आहे. याचप्रमाणे सिंहासन हा सुधीर सिंहासने यांचा 'आपण आणि आपले कायदे' अशा विषयावरचा अंक प्रकशित करून या साहित्यावारीत आपली वर्णी लावली आहे.
दिवाळी
अंकांच्या या वारीत वाड्मय, साहित्य, ललित या विषयांनी नेहेमीप्रमाणे
जास्तीजास्त संख्यने बाजी मारली आहे. लेख विस्तारभयास्तव त्यासर्वांचा
उल्लेख येथे करणे अशक्य आहे. यात हंस, मौज, सप्तर्षी, चतुरंग , प्रपंच,
आपले छंद, ललित, संवाद सेतू , पर्ण, पुरुषस्पंदन, कथाश्री, लोकमंगल,
संवाद, साहित्यप्रेमी हे अंक नेहमीप्रमाणेच दर्जेदार ललित लेख, कथा, कविता,
चर्चासत्र या विषयांनी संपन्न आहेत. विश्रांती हा
नीलिमा शिकारखाने यांचा कवितेला वाहिलेला अंक आहे. कवी आणि त्यांच्या
कविता व केवळ त्याच अनुषंगाने लेख असा हा अंक आहे. समस्त काव्य प्रेमींना
मेजवानी आहे. इतर वेळी पानपूरक म्हणून वापरल्या जाणाऱ्या कवितेला इथे मात्र
योग्य तो मान मिळाला आहे. अक्षरगंध हा
अंकही १८-१९ व्या शतकात संघर्षमय वातावरणात मोठ्या जिद्देने शिक्षणाचं
महत्व ओळखून शिक्षणात यशस्वी होणाऱ्या स्त्रियांच्या आत्मकथनात्मक
पुस्तकांवर आधारित 'शिक्षणासाठी दाही दिशा' या विषयावर आधारित आहे. यात
आनंदी कर्वे, पार्वतीबाई आठवले, उषा डांगे, रमाबाई रानडे, पार्वतीबाई
ठोंबरे, आनंदी शिर्के, शांताबाई कांबळे, यशोदा आगरकर तसेच चार चित्रकार
स्त्रिया अंबिका धुरंधर, सुमती दलाल, प्रफुल्ला डहाणूकर, नेत्रा साठे यांचा
समावेश असलेला आहे. नवविधा भक्तीमधील कीर्तन या भक्तीचे माहात्म्य
सांगणारा व विवेक वैद्य अतिथी संपादक असलेला संजीवन लहरी हा कीर्तन विशेषांक आहे. भारतीय संस्कृतीतील ऋषिपरंपरा त्यांचे समाजाप्रती योगदान यावर चिंतनशील असा श्री सद्गुरू साईकृपा हा ऋषीमुनी विशेषांक आहे. तसेच संत कबीर यांच्यावर देखील देविदास पोटे यांनी आनंदघन हा
विशेषांक काढला आहे. नवल हा भयकथा विशेषांकही नेहेमीप्रमाणे वाचनीय आहे.
दीपक घारे यांचा भयभावना आणि दृश्यकला हा लेख वाचनीय आहे. आतील उत्कृष्ट
चित्र, मांडणी उत्तम आहे.
आवर्जून उल्लेख करावा असा कुमारांसाठीचा गंमत जम्मत, छावा, छात्र प्रबोधन अंक तसेच छात्र प्रबोधनद्वारा युवकांसाठी काढला जाणारा युवोन्मेष अंक, मुलांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न घेऊन चालणारा वयम. यातील जगदीशचंद्र बोस तसेच डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ज्यांच्यासाठी इंजिनियर्स डे साजरा केला जातो यांची माहिती आहे. किशोरमध्ये
अवकाशातील अद्भुत विश्व हा लेख तसेच चौथीतील मुलाचा त्याच्याच शब्दातील
वृत्तांत चिक्याची पन्हाळगड स्वारी, सिनेमाची गम्मत हे लेख उल्लेखनीय
आहेत. माउस हा
कुमारवयीन मुलामुलींचं भावविश्व समृद्ध करणारा, नजरेपल्याडचं जग
पाहण्यासाठी उद्युक्त करणारा, जात, धर्म, लिंग, प्रदेश आणि भाषा यापलीकडे
जाणारा अंक म्हणून प्रसिद्ध आहे.
हे
दिवाळी अंक अत्यंत वाचनीय होतात. यामागे कित्येकांचे हातभार लागलेला असतो.
एडिट मित्र ने अक्षरजुळणी आणि मुद्रित शोधन यांसारख्या तुलनेने रुक्ष आणि
तांत्रिक बाबींचा धांडोळा घेणारा शब्दस्पर्श हा
अस्मिता साठे यांनी संपादित केला आहे. हा अंक चार विभागात आहे. मराठीचे
प्रचलित नियम आणि त्यात अपेक्षित बदल, मराठीत जोडाक्षर लेखन कसं असावं,
संगणकावरील फॉण्ट्स (टंक)चा इतिहास, हे फॉन्ट्स तयार करण्याची प्रक्रिया
युनिकोड, श्रीलिपी तसेच इंग्रजीत मुद्रित शोधन करताना घ्यावयाची काळजी
इत्यादी विषयांचा समावेश आहे. अलीकडील दिवाळी अंकात अनुवादित लेख, कविता,
कथा, कादंबऱ्या यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अनुवाद म्हणजे भिन्न भाषा आणि संस्कृतीला जोडणारा सेतू आहे . अरुण जाखडे यांचा उत्तम अनुवाद
हा अंक त्यादृष्टीने अभ्यासनीय आहे. यातील रेखाटनेही उत्तम आहेत. या
बरोबरच रुचिरा, घरचा वैद्य, ग्राहकहित, स्वाभिमानपर्व, वेदांतश्री,
वनौषधी, मणिपुष्पक हे अंकही आपापल्या नेहेमीच्या विषयानुरूप प्रकाशित
केले आहेत.
कालपरत्वे
यंत्रयुगामुळे संवाद साधण्याची माध्यम बदलत गेली तसेच साहित्याच्या
आविष्काराची माध्यमंही बदलत गेली. पूर्वी मौखिक पद्धतीने कीर्तन, भजन, सभा
संमेलने यादवारे विचारांची देवाण घेवाण होत होती. हळूहळू यात बदल होत
गेला, निरनिराळी मासिक, अंक, वर्तमानपत्र ह्याद्वारे लिखित स्वरूपात ही
देवाणघेवाण सुरु झाली. आता फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप, एसेमेस, ई-मेल,
ब्लॉग, ईबुक यांसारख्या इलेकट्रोनिक मीडियाने पाहतापाहता आपला कब्जा घेतला,
संवादाच्या पद्धती सोप्या आणि वेगवान बनवल्या. क्षणार्धात संवादाची,
निरोपाची देवाणघेवाण शब्दांसह फोटो आणि व्हिडिओद्वारा सहजगत्या होऊ
लागली. पण तरीही दिवाळी अंकांची निर्मिती खंडीत न होता चालूच राहिली.
अजूनही दिवाळीचा फराळ कितीही चटकदार आणि खमंग असला तरी सोबत दिवाळी अंकातील
वैचारिक साहित्य लागते ही निश्चितच समाधानाची बाब आहे आणि एक लिखित
स्वरूपातील वैचारिक परंपरा जपण्याचा प्रयत्नही आहे.
सर्व दिवाळी अंक रसिक साहित्य येथे विक्रीसाठी उपलब्ध
http://rasiksahitya.com/#/home
सर्व दिवाळी अंक रसिक साहित्य येथे विक्रीसाठी उपलब्ध
http://rasiksahitya.com/#/home
Comments
Post a Comment