रोपाला बहरू देणारी गोष्ट .....
रोपाला बहरू देणारी गोष्ट .....
पुस्तकांवरून नजर फिरवताना सहजच लहानमुलांच्या गोष्टीच्या पुस्तकांकडे
लक्ष गेलं. अतिशय सुंदर मुखपृष्ठ आणि आतील चित्रे असलेली पुस्तक पाहून मनातल्या लहान
मुलीने टणकन उडी मारली आणि नकळत पुस्तकं
वाचायला सुरवातही केली. डोक्यातले सगळॆ व्यवहारी विचार क्षणात बाजूला जाऊन मन कधी गाय-वासरापाशी
गेले आणि कधी फुगे विकणाऱ्या मुलापाशी गेले ते कळलंच नाही.
पुस्तकं वाचून संपली पण मनातली लहान मुलगी मात्र बाहेर येता येईना. तिला बहुदा मला मोठं करूनच यायचं होतं.
संध्याकाळी शिवरात्रीच्या जत्रेत मन
रमवायला बाहेर पडले तर समोर फुगेवाला
आला आणि परत बाहेर आली माझ्यातली लहानमुलगी आणि गोष्ट ! मग काय जत्रा राहिली दूर, मन फुग्यासारखं तरंगत राहिलं रात्रभर
डोक्यात ठेवून गोष्ट ! सकाळी उठून मस्त चहा
घ्यायला गेलं तर वाफाळलेल्या दुधाचं भाडं पाहून परत बाहेर आली माझ्यातली
लहानमुलगी आणि साई सारखी दाटून आली गोष्ट ! म्हंटल हे काय खरं नाही, ही मुलगी आणि गोष्ट आपला पिच्छा काही केल्या सॊडत नाही. काय करावं बरं ? ठरवलं आज मनातलं लहानमुल जपणाऱ्या एकाला तरी सांगायचीच ही गोष्ट !
तरच ही मुलगी परत होईल लुप्त.
तशा गोष्टी दोन आहेत एक "फुगे" आणि एक "न ऐकलेली गोष्ट"
स्वाती राजे यांनी त्या लिहिल्या आहेत. केवळ २० -२१ पानांची
गोष्ट पण खरंच लहानांनाच काय मोठ्यानां ही अस्वस्थ, विचारप्रवृत्त करते ही गोष्ट !
फुगे विकणारा मुलगा आणि विकत घेणारा
त्याच्याच एवढा मुलगा ह्यांच्यातल्या एक अदृश्य भावबंदाची ही गोष्ट. जी व्यवहारी दुनियेत फारशी महत्वपूर्ण
ठरणार नाही पण माणुसकीच्या दृष्टीने मात्र खूपच
अर्थपूर्ण आणि महत्वाची आहे. दुसरी आहे न ऐकलेली गोष्ट एक गाय-वासरू आणि लहानमुलगी यांच्यातल्या
भावबंधाची गोष्ट ! - गायवासराच्या वेदनेने दुखी झालेली मुलगी ती वेदना दुसऱ्या
कुणाला सांगू पाहतेय पण तिची दाखल घेतली जात नाही.
या दोन छोट्या जीवांची उलघाल, असहाय्यता आपल्यालाही अस्वस्थ करते . तर लहानमुलांवर नक्कीच त्याचा चांगला परिणाम होईल. संवेदनशील असणाऱ्या मुलांना
यातून अनेक गोष्टी शिकता येतील. ही गोष्ट वाचून आवर्जून आपणही दाखल घेऊ शकतो या छोट्या मनांची , भवतालातील गोष्टींची. संस्काररूपी छोट्याश्या रोपाला छान बाहेर
आणेल ही गोष्ट .
Comments
Post a Comment