सतार
सतार
परवा
अचानक तुझं कपाट आवरताना एक बिल सापडलं आणि ते पाहताना मन पटकन भूतकाळात
गेलं. विस्मृतीच्या कोशात गुरफटलेल्या सुरांनी आजूबाजूचं वातावरण
भारून टाकायला सुरवात केली. एकेक सूर काळाच्या मर्यादा ओलांडून मला
तुझ्यासोबत कुठे तरी दूर घेऊन गेला.
ती
इवलीशी पावले दुडूदुडू धावणारी आणि त्याच्या मागे पळताना तुझी होणारी
धावपळ. ते मागे पुढे अंगण असलेले दोन खोल्यांचं घर, आणि एका कोपऱ्यात
जाणाऱ्या-येणाऱ्याच स्वागत करायलाच जणू उभी असलेली सतार. सारं काही
क्षणार्धात आठवलं. आज मन सुरात न्हाहून निघत होत. आठवणींत चिंब करत होत.
सगळ्या आठवणींना हट्टाने मागे टाकून पुढे निघून जावं असा प्रयत्न करत होते
खरं; पण ते काही जमेना. नुकत्याच संपलेल्या मैफिलीच्या भैरवीचे सूर जसे
आसमंतात भरून राहतात आणि मैफिलीच्या स्वराविष्काराची आठवण करून देतात तसं
या आठवणींचं झालं.
अगदी
कालपरवा घडल्यासारखं सगळं नकळत आठवू लागलं. आपल्या नवीन घराच्या
वास्तुशांतीच्या वेळी एक मांजर आपल्या त्या जुन्या घरात अडकलं आणि स्वतःची
सुटका करून घेण्याच्या नादात त्याच्याकडून त्या सतारीचा भोपळा फुटला. मला
अजूनही स्पष्ट आठवतंय की, तुला असं पहिल्यांदाच मनापासून रडताना मी पाहिलं
होत. त्यानंतर तू, मी आणि ती सतार यात एक वेगळंच नातं तयार झालं.
माझ्यासारखंच अजूनही तुला काही प्रिय आहे हे जाणवून पहिल्यांदा मला असूया
का काय म्हणतात ते जाणवलं. एक तर कोवळं वय माझं त्यात तेव्हा तुझ्या शिवाय
माझं कुठलंही जग पूर्ण होतच नव्हतं. तू माझ्या जगण्यातला अविभाज्य भाग
होतीस. त्या क्षणी मला त्या सतारीचा फार फार राग आला. ती माझी जागा घेतेय
का असं वाटू लागलं. हे सारं काही त्यावेळी इतकं नेमकेपणाने नसेल वाटलं; पण
असचं काहीतरी होतं हे मात्र नक्की ! आज ते आठवलं तर हसूच आलं
कारण कालांतराने तीच सतार आपल्या दोघींची सखी झाली होती. आपल्या जुळणाऱ्या
सुरांमधला एक कोमल सूर झाली होती.
मला
आठवतंय की, ती सतार दुरुस्त करणं हे काम खूप उशीराच झालं. नवीन घरच्या
व्यापाने असेल व अन्य काही कारणाने पण ती आपल्या हॉल मध्ये तशीच गवसणीत
कित्येक दिवस उभीच होती. एकदा साफ सफाई करताना चुकून माझा धक्का तिला लागला
आणि एक स्वर उमटला. त्या स्वराने का कोण जाणे पण मला काहीतरी आतून जाणवलं.
असं वाटलं की, ती रडतेय तिच्याकडे दुर्लक्ष झालं ना म्हणून. त्या क्षणी तो
स्वर एकदम केवीलवाणा वाटला. माझ्या नकळतपणे मी त्या गवसणीवरून हात फिरवू
लागले. इतक्यात त्या आवाजाने तू बाहेर आलीस आणि म्हणालीस, " अरे वा ! तुला
शिकायची आहे का सतार ? " , "मला !! " मला तेव्हा आश्चर्य वाटलं जरा, कारण
हा विचार मी कधीच केला नव्हता. तुला आठवत असेल मला लहानपणापासून ' पेटी '
च आवडायची. मी छोटी असताना एकदा मागे लागले होते मला पेटी शिकायची आहे.
तेव्हा तू थोडी मोठी झालीस की बघू हं ! अजून तुझी बोटं लहान आहेत, हात
कोवळे आहेत, तुला भाता ओढायला अवघड जाईल वैगरे वैगरे कारणं सांगून तू माझी
छान समजूत काढली होतीस. अता सतार शिकायला तुझी परवानगी आहे हे कळल्यावर
मात्र मला गंमत वाटली होती. मी सहज म्हणून गेले, "हो शिकेन की, का नाही ?"
आणि तुला खूप आनंद झाला ते बघून मलाही आनंद झाला. मी सतार शिकणं ही गोष्ट
तुला आनंद देणारी आहे हेच माझ्यासाठी तेव्हा मोठं होत. मला सतार नको मला
पेटीच हवी हा हट्ट करावा असं काही तेव्हा वाटलं नाही. खरंच लहानपणी मन
निरागस असतं हेच खरं! वेगळं काहीतरी करायला मिळतंय हा आनंद तेव्हा, हवं ते
करता येत नाहीये ह्या पेक्षाही मोठाच वाटतो.
लगेच
दोनतीन दिवसात आपण दोघी एका सतारीच्या क्लास मध्ये माझं नाव नोंदवायला
गेलो. नाव नोंदवलं आणि सोमवार आणि बुधवार असा क्लास सुरु झाला. मग घरातली
सतारही दुरुस्त झाली आणि काही काळ ते गवसणीत बंदिस्त झालेले स्वर
मुक्तपणे झंकारू लागले. एका वेगळ्याच आनंदाची कधी अल्लड, कधी गंभीर, तर कधी
शांत स्वरांची बरसात करू लागले.
Comments
Post a Comment