गोष्ट एका विहीरीची'


गोष्ट एका विहीरीची'
खरंतर ही  फक्त विहीरीची गोष्ट नाही म्हणता येणार त्यात रहाट आणि बादली पण आलीच. किंबहुना इथे रहाट आणि बादलीच्या नाते संबंधाचीच गोष्ट आहे, त्यांच्या कार्याची गोष्ट आहे.

तर काय झालं एका नगरात एक विहीर होती त्याला एक  रहाट आणि बादली पण होती. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष ? ते तर सगळीकडेच असत. पण गंमत काय की त्या  रहाट आणि बादली च खूप छान वेगळंच काम होत.  बादलीला नेहमीच प्रश्न पडायचा या रहाटाशी आपलं नातं का बरं  जोडलं असावं ?  कोणी बरं गाठ बांधली असावी.  बादली नेहमी रहाटापाशी किरकिर करायची की, तू मला एका दोरीने बांधून ठेवतोस, माझं स्वातंत्र्य हिरावतोस, तू अगदी पक्का आहेस, तुझं तत्व सोडत नाहीस, माझ्यासाठी झुकत नाहीस. रहाट नेहमी शांत राहायचा कधीतरी कळेल तिला असं मनोमन म्हणायचा.  

कारण असं होत की ती विहीर होती शब्दांची. बादलीचं  काम होत त्यातून योग्य शब्द घेऊन यायचं आणि साऱ्या मनुष्याला पुरवायचं, त्यावर नियंत्रण ठेवायचा काम  रहाट करायचा. बादलीला कधी एकटं  नाही पडू द्यायचा.  काय काय आणायचं त्याची नीट यादी द्यायचा. बादली आपली मजेत त्याच्या भरवशावर आनंदात डूबाक्या मारत जायची. तो सांगेल तेवढीच खोल डुबी मारायची आणि असंख्य शब्द वर घेऊन यायची.  रहाट तिला प्रेमाने वरती यायला मदत करायचा, दडून बसलेल्या त्या शब्दांना खोल खोल अंधारातून प्रकाशित करायचा.  

एके दिवशी काहीतरी झालं आणि बादलीची दोरी सैलावली. बादली पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. रहाटाला दुःख साहवेना त्याने कसेबसे काढले तिला वर पण झाले काय या धक्क्याने बादलीने काही चुकीचे शब्द काढले आणि रहाटाला दिले, त्याला आला राग. संपला त्याचा संयम , त्याने बादलीला दिले खोल ढकलून धपकन. बादली गटांगळ्या खाऊ लागली. तितक्यात तिला दिसले छान छान शब्द. पटकन तिने घेतले कवेत आणि हाकारलं रहाटाला.  कसाबसा दोर पकडून ती वर आली आणि शब्द ओतले त्याच्या कवेत. ते सुंदर शब्द बघून रहाटाला झाला आनंद. तेव्हा त्याने सांगितले त्यांच्या गाठींचे रहस्य.

आपला जन्म झालाय, चांगले शब्द देण्यासाठी. तुला चांगले शब्द वेचायला बनवल  आणि मला ते सांभाळून ठेवायला. चांगले शब्द चांगले अर्थ देतात आणि सगळं जीवन आनंदी बनवतात. कारण शब्दांसारखं मोठं साधन जगात दुसरं कोणतं नाही.  ते नीट वापरलं तर होतात सुंदर गीत, कविता, कथा, कादंबरी त्यातून जन्मत साहित्य. आणि ते जर हत्यार बनले तर ...... ? मात्र होतात युध्द , दुरावतात नाती, तुटतात माणसं. ध चा मा केला तर काय  होत माहितेय  ना ? म्हणून छान शब्द बोला, प्रेमाने बोला, आपल्या मातृभाषेत बोला ती खूप गोड  आहे आणि 
विहीरी इतकी अर्थपूर्ण तहान शमवेल  इतकी खोल आहे. 

ठरलं तर  ! आज आपला मातृभाषा दिन मग आजच आपण ठरवू या. शब्दाच्या विहीरीत डुबकी मारूया आणि छान छान नवे नवे शब्द घेऊन येऊ या. आपलं जीवन आनंदी बनवू या !  
मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

Comments

Popular posts from this blog

GULMOHOR

अट

भाषा साहित्य आणि समाज