शोधा खोदा लिहा
- Get link
- X
- Other Apps
Credit - sahitysuchi magzine/ rasik sahitya
शोधा खोदा लिहा
युनिक फीचर्स चे निवडक महत्वाचे लेख (संपादक:- सुहास कुलकर्णी, समकालीन प्रकाशन, पुणे,*पृष्ठ संख्या - २४८ * मूल्य- २५०/-)
उत्कंठा, साहस आणि आश्चर्य यांचं मिश्रण असलेलं पुस्तक म्हणजे कोणता साहित्य प्रकार असेल असं वाटतं. रहस्यकथा, कादंबरी, किंवा नाटक असच ना. पण इथेच तर खरी मेख आहे. प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहणाऱ्यांचा दृष्टीभ्रम हे पुस्तक दूर करत. वरील तिन्ही गोष्टींचा समावेश असलेलं हे पुस्तक १९९० ते २०१५ या काळातील वृत्तपत्रीय लेखांचं संपादन आहे. पत्रकारितेत वेगळी वाट चोखाळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि सामूहिक पद्धतीने लेख लिहणाऱ्या युनिक फीचर्स यांचं "शोधा खोदा लिहा " हे पुस्तक आहे. याच उत्कृष्ट संपादन केले आहे ते सुहास कुलकर्णी यांनी.
पत्रकारिता आणि त्यातही लेखसंग्रह म्हणलं की मुळातच वाचणाऱ्याचा दृष्टिकोन संकुचित होतो. सतत काहीतरी सनसनाटी आणि छापील विधानं असणारं, कुठल्यातरी राजकीय घडामोंडीशी संबंधित असलेलं, गुन्हेगारीचा समावेश असणारं, गंभीर असं लेखन असणार असं वाचकाला वाटतं. काही अंशी हे खरंही असलं तरीही या व्यतिरिक्त काही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून, परिस्थितीचं योग्य मूल्यमापन करून, त्यातून समाज जागृती करण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकाद्वारे निश्चतच केला जातो.
तीन लेन्स असणारा चष्मा अशा मुखपृष्ठापासूनच हे पुस्तक आपले वेगळेपण अधोरेखित करते. या तीन लेन्स चा उद्देश काय असावा ? या विचारात आपण हे पुस्तक वाचायला सुरवात करतो. हे पुस्तक बातमीची बित्तम्बातमी आपल्याला देतं. एखादी घटना कधी, कुठे, कशी आणि का घडली याची सविस्तर माहिती आपल्याला यात मिळते. त्याबरोबरच समाजमनाचा कौल, सामाजिक विचारसरणी या गोष्टीही समजायला मदत होते. मग ते बाबरी मशीद पाडण्याची घटना असो वा शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचार असो, लोकशाही असावी का नसावी असा प्रश्न असो त्या त्या वेळी आढळलेल्या सर्वेक्षणाचे धक्कदायक निकाल आपल्याला दाखवतं. यावरूनच आपली सांस्कृतिक मूल्ये, सहिष्णुता, बंधुभाव, सर्वधर्मसमभाव यातील कमकुवतपणा आपल्याला जाणवतो.
वर्तमानपत्र ही समाज मनाचा आरसा असतात. आपल्या स्वातंत्र्य पूर्व काळात केसरी, सुधारक या सारख्या वर्तमानपत्रांनी घडवून आणलेल्या सामाजिक चळवळीचा इतिहास आपल्या सर्वाना माहित आहे. हे पुस्तक वाचून आताच्या काळात या साऱ्या गोष्टींचे महत्व अधिकाधिक पटते. वृत्तपत्रात ठराविक साच्याच्या बातम्या येतात, त्यांना काही मर्यादा असतात. जसे वृत्तपत्राचा खप होणे, जाहिरातीची राखीव जागा, मर्यादित जागेत लेखन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तात्कालिक माहितीचे प्रसारण. वेळेच्या या तत्परतेच्या ससेमिऱ्यामुळे बातमीची सखोल चौकशी करणे, तेथील परिस्थीतीचा तपशीलवार आढावा घेणे, शहानिशा करणे, या सर्व बाबींचा अभ्यास करून निष्कर्ष काढून ती घटना तटस्थपणे आपल्या समोर आणणे हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. याचा परिणाम असा झाला की या बातम्या पाहणं, त्यावर काही काळ विचार तसेच चर्चा करणं आणि कालाय तस्मै नमः असं म्हणून सोडून देणं हे आता आपल्या अंगवळणी पडलं आहे. आपल्यासाठी या घडामोडींचा संबंध बातमी वाचून संपलेला असतो. परंतु हे धोरण आपली परिस्थिती अधिकाधिक बिकट कशी करत आहे याचं भान या पुस्तकाद्वारे आपल्याला होत.
गेल्या वीस पंचवीस वर्षात जागतिकरणाचे वारे वाहू लागले. तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती केली. शहरांचा झपाट्याने विकास होऊ लागला. थोड्याफार प्रमाणात ग्रामीण जीवनातही बदल झाला. पण हा बदल नक्की किती प्रमाणात झाला ? खरंच तळागाळापर्यंत या सर्व सोयी सुविधा पोहचल्या आहेत का ? आधुनिक सोयी क्षणभर बाजूला ठेवुयात परंतु दैनंदिन गरज भागवण्या इतक्या तरी सोयी सर्वाना मिळत आहेत का ? या सगळ्या प्रश्नांची धक्कदायक उत्तरे आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळतात. अन्न, वस्त्र, निवारा, आणि आरोग्य अशा मूलभूत सुविधा आज सुद्धा पुष्कळ ठिकाणी उपलब्ध नाहीत.
यासाठी फार लांब जाण्याची गरज नाही अगदी पुणे, मुंबई, नाशिक या सारख्या प्रगतशील शहरांच्या जवळपासची खेडी पहिली तरी त्यातही या सुविधा नसल्याचे दिसते. कित्येक सरकारी सुविधा, शासकीय योजना यांची अंमलबजावणी ही गरीब, वंचित, आदिवासींपर्यंत पोचली नाही. जिथे पोचली आहे तिथे त्याची अंमलबजावणी होत नाही. याला कारणं काय आहेत ? बातम्या वाचून या सर्व घडामोडी आपल्यासाठी इतक्या नित्याच्या झाल्या आहेत की त्याचा विचारही करावा असे आपल्याला वाटत नाही. नक्षलवादी म्हणजे काय ? ते काय करतात ? त्यांचा सामना गडचिरोली मधील लोकं कशी करतात ? एनरॉन प्रकल्प नक्की काय आहे ? त्याला विरोध का होतो आहे ? दिवसेंदिवस जटील बनत चाललेली पाण्याची समस्या नक्की सुटणार तरी कधी आणि कशी ? शिक्षण क्षेत्रातली अनागोंदी, शिक्षकांचा कामचुकारपणा याला केवळ शासन जबादार आहे की विद्यार्थी, पालक का आणखीन काही ? बिघडणाऱ्या परिस्थितीला केवळ सरकार हेच एकमेव जबाबदार आहे का ? का आणखीन कोणी ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक आपल्याला देते.
बातमी कुठलीही असो लहान किंवा मोठी तिच्या मुळाशी जाऊन तिथल्या परिस्थितीत राहून, प्रसंगी धोका पत्करून ही माहिती लेखस्वरूपात आपल्या समोर मांडली आहे. सत्याच्या अधिकाधिक जवळ जात, कसलाही आडपडदा न ठेवता थेट वृत्तांत सांगितला आहे. यातील लेखांचे चार भागात वर्गीकरण केले आहे. शोध लेख, रिपोर्ताज, सर्वेक्षण, गप्पा लेख. सर्वच लेख वाचनीय, उल्लेखनीय आहेत. मला भावलेले लेख म्हणजे पोलीस कोणाचे ? भयानक वास्तव , गडचिरोलीची गोची खरोखर वाचून हतबद्धता येते , टीआरपी के लिये कूच भी करे गा प्रसारमाध्यमांचा खुसखुशीत समाचार , लोकांच्या मनातला नेता धक्कादायक निष्कर्ष, संत शिकवणुकीची मूस वितळणार ? वैचारिक सहिष्णुतेचा पुनर्विचार करावा असा, काँग्रेस टिकून आहे ती का ? पक्षांतर्गत राजकारण, उत्तरांच्या शोधात देश अटळ, प्रखर वास्तव, मुलं विरुद्ध मुली लैंगिक गुन्हेगारी. यातील लेखांमुळे बातम्यांकडे केवळ बातमी म्हणूंनच पाहण्याची वृत्ती बदलण्याची गरज आहे हे जाणवून देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरले आहे.
आता तर काय वर्तमानपत्राखेरीज फेसबुक, ट्विटर, या सारख्या इलेकट्रोनिक माध्यमांमुळे जगभरातल्या असंख्य बातम्यांचा आपल्यावर सतत मारा होत असतो. खरं खोटं करणं किंवा त्याचे परिणाम काय होतील असा विचार करणं हे आपल्या आवाक्याबाहेरचं आहे असं वाटू लागत. त्या पार्श्वभूमीवर केवळ बातमी पुरवणे इतकेच उपजिवेकेपुरचे अल्पसंतुष्ट न राहता त्या पुढेही जाऊन खरोखर सामाजिक कळकळीने या समस्यांचा उहापोह, त्यावर वैचारिक मंथन केले गेल्याचे हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते. पत्रकारिता हे एक व्रत असून सामाजिक सुधारणा करणारे , सामर्थ्यशाली लोकशाही राष्ट्राचा आधार स्तंभ आहे अशी विश्वासार्हता निर्माण करण्यात हे पुस्तक सहाय्य्यभुत ठरणारे आहे.
वरील पुस्तक विक्रीसाठी रसिक साहित्य येथे उपलब्ध http://rasiksahitya.com/#/home
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment